संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांना कळवा

कायदा हातात न घेण्याचे पोलीस अधीक्षक धानिया यांचे आवाहन

|
30th September 2022, 12:17 Hrs
संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांना कळवा

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

मडगाव : मुले पळवणारा म्हणून लोकांनी मारहाण केल्यास काही अनुचित घडून अडचणी निर्माण होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीवर संशय असल्यास लोकांनी कायदा हातात न घेता घेउ ११२ क्रमांकावर कॉल करावा किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी, असे आवाहन दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी केले आहे.                     

राज्यात मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा पसरली आहे. महाराष्ट्र, बिहार, उत्तरप्रदेश यांसह गोव्यातही समाजमाध्यमांवर संदेशाद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. यातून एकप्रकारची भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे. 

यामुळे संशयास्पद व्यक्ती आढळल्यानंतर जमावाद्वारे सदर व्यक्तीला मारहाण करण्याचे तीन प्रकार दक्षिण गोव्यात घडले आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक धानिया यांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले. राज्यात मुले पळवणारी टोळी नाही, लोकांनी सतर्क राहावे; पण भीतीपोटी संशयास्पद व्यक्तीला मारहाण करू नये. मंगळवारी खारेबांध वास्को येथे ५२ वर्षीय मनोरुग्ण व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर वास्को पोलिसांनी गुन्हा नोंद करून व्हायरल व्हिडिओवरून ओळख पटवून तिघांना अटक केली आहे. आता बेताळभाटी येथील व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. धानिया यांनी सांगितले की, बेताळभाटी येथील घटना थोडी वेगळी आहे. मद्यपान केलेला व्यक्ती घरात घुसू पाहत असल्याची शंका आल्याने लोकांनी त्याला पकडले. एखादी संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास स्थानिक पोलिसांना याची माहिती द्या. पोलिसांना त्याची चौकशी करू द्या. जमाव करून मारहाण केल्यास प्राणघातक ठरू शकते, एखाद्याचा जीव जाऊ शकतो व नागरिक अडचणीत येऊ शकतात. गस्तीवर पोलीस अशा घटनांची शहानिशा करतील. कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी केले.

मडगाव, वास्को येथेही मारहाणीची घटना 

मडगाव मोतीडोंगर येथे २० सप्टेंबर रोजी मोहम्मद जमशेर या भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीला मुले पळवणारा असल्याच्या संशयातून जमावाकडून मारहाण झाली होती. २७ सप्टेंबरला वास्को खारेबांध परिसरात मनोरुग्ण व्यक्ती मुलासोबत उभी असल्याचे पाहून मुले चोरणारा समजून जमावाने मारहाण केली होती. फातोर्डा हॉस्पिसिओ इस्पितळासमोर भिकारी हा मुले पळवणारा असल्याची माहिती सुरक्षारक्षकाने दिली. चौकशीवेळी तो भिकारी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बुधवारी बेताळभाटी येथील व्हिडिओ व्हायरल झाला होता.