महामार्गालगत असणारी "शोभेची" गटारे

शहरातील भाग वगळता राष्ट्रीय महामार्गावरील बहुतांश गटारे ही शोभेचीच वस्तू. शहरात एकवेळ पावसाआधी कचऱ्याने तुंबलेली गटारे साफ करण्याचा घाट घातलेला असतो, बाकीकडे तेही होत नाही.

Story: भवताल | डॉ. राघव गाडगीळ |
01st October 2022, 10:37 pm
महामार्गालगत असणारी "शोभेची" गटारे

सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधून ठेवलेल्या रस्त्यालगत गटारांमध्ये क्वचितच पाणी वाहताना मी पाहिले आहे. अगदी कुतूहलापोटी डोकावून पाहूनसुद्धा पाण्याचा लवलेशही आत शिरलेला दृष्टीस पडला नाही. पण माझ्या पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर मला एवढे माहीत आहे की ही सुविधा रस्त्यावरचे सांडपाणी किंवा पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी केली असावी. शहरातील भाग वगळता राष्ट्रीय महामार्गावरील बहुतांश गटारे ही शोभेचीच वस्तू. शहरात एकवेळ पावसाआधी कचऱ्याने तुंबलेली गटारे साफ करण्याचा घाट घातलेला असतो, बाकीकडे तेही होत नाही. गोव्यातील बहुतांश रस्ते हे सपाट असून, पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असलेला उतार हा त्या रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदाराच्या डोक्यातच नसावा म्हणून प्रत्यक्षात तयार झाला नाही. त्यामुळे मुळात पाणी एका दिशेने वाहून जाण्याचीच वानवा असल्याने त्यात गटारांचा काय दोष? पाण्याविना बिचारी गटारे पोरकी झाल्यासारखी वाटतात. पाणी न मिळाल्याने या गटारांना फक्त कचरा, पालापाचोळा, बाटल्या यांचाच काय तो सहवास लाभतो. ताजी ताजी बांधून झाल्यावर गटारे एकदम ऐटीत पाण्याची वाट बघत असतात खरी, पण काय करणार, त्यांच्या आनंदावर विरजणाची तरतूद आधीच तयार!

रस्त्यालगत गटारे बांधण्याची संकल्पना मुळात तशी खूपच उपयोगी पडेल या हेतूने केली होती. पाणी पट्कन व्यवस्थित वाहून जाऊन रस्त्यावरील वाहनांना त्याचा जास्त त्रास होऊ नये हाच त्यामागचा उद्देश. पण आजच्या कंत्राटदारांनी "कर्म करीत राहा आणि फळाची अपेक्षा ठेवू नका" हा भगवतगीतेतील संदेश आपल्या सोयीप्रमाणे अर्धा आणि मोडतोड करून अंगीकृत केलेला दिसतो. मुद्दाम चुकीचे "कर्म" करावे आणि त्यातून भरभरून पुनःपुन्हा "फळं" (पैसा) खात राहावा असा संदेश समजून घेतला आहे असे मला वाटते. एकीकडे तर मी असेही पाहिले आहे की आधी असलेले गटार स्वच्छ न करता तीत काहीतरी उणीव आहे असे भासवून त्याची पुनर्बांधणी आधी होती तशीच केली. अन्य वेळी तर गटारे बांधतानाच त्यात सिमेंट, रेती व तत्सम कचरा पडला असता तो तसाच ठेवून कामगार पसार झालेले दिसले. या गटारांच्या बाजूच्या भिंती तर अशा उत्तुंग बांधलेल्या असतात की पावसाचे पाणी उडी मारून सुद्धा पोहोचू नये. अतिमहत्त्वाचे म्हणजे या गटारांचा उगम आणि शेवट कुठे होतो हा सदोदित एक अतिकठीण कोड्यासारखाच मला सतावतो. कधीकधी तर गटारात पाण्याची पोहोचण्याची वाट एवढी किचकट आणि वेडीवाकडी ठेवलेली असे की पाण्यालाच कंटाळा येऊन "चला आपण बाहेरूनच वाहूया" असा निर्णय घ्यायला भाग पडे. एकदा गटारात शिरल्यावर खळखळ वाहणाऱ्या पाण्याने पुढची वाट बंद झाल्याने अचानक जायचे तरी कुठे. एकदा मी स्वतःची गाडी बाजूला लावून तिथे असलेल्या पर्यवेक्षकाला प्रश्न विचारला होता. अचानक कोणीतरी जाब विचारल्याने आधी काहीसा गोंधळून जाऊन पण नंतर पोकळ आत्मविश्वासाने मला म्हणाला "त्याची चिंता तू करू नकोस, आम्ही व्यवस्था करू". माझ्यासारख्या लोकांकडून आकारण्यात आलेला कराचा उपयोग चुकीचा होतोय एवढेच मला कळत होते. 

जास्तसे कंत्राटदार असे आडदांड शरीरयष्टी असलेले, पांढरा शर्ट घातलेले, खाली एखादी जीन्स, डोक्यावर टोपी, तोंडात तंबाखू चघळत किंवा सिगारेटी ओढत एका राजाच्या ऐटीत रोजंदारी कामगारांना राबवून घेताना दिसतात. त्यांनी जरी व्यावसायिक शिक्षण घेतले असले (किंवा नसले) तरी व्यवहार ज्ञान व त्याला आधार म्हणून "अक्कल" असावी. कंत्राट मिळाले आहे म्हणून बांधायची औपचारिकता करणे हे "कर्म" नव्हे. व्यवस्थित न बांधल्याने काय त्रास होऊ शकतो याचा पूर्व विचारच कधी होत नसावा किंवा "आधी बांधूया, मग काय होते त्याचेकडे नंतर पाहू" असा हलगर्जी युक्त विचार कारणीभूत असावा. ठिकठिकाणची गटारे एकमेकांशी व्यवस्थित जोडली न गेल्याने ही पूर्ण व्यवस्थाच निष्फळ ठरते. पाणी साठल्यामुळे वाहन चालकाचा रस्त्याच्या कडेचा अंदाज चुकून मोठी दुर्घटना घडू शकते. पण या अपघाताचे कारण अप्रत्यक्षपणे गटार बांधणारा कंत्राटदार जरी असला तरी त्याच्यावर हा आळ कधीच येत नाही.

पाण्याच्या निचऱ्याची ही समस्या एवढी तीव्र असतानाही सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंते याकडे दुर्लक्ष करतात याचे दुःख होते. एकतर त्यांनी गटारे बांधण्याआधी त्या जागेचा उंचसखल भागाचा नकाशा तयार करून संगणकाद्वारे पाणी कसे वाहेल याचे सिम्युलेशन (simulation) करायला हवे किंवा पुस्तकी व्यावसायिक शिक्षणाचा काही उपयोग होतो की नाही हे तपासायला हवे. शास्त्रशुद्ध आणि अनेक बारकावे अभ्यासून हे काम करायला हवे. गरज पडल्यास कंत्राटदारांना काही प्रमाणात तांत्रिक प्रशिक्षण सुद्धा द्यावे. गटारे बांधून झाली की त्यातून पाणी वाहते की पाणी तोंड फिरवते याची शहानिशा व्हायला हवी. रस्त्याचा उतार-चढावही याठिकाणी लक्षात घ्यायला हवा. तसेच रस्त्याच्या बाजूला चर खोदून झाल्यावर जी जमीन भुसभुशीत होते ती पूर्ववत व्हावी याकडेही दुर्लक्ष करू नये. साधारणपणे बांधून झाल्यावर गटारांवर आच्छादने टाकून ती व्यवस्थित वरून बंद करण्यात यावी जेणेकरून त्यात जनावरे अथवा अपघात प्रसंगी वाहने पडू नयेत.

शेवटी कसे आहे, काम करणाऱ्या माणसाने आळस टाकून, स्वतःची नैतिक जबाबदारी समजून, डोके ठिकाणावर ठेवून, केवळ औपचारिकता म्हणून नव्हे तर कर्तव्यभान मनात बाळगून काम करावे. असे केल्याने काम तडीस जाईलच यात काडीमात्र शंका नाही. त्यास जोड म्हणून माझ्यासारख्या व्यक्ती टीका न करता प्रशंसेचे परिच्छेद लिहितील.