लढायला शिकवणारा महात्मा

बॅरिस्टर मोहनदास ते महात्मा गांधीजी बनण्यापर्यंतच्या प्रवासात गांधींनी स्वतःशीच लढलेली लढाई सर्वांत महत्त्वाची आहे. आज जगात क्वचितच एखादा मानव त्यांच्याइतकी स्वतःशी लढाई लढला असेल. गौतम बुद्ध यांनीसुद्धा स्वतःशी अशीच लढाई लढली. मात्र ते वैराग्याचे जीवन जगले. गांधीजी सांसारिक जीवनाच्या मैदानातच आपल्या साधनेची लढाई लढताना दिसतात. ते कोणतीही सिद्धी प्राप्त करून आपल्या समोर येत नाहीत. मला जे ज्ञान प्राप्त झाले आहे ते तुम्हाला द्यायचे आहे, असे ते म्हणत नाहीत. ते लोकांच्या संघर्षातच ज्ञान शोधतात आणि ज्ञान ग्रहण करतात.

Story: प्रासंगिक | कुमार प्रशांत |
01st October 2022, 10:44 pm
लढायला शिकवणारा महात्मा

महात्मा गांधी यांनी जनतेला हाक दिली होती की, देशाचे शिपाई व्हायचे असेल तर भाषा बदला, कपडे बदला, सण-उत्सव, रितीरिवाज सगळे बदलून टाका. गांधीजींनीच आपल्या मनात ही भावना जागृत केली की, स्वातंत्र्याला कोणताही पर्याय नाही. तसेच लढा देण्यालाही काही पर्याय नाही. त्याचबरोबर असेही समजावून सांगितले की, या लढ्यात क्रौर्य, भीती अथवा धूर्तपणा महत्त्वाचा नसून शौर्य, सत्य आणि धैर्याने लढा लढला पाहिजे. जगात सगळीकडेच गांधी नव्हते तरीदेखील त्या त्या देशांना स्वातंत्र्य मिळाले. मात्र फरक हा आहे की, त्या देशांचे स्वातंत्र्य हे स्वातंत्र्यच राहिले. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे अनेक संधी घेऊन आले. खरे तर आपल्याला अर्धवट स्वातंत्र्य मिळाले तेसुद्धा रक्त सांडून. त्याबाबतची चर्चा तेव्हासुद्धा आणि आजसुद्धा जगभरात केली जाते. त्या लढाईचा अर्थ आजही अनेक तज्ज्ञ आपापल्या परीने काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण लढा तर पूर्ण शक्तीनिशी द्यायचा होता मात्र कुणाचाच जीव घ्यायचा नाही. हा संघर्षाचा एक वेगळाच प्रकार असून तो गांधींच्या आधी जगाला माहीत नव्हता. गांधीजींनी सर्वप्रथम आपल्याला शिकविले की, जीव घेण्यात शौर्य नसून प्राणार्पण करण्यात वीरता आहे. तुम्ही कसे जगता हे केवळ महत्त्वाचे नसून तुम्ही मृत्यू कसे पावता हेसुद्धा तुमच्या स्वातंत्र्याचा भाग बनते. अहिंसा निर्माण करते नवा मनुष्य. 

गांधीजींनी म्हटले की, अहिंसा रणनीती म्हणून वापरणार असाल तर त्याची किंमत कवडी समान आहे. तसेच रणनीती म्हणून अहिंसा आपल्यासाठी कोणत्याही कामाची नाही. कारण रणनीती ही युद्धभूमीवर लढण्यास उतरणारा सैनिक किंवा सेनापती शत्रूची क्षमता आणि आपली क्षमता याची तुलना करून आखतो. त्यामुळे पूर्वी कधी कोणाच्या कामी आलेली अहिंसेची रणनीती आपल्याला उपयोगी ठरेल, असे शक्य होणार नाही. म्हणून अहिंसा जेव्हा एक मूल्य बनून आपल्या समोर येते तेव्हा ती आपल्याला सर्वप्रथम एक नवा मनुष्य बनविते आणि त्यानंतर लढ्यात उतरविते. कालपर्यंत जग जी लढाई शस्त्राने लढत होते, गांधीजींनी तीच लढाई शस्त्रांचा वापर न करता लढली. त्यानंतर असे दिसून आले की, लढाई तर अहिंसक झाली, बाह्य शस्त्रे हातातून गळून पडली आणि माणूस स्वतःच अहिंसात्मक शस्त्राचे रूप बनला. हिंसा आपल्या हातात संहार किंवा प्रहार करण्यासाठी कोणते ना कोणते साधन घेऊन अस्तित्वाला येते आणि पुढे जाऊन अणुबॉम्बपर्यंत पोहोचते. याउलट अहिंसा आपल्या हातात काहीही न घेता सुरू होते आणि अंतिमतः ती  मानवालाच अहिंसात्मक शस्त्र बनविते. तेथूनच तुमचे चालणे, बोलणे, म्हणणे याची कसोटी सुरू होते. तिथून जन्मलेली अहिंसा पुढे उच्चस्थानीही पोहोचते. गांधीजींनी अहिंसेचे मांडलेले हे तत्त्वज्ञान आज संपूर्ण जग अभ्यासत आहे.

बॅरिस्टर मोहनदास ते महात्मा गांधीजी बनण्यापर्यंतच्या प्रवासात गांधींनी स्वतःशीच लढलेली लढाई सर्वांत महत्त्वाची आहे. आज जगात क्वचितच एखादा मानव त्यांच्याइतकी स्वतःशी लढाई लढला असेल. गौतम बुद्ध यांनीसुद्धा स्वतःशी अशीच लढाई लढली. मात्र ते वैराग्याचे जीवन जगले. गांधीजी सांसारिक जीवनाच्या मैदानातच आपल्या साधनेची लढाई लढताना दिसतात. ते कोणतीही सिद्धी प्राप्त करून आपल्या समोर येत नाहीत. मला जे ज्ञान प्राप्त झाले आहे ते तुम्हाला द्यायचे आहे, असे ते म्हणत नाहीत. ते लोकांच्या संघर्षातच ज्ञान शोधतात आणि ज्ञान ग्रहण करतात. त्याच ज्ञानाची दीक्षा ते लोकांना देतात. लोकांना त्या ज्ञानाची दीक्षा मिळणे हीसुद्धा एक खरी कसोटीच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जे ज्ञान लोक ग्रहण करू शकत नसतील, पारखू शकत नसतील आणि दैनंदिन जीवन जगताना त्या ज्ञानाचा वापर केला जात नसेल, तर असे ज्ञान कोणत्याही कामाचे नाही, असे गांधीजींचे विचार होते. मूल्याचा स्वभाव हा मुळापर्यंत जाण्याचा असतो. याउलट रणनीती नेहमी कातडीपर्यंत पोहोचल्यानंतर दम तोडते. जगण्यासाठी श्वासाची गरज असते. म्हणून ऑक्सिजनचा सिलिंडर सोबत घेऊन फिरणे हा पर्याय होऊ शकत नाही. हिंसा-अहिंसा याबाबतही असेच म्हणता येईल. हिंसा, क्रोध किंवा घृणा या गोष्टी खूपच मर्यादित काळापर्यंत जिवंत राहू शकतात.  कितीही जोर लावला तरी द्वेषमूलक भाव हळूहळू कमी होत जातो. त्यातील निरर्थकता लक्षात येऊ लागते. मात्र ही वस्तुस्थिती स्वीकारण्यास आपले मन तयार होत नाही. त्यातून  पूर्णपणे बाहेर पडण्यास आपले आत्मबळ कमी पडते. दक्षिण आफ्रिकेचे जनरल स्मट्स यांनी हेच लिहिले होते की, बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी माझी लढाई तुमच्यासोबत आहे; पण मी तुमच्या सोबत कसे लढू? कारण माझ्या प्रत्येक संकटात तुम्ही ढाल बनून येता. हिंसा बदला घेण्याचे सुख देते, विजयाचा अनुभवही करून देते; मात्र तो कायमस्वरूपी टिकत नाही. अहिंसा ही एकाच वेळी किंवा दोघांना सोबत घेऊन विजयापर्यंत घेऊन जाते.

उत्पादनाचे विक्रेंद्रीकरण आधुनिक अर्थशास्त्र आणि अर्थतज्ज्ञ चिंतेत आहेत की, विकासासाठी भांडवलाची गरज असते. मात्र जेव्हा भांडवल, पैशाचा मोठा संचय होतो तेव्हा मात्र त्याचे स्वरूप व्यक्तीकेंद्रित असते. यामुळे एकट्या व्यक्तीचाच फायदा होऊन समाजाचा मात्र विकास होत नाही. भांडवल गरजेचे आहे; मात्र त्याचे केंद्रीकरण व्हायला नको. कार्ल मार्क्स यांनी म्हटले आहे की, पैसा व्यक्तीच्या हातात नाही तर राज्याच्या हातात असला पाहिजे. साम्यवादसुद्धा याच दृष्टिकोनातून उदयाला आला आहे. मात्र जेव्हा व्यक्तीच्या हातातील पैसा राज्यांच्या हातात गेला तेव्हा नव्या भांडवलशाहीने जन्म घेतला. ज्याला ‘स्टेट कॅपिटॅलिजम’ म्हटले जाते. युगोस्लाव्हियाच्या साम्यवादी क्रांतीचे जनक असलेल्यांपैकी एक असणार्‍या मिलोवान जिलास यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, राज्याच्या हातात पैसे देण्याचा आम्ही जो साम्यवादी प्रयोग केला, त्यामुळे समाजात एक नवीनच वर्ग निर्माण झाला. त्या वर्गाच्या हातात पैसा आणि सत्तेचे केंद्रीकरण झाले आहे. असे जगाच्या इतिहासात प्रथमच घडले. यामुळे समाज एका नव्या गुलामीत बांधला गेला. गांधीजी म्हणत की, उत्पादनाच्या विकेंद्रीकरणाशिवाय पैशाचे विकेंद्रीकरण होणार नाही. त्यामुळे उत्पादनाचे विकेंद्रीकरण झाल्यास समाज लहान-सहान भांडवल गोळा करून आपले स्वातंत्र्य, समता आणि आवश्यक असलेल्या गरजा पूर्ण करण्यास समर्थ बनेल. गांधीजी सांगत की, उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील अंतर कमी केल्याशिवाय एकत्रित भांडवलाचे दुष्परिणाम नाहीसे करता येणे शक्य नाही. गांधीजींचा खादी-ग्रामोद्योग केवळ कपडे तयार करणे आणि पापड लाटण्यापुरता मर्यादित नव्हता, तर भांडवलशाही आणि सत्ता यांच्यातील मिलीभगत तोडण्याची ती क्लृप्ती होती. आज जगभरात जेव्हा मंदीचे वातावरण दिसत आहे. विशेष म्हणजे जगभरातील सर्व अर्थतज्ज्ञ एकत्र येऊन विचारमंथन करुनही लांबलेल्या मंदीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यात यशस्वी झालेले नाहीत. अशा वेळी गांधीजींचा अर्थशास्राचा हा प्रयोग सर्वांसाठी लाभदायक ठरू शकतो.

गांधीजींचा ‘राष्ट्रवाद’ हा व्यक्तीच्या वैयक्तिक प्रतिष्ठेशी आणि स्वाभिमानाशी जोडलेला आहे. तो समूहाशी किंवा गर्दीशी जोडलेला नाही. गांधीजी नेहमी सुराज्याविषयी नव्हे तर स्वराज्याविषयी बोलत असत. कारण त्यांचे म्हणणे होते की, स्वराज्यच सुराज्य आहे. आज हीच बाब  गाजावाजा करून ‘राष्ट्रवाद’ म्हणून समाजाच्या मनात ठसवली जात आहे. परंतु हा राष्ट्रवाद देशाचे विभाजन करुन आपले स्वामित्व प्रस्थापित करण्याची  कपटी चाल आहे. स्वराज्यात निवडीचे स्वातंत्र्य असते. राष्ट्रवादात मात्र तुमची निवड केली जाते, हा फरक लक्षात घ्या. राष्टवादासाठी धर्म एक शस्त्र आहे ज्याने आपल्यापेक्षा कमकुवत असणार्‍यांची मान छाटली जाऊ शकते.  धर्माचा असा उपयोग होत नसता तर आजचे सर्व धर्माभिमानी एका क्षणात धर्म बदलताना दिसले असते. गांधी म्हणतात की, माणसाच्या अंतर्मनातील, प्रत्येक माणसाच्या हृदयात लपलेल्या भावनांना जागृत करणे हाच सर्वात मोठा धर्म आहे.

गांधींचे विचार समजून घेणे आणि त्यानुसार जगणे सोपे नाही. केवळ वाचन करून, कर्मधर्म करून, प्रतीकांचा उपयोग करून गांधीविचार आपल्या मनात आणि कृतीतून उतरू शकत नाहीत. गांधीजी आपल्या मनात, समाजात जिवंत ठेवायचे असतील तर केवळ त्यांच्या प्रतिमेची पूजा करुन चालणार नाही; तर त्यांच्या विचारांच्या दिशेने थोडेफार अंतर तरी पार करावे लागेल.