पाश्चिमात्य राष्ट्रांकडून भारत-आफ्रिकेची लूट

व्लादिमीर पुतिन यांची टीका

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
02nd October 2022, 11:22 pm
पाश्चिमात्य राष्ट्रांकडून भारत-आफ्रिकेची लूट

मॉस्को : पाश्चिमात्य देशांनी एके काळी भारत आणि आफ्रिकेत अत्याचार करून लुटमार केली. अमेरिकेने अणुबाँब आणि रासायनिक शस्त्रांचा वापर करून नरसंहार केला. आता हे देश नियमांवर आधारित जागतिक व्यवस्था असावी यावर भर देत आहेत. ही अव्वल दर्जाची फसवणूक आहे, अशी टीका रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केली.
डोनेस्क, लुहान्स्क, खेरसन आणि झोपोरीझिया या युक्रेनमधील चार प्रांतांत सार्वमत घेतल्यानंतर त्यांचे रशियात विलीनीकरण केल्याच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी ही टीका केली. हे सार्वमत अमेरिकेसह पाश्चात्त्य राष्ट्रांनी अमान्य केले आहे. युरोपीय राष्ट्रांच्या परिषदेने हे विलीनीकरण फेटाळले आहे. पुतिन यांनी क्रेमलिनजवळील ‘सेंट जॉर्ज हॉल’मध्ये केलेल्या भाषणात ही टीका केली.
पुतिन म्हणाले, पाश्चिमात्य देश नियमांवर आधारित व्यवस्थेचा आग्रह धरत आहेत. हा निव्वळ मूर्खपणा, फसवणूक, पक्षपातीपणा व दुटप्पी नव्हे तिहेरी मापदंड आहेत. रशिया व रशियन संस्कृती हजारो वर्षांपासून महान शक्ती आहे. खोट्या-तकलादू नियमांनी तिला धक्का लावता येणार नाही. पाश्चात्त्य देश त्यांच्या ऐतिहासिक गुन्ह्याबद्दल इतरांना दोषी ठरवत आहेत. संबंध नसलेल्या देशांना वसाहतवादातील अत्याचारांच्या चुका मान्य करण्यास सांगत आहेत. पाश्चिमात्यांनी मध्ययुगीन काळात वसाहतवादी धोरण सुरू केले. त्यानंतर गुलामांचा व्यापार, मूळ अमेरिकावासी (रेड इंडियन्स) यांचा नरसंहार, भारत आणि आफ्रिकेतील देश लुटले. हे मानवता, सत्य, स्वातंत्र्य आणि न्यायविरोधी होते.
अणुऊर्जा प्रकल्पप्रमुखाच्या अपहरणाचा रशियावर आरोप
युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या झोपोरीझिया अणुऊर्जा प्रकल्प प्रमुखाचे रशियाने अपहरण केल्याचा आरोप युक्रेनच्या अणुऊर्जा विभागाने केला. या प्रकल्पाचे महासंचालक इहोर मुराशोव्ह यांचे शुक्रवारी रशियन सैन्याने अपहरण केले व हा प्रकल्प ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. युक्रेनची अणुऊर्जा कंपनी ‘एनर्गोटम’ने ही माहिती दिली. रशियाने मात्र मुराशोव्ह यांना ताब्यात घेतल्याच्या वृत्तास दुजोरा दिलेला नाही.