झिंबाब्वे ही मालिका २-१ ने जिंकेल

फलंदाज इनोसेंट कैयानचा टीम इंडियाला इशारा : १८ रोजी पहिला सामना


15th August 2022, 02:22 am
झिंबाब्वे ही मालिका २-१ ने जिंकेल

हरारे : टीम इंडिया झिंबाब्वे दौऱ्यावर आहे. येथे भारतीय संघ केएल राहुलच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. १८ ऑगस्टपासून दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला इशारा देताना झिंबाब्वेचा फलंदाज इनोसेंट कैयाने भाकीत केले आहे. तो म्हणाला की, झिंबाब्वे ही मालिका २-१ ने जिंकेल.            

ही मालिका आम्ही २-१ ने जिंकू, असा इशारा झिंबाब्वेचा युवा फलंदाज इनोसंट कैयाने भारतीय संघाला दिला. या मालिकेत मी शतक झळकावू शकेन आणि संपूर्ण मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनणार, अशी माझी इच्छा असल्याचेही तो म्हणाला.             

विजय हेच माझे ध्येय आहे, असेही इनोसंट म्हणाला. त्याचबरोबर झिंबाब्वेचा कर्णधार क्रेग एर्विन आणि इतर खेळाडूंच्या दुखापतीवर तो म्हणाला की, यामुळे संघाला काही अडचण येईल यावर माझा विश्वास नाही. आमच्या संघात सध्या काही खेळाडू आहेत, त्या सर्वांमध्ये बाहेर झालेल्या लोकांची जागा घेण्याची क्षमता आहे.            

भारताचा शानदार आहे इतिहास            

भारताने झिंबाब्वेमध्ये आतापर्यंत २३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान संघाने १९ सामने जिंकले आहेत. तर फक्त ४ सामने हरले. टीम इंडिया प्रदीर्घ कालावधीनंतर झिंबाब्वेमध्ये पोहोचली आहे. भारताने शेवटची एकदिवसीय मालिका २०१६ मध्ये खेळली होती. यादरम्यान भारताने ३-० ने विजय मिळवला. भारताने पहिला एकदिवसीय सामना ९ गडी राखून आणि दुसरा एकदिवसीय सामना ८ विकेटने जिंकला. तर तिसरा सामना १० गडी राखून जिंकला.            

कसा असू शकतो भारतीय संघ?            

एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत वेस्ट इंडिजचा पराभव केल्यानंतर टीम इंडिया आता झिंबाब्वे दौऱ्यावर आहे. १८ ऑगस्टपासून दोन्ही देशांदरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. पहिल्या वनडेत भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते यावर एक नजर.            

राहुलकडे भारताचे नेतृत्व            

झिंबाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय मालिकेत शिखर धवनची टीम इंडियाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती, मात्र स्टार फलंदाज केएल राहुल फिट झाल्यानंतर बीसीसीआयने त्याच्याकडे संघाची कमान सोपवली होती.            

राहुल, धवन सलामीला            

या मालिकेत शुभमन गिल आणि शिखर धवन डावाची सुरुवात करतील असे मानले जात होते, मात्र आता राहुलच्या पुनरागमनाने शुभमन गिलचे नाव छाटले आहे. कर्णधार केएल राहुल आणि वरिष्ठ फलंदाज शिखर धवन पहिल्या एकदिवसीय सामन्यात डावाची सुरुवात करतील.            

त्रिपाठीला मिळू शकते स्थान            

मधल्या फळीबद्दल बोलायचे तर राहुल त्रिपाठीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. यानंतर चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, पाचव्या क्रमांकावर दीपक हुडा आणि सहाव्या क्रमांकावर संजू सॅमसन खेळणार आहेत.            

गोलंदाजी विभागाबाबत बोलायचे झाले तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव फिरकी विभाग सांभाळतील. याशिवाय शार्दुल ठाकूर, महम्मद सिराज आणि दीपक चहर यांच्याकडे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल.