राज्यात पर्यटकांच्या संख्येत वाढ

पणजी शहरात वाहतूक कोंडी : तिरंगा यात्रांचे ठिकठिकाणी आयोजन


14th August 2022, 11:30 pm
राज्यात पर्यटकांच्या संख्येत वाढ

पणजी : सलग सुट्ट्या असल्याने राज्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. पर्यटकांची वाहने तसेच ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेमुळे रविवारी वाहतूक कोंडी झालेली दिसून आली. पणजी शहरात सायंकाळच्या वेळी रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सध्या श्रावण महिना सुरू आहे. त्यात पावसाचे प्रमाणही काही दिवस कमी आहे. यात शनिवार, रविवारी आणि सोमवार असे तीन दिवस सलग सुट्टी असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात राज्यात दाखल झाले आहेत. हॉटेलांचे रुम ९० टक्केपर्यंत फुल्ल झाल्याचे दिसून आले. स्थानिकांनाही सुटी असल्याने आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाल्याचे दिसून आले.

शनिवार आणि रविवारी सरकारी कार्यालयांना सुटी असते. पणजी शहरातील अनेक दुकाने रविवारी बंद असतात. यामुळे रविवारी वाहनांची रहदारी कमी असते. नेहमीपेक्षा फारच कमी वाहने रस्त्यावर दिसतात. मात्र, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वीचा रविवार याला अपवाद ठरला.

आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शनिवारपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. रविवारी आल्तिनो येथे तिरंगा रॅली काढण्यात आली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत शहरात मूकमोर्चा काढण्यात आला. यामुळे वाहने तसेच लोकांची गर्दी शहरातील रस्त्यांवर दिसत होती. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.

मुंबई, पुणे तसेच कोकणातील पर्यटक गाड्या घेऊन राज्यात सुटीचा आनंद लुटण्यासाठी दाखल झाले आहेत. यामुळे पणजी शहरात वाहनांची संख्या वाढलेली दिसत होती. शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झालेली दिसून आली.

पणजीसह मडगाव, वास्को, म्हापसा, फोंडा या शहरातही तिरंगा रॅली काढण्यात आल्या. यामुळे त्याठिकाणीही रविवार असूनही वाहनांची गर्दी दिसून येत होती.

हॉटेल फुल्ल

पावसाचे प्रमाण कमी असल्याने समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी दिसून आली. हॉटेलही तेजीत दिसून आली. ९० टक्के हॉटेल फुल्ल झाल्याची माहिती टीटीएजी संघटनेने दिली. पावसाळ्यात पर्यटकांची संख्या कमी असते. त्यामुळे अनेक हॉटेलमधील खोल्या रिकाम्या असतात. मात्र, रविवार, सोमवार असे दोन दिवस सुटी असल्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे. 

हेही वाचा