मुलांना आई वडिलांकडून वस्तू नको, वेळ हवा!

आजची मुले ही भावी समृद्ध भारताचा भक्कम पाया आहेत, असे नेहमीच म्हटले जाते. मग, हा देशाचा भक्कम पाया अधिक मजबूत होण्यासाठी आजच्या मुलांचा विकास व त्यांचे मूळ शिक्षण हे जर नीट व यथासांग झाले, तरच आपल्या देशाची ही भावी पिढी अधिक मजबूत होईल.


16th September 2022, 11:10 pm
मुलांना आई वडिलांकडून वस्तू नको, वेळ हवा!

मूल जेव्हा बाल्यावस्थेत असते, तेव्हा त्यांच्या विकासासाठी पहिली आठ वर्षे ही अधिक महत्त्वाची असतात. याच काळात त्यांचे आरोग्य, वाढ आणि विकासाचा पाया घातला जातो. मुलांच्या शिक्षणाचा, त्यांच्या आकलनशक्तीचा वेग याच काळात अधिक असतो. या वयात तसेच किशोरावस्थेत मुलांना जर आपल्या आई वडिलांचे प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन, मानसिक पातळीवरील चालना, योग्य मार्गदर्शन, संरक्षण व पोषक आहार मिळाल्यास मुले उत्साहाने शिकतात. त्यांची शैक्षणिक,  मानसिक आणि बौद्धिक वाढही व्यवस्थित होते.

मुलांच्या याच वयात नीट काळजी घेतली व त्यांचे संगोपन नीट केले, तर या सर्वांचा परिणाम त्यांच्या पुढील आयुष्यावर होतो. मुले जन्म घेताच काही ना काही शिकत असतात. ती जसजशी मोठी होत जातात, तसतशी त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना दिल्यास, त्यांच्या कुतूहलांचे योग्य निरसन केल्यास त्यांची सामाजिक, बौद्धिक, भावनिक वाढ व विकास योग्य रितीने होतो. सुरुवातीची काही वर्षे आपल्या आई वडिलांचे प्रेम, त्यांनी घेतलेली काळजी यामुळे आई वडील व मुले यांच्यात अतूट भावनिक बंध निर्माण होतो. त्यामुळे आपल्या आई वडिलांच्या सुरक्षित छायेखाली वाढलेली मुले मोठेपणीही आपल्या आई वडिलांशी आपला भावनिक बंध जपून असतात. 

आई-वडील व मुले यांच्या नात्यांचे स्वरूप हे मुलांच्या कोवळ्या मनावर फार मोठा परिणाम करत असतं. आई वडील जर मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नसतील, तर अशी मुले पाळणाघरात किंवा एखाद्या आयाच्या किंवा कामवालीच्या देखरेखीखाली वाढतात. पाळणाघराची संचालिका जर मुलांना आदर्श गोष्टी शिकवणारी असेल व तेथे मुलांची जर योग्य रितीने काळजी घेतली जात असेल, तर ठीक. नाहीतर अस्वच्छ पाळणाघरे, तेथील मुलांची निगा राखणार्‍या बाया यांच्या वागणुकीचा मुलांच्या कोवळ्या मनावर व शरीरावर नकळत वाईट परिणाम होत असतो. आई वडील जर दोघे नोकरी करणारे असतील आणि घरी जर कोणीच ज्येष्ठ व्यक्ती नसेल, तर अशांच्या मुलांना कधी कधी घरातच एखादी आया किंवा कामवाली यांच्या हवाली केले जाते. या बायका जास्त करून अशिक्षित असतात. कितीही झाले तरी आईवडील ज्या प्रेमाने, काळजीने आपल्या बाळाचे संगोपन व काळजी घेतात, तसे संगोपन त्यांच्याकडून होणे कठीणच असते. मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍नही निर्माण होतो, तो वेगळाच. 

लहान मूल कितीही रडले, कितीही हट्ट केला, तरी आई वडील आपल्या मुलांची समजूत काढतात, त्यांच्या कलाने घेतात. एखादी गोष्ट किती वाईट आहे, किंवा एखादी गोष्ट किती चांगली आहे, हेे आपल्या मुलाला नीट उदाहरणासह पटवून देतात. त्यामुळे चांगले काय व वाईट काय याची ओळख मुलांना नीट होते. परंतु, मुलाला सांभाळणारी आया किंवा कामवाली मुलांना अशा गोष्टी नीट समजवू शकणार नाही. कधीकधी मुलाने हट्ट केला, तर आई वडील समजुतीने घेऊन ती वेळ निभावून नेतात. मुलाला सांभाळणारी आया किंवा बाई अशा प्रकारची वर्तणूक करणार नाही. लहान मुलाने हट्ट केला, किंवा लहान मुलाने जेवण्यास नकार दिला, तर काही काही वेळेस या बायका उग्र स्वरूप धारण करून मुलांना इजा करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत, अशा प्रकारच्या बातम्या आपण वाचल्या असतील किंवा प्रसारमाध्यमांतून आपण पाहिले असेल. घरात सीसीटीव्ही कॅमेरा असेल, तर अशा बायकांचे खरे स्वरूप आपल्याला कळू शकते. परंतु तोपर्यत भयानक परिस्थितीला सामोरे जाण्याची पाळी कधी कधी ओढवते.

आपल्या आईवडिलांशी मुलांचा भावनेचा व सुरक्षेचा बंध निर्माण करण्यासाठी मुलांना आपला मौल्यवान वेळ देणे अतिशय गरजेचे आहे. मुलांना आपण वेळ देत असतो, म्हणजे एकप्रकारची आपण मोठी गुंतवणूक करत असतो. आजच्या मुलांना चांगल्या पालकांपेक्षा शहाण्या पालकांची गरज आहे. असे पालक की ते आपल्या मुलांच्या गरजा समजून घेतील. मुलांच्या भौतिक गरजा पुरवणे किंवा त्यांच्या सुखासाठी त्यांना मोठ्या रकमेच्या वस्तू आणून देणे यातच काही पालक समाधानी असतात. त्यांची भावनिक गरज काय आहे, याकडे त्यांचे दुर्लक्ष होत असते. ज्या वयात मुलांना काही कळत नाही, त्यांना व्यावहारिक जगाची जाणीव नसते, तेव्हाच खरं तर पालकांनी त्यांना जपले पाहिजे. आपले आई बाबा आपल्या सोबत खेळतात, आपल्याला गोष्ट सांगतात, आपली एखादी साधी गोष्टही मन लावून ऐकतात, याचा त्यांना फार आनंद होत असतो. आपल्या अशा वागण्यातूनच ती शिकत असतात, त्यांचे मन यातच आकार घेत असते. पालकांनी आपल्या मुलांसाठी सतर्क, सजग राहिले तर मुलांना एक भक्कम भावनिक पाठिंबा मिळत असतो. 

मुलांना चैनीच्या वस्तू आणून दिल्या, त्यांचे नको ते लाड पुरवले, म्हणजे आपण त्यांच्यासाठी खूप काही करतो, असा काही जणांचा समज असतो, तो सर्वथा चुकीचा आहे. पुढे हीच मुले मग आपला हट्ट पुरवून घेण्यासाठी नको त्या वस्तूंची मागणी करत असतात आणि मग वाद सुरू होतो. मुलांनी चैनीच्या वस्तूंसाठी हट्ट केला, तर त्यांना योग्य तर्‍हेने सांगितल्यास ती ऐकतात. पण, त्यासाठी त्यांना वेळ देणे गरजेचे आहे. त्यांना चांगले काय व वाईट काय या गोष्टींची समज येण्यासाठी त्यांना लहान वयातच या गोष्टींची माहिती होणे गरजेचे आहे. 

आपण हे लक्षात घेतले पाहिजे, की मूल आपल्याला जन्म द्यायला सांगत नाही. आपण आपल्या आनंदासाठी मुलांना जन्म देतो. त्यांना वेळ देणं, त्यांना गोष्टी सांगणं, त्यांना ऐकून घेणं, त्यांचे लहान सहान हट्ट पुरवणं, त्यांच्या चांगल्या कामाचे कोडकौतुक करणं, त्यांच्या गरजा भागवणं, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणं, त्यांच्या सोबत लहान होऊन खेळणं, घरातल्या निर्णयात त्यांना ही स्थान देणं आणि सर्वांत म्हणजे त्यांना चांगल्या व वाईट गोष्टींविषयी नीट समजावून सांगणं या सर्वांसाठी मुलांना आपला मौल्यवान वेळ देणे हे इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक मौल्यवान आहे.