भारतामुळेच लोकशाहीची क्षमता जगाला समजली

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून संबोधन


15th August 2022, 12:05 am
भारतामुळेच लोकशाहीची क्षमता जगाला समजली

नवी दिल्ली : स्वातंत्र्य मिळाले तेव्हा अनेकांना भारतात लोकशाही यशस्वी होईल की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, शंका उपस्थित करणाऱ्यांना आपण चुकीचे सिद्ध केले आहे. अलीकडच्या काळात जगाने एक नवीन भारत उगवताना पाहिला आहे. आधुनिक भारताच्या निर्मात्यांनी प्रत्येक प्रौढ नागरिकाला राष्ट्रनिर्मितीच्या सामूहिक प्रक्रियेत सहभागी होण्यास सक्षम केले आहे. आज भारतामुळेच जगाला लोकशाहीची क्षमता समजली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. 

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून त्यांनी पहिलेच भाषण केले. सुरुवातीला त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. त्या पुढे म्हणाल्या, अनेक देशांमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. आपण स्वातंत्र्यापासूनच सार्वत्रिक प्रौढ मताधिकार स्वीकारला आहे. आपण आपल्या देशाचे रक्षण केले पाहिजे. आपल्याकडे जे काही आहे, ते आपल्या मातृभूमीने दिले आहे. म्हणूनच आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी, प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. हा उत्सवाचा काळ आहे. 

देशाच्या आशा मुलींवर आहेत !

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, भारताच्या नव्या आत्मविश्वासाचा स्रोत देशातील तरुण, शेतकरी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महिला आहेत. सामाजिक आणि राजकीय प्रक्रियेत त्यांचा वाढता सहभाग निर्णायक ठरेल. आज आपल्या पंचायती राज संस्थांमध्ये निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींची संख्या चौदा लाखांहून अधिक आहे. आपल्या देशाच्या अनेक आशा आपल्या मुलींवर आहेत. योग्य संधी मिळाल्यास ते मोठे यश मिळवू शकतात. आमच्या मुली फायटर पायलटपासून ते अंतराळ शास्त्रज्ञापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत.

करोना महामारीवर मात करण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, गेल्या दोन ते तीन वर्षांत जगात करोना महामारीने थैमान घातले होते. जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम भारतात पार पडली. गेल्या महिन्यात भारताने २०० कोटींच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडला. करोनाचा सामना करताना भारताने अनेक विकसित देशांपेक्षा चांगली परिस्थिती हाताळली. आज भारत पुन्हा वेगाने वाटचाल करत आहे.

आदिवासी महानायक संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणास्रोत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, घरोघरी तिरंगा मोहीम सुरू आहे. आज आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात तिरंगा अभिमानाने फडकत आहे. गेल्या वर्षीपासून १५ नोव्हेंबर हा ‘आदिवासी गौरव दिन’ म्हणून पाळण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. आमचे आदिवासी महानायक हे केवळ स्थानिक किंवा प्रादेशिक प्रतीक नाहीत, तर ते संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणास्रोत आहेत. मी देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या मूलभूत कर्तव्यांबद्दल जाणून घेण्याची विनंती करते. त्यांचे पालन करा, जेणेकरून आपला देश नवीन उंची स्पर्श करू शकेल.

हेही वाचा