युवकावरील सुरी हल्लाप्रकरणी आणखी चार जणांना अटक

नागवा येथील प्रकरण : हणजूण पोलिसांची कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd October 2022, 12:33 am
युवकावरील सुरी हल्लाप्रकरणी आणखी चार जणांना अटक

म्हापसा : नागवा येथे रवी शिरोडकर (३०, रा. कळंगुट) या युवकावरील प्राणघातक हल्ला प्रकरणात हणजूण पोलिसांनी अजून चार जणांना अटक केली.

शैलेश चंदू नाईक (२०, रा. तीनमाड कामुर्ली), सिद्धांत सूर्यकांत मांद्रेकर (२२, रा. गोलेतीनवाडा साळगाव), अमन रोहीदास शिरोडकर (२१, रा. निगवाडा साळगाव) व प्रशांत दास राजू (नागवा) अशी संशयितांची नावे आहेत.

ही प्राणघातक हल्ल्याची घटना शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास नागवा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारीच मुख्य संशयित टार्झन पार्सेकर (३०, रा. नागवा) यास अटक केली होती, तर वरील संशयित फरारी झाले होते. त्यांना पोलीसांनी रविवारी पहाटे पकडून अटक केली.

घटनास्थळी संशयित गट दारू पिण्यासाठी बसला होता. त्यावेळी रवी शिरोडकर व टार्झन पार्सेकर यांच्यामध्ये भाईगिरीवरून वाद निर्माण झाला. प्रकरण हातघाईवर गेले. यावेळी संशयित पार्सेकर याने आपल्याकडील चाकू काढला व जखमी शिरोडकर याच्या पोटात खुपसला. यात तो जखमी झाला होता.

सध्या गोमेकॉमध्ये जखमी शिरोडकर याच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हणजूण पोलीस करत आहेत.