धेंपो क्लबकडून स्पोर्टिंग क्लब दी गोवा पराभूत

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st April, 11:44 pm
धेंपो क्लबकडून स्पोर्टिंग क्लब दी गोवा पराभूत

वास्को : आय-लीग स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची स्पोर्टिंग क्लब दी गोवाची आशा रविवारी संपुष्टात आली. वास्कोच्या टिळक मैदानावर झालेल्या द्वितीय विभागीय आय-लीग स्पर्धेत त्यांना गोव्याच्याच धेंपो स्पोर्टस् क्लबकडून १-० अशा पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यातील महत्त्वाचा गोल ५१व्या मिनिटाला शुभम रावत याने नोंदविला.

पात्र ठरण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी स्पोर्टिंगला रविवारी विजय आवश्यक होता. प्रशिक्षक अर्मांदो कुलासो यांनी या सामन्यासाठी महाराष्ट्र ऑरेंज एफसीविरुद्ध ०-३ असा पराभव स्वीकारावा लागलेल्या संघात प्रारंभीच्या ११मध्ये तीन बदल केले. गोलरक्षक म्हणून अभिमन्यू सिंग याला पसंती देण्यात आली. 

धेंपोने सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ केल्याने त्यांची सातत्याने परीक्षा पाहण्यात आली. स्पोर्टिंगने स्थिरावण्यासाठी काही वेळ घेतला. अर्ध्या तासाचा खेळ झालेला असताना स्पोर्टिंगला गोल करण्याची खुली संधी होती. क्लुझनर परेरा याच्या धोकादायक क्रॉसवर जॉयसन गावकार याने हेडरद्वारे गोल नोंदविण्याचा केलेला प्रयत्न गोलपोस्टवरून गेला. 

यानंतर बिस्वा दार्जी याने आगेकूच केली परंतु, अॅलिस्टर किंवा जॉयसन याला अचूक पास देण्यात तो कमी पडला. मध्यंतरानंतर सहाच मिनिटांनी शुभम रावत याने गोलकोंडी फोडली. त्याची हाफ व्हॉली गोलरक्षक अभिमन्यू याला झेपावून देखील अडवता आली नाही. 

या पिछाडीनंतर स्पोर्टिंगने आक्रमणातील धार वाढवली. पण, अॅलिस्टर व डॉयल यांना लक्ष्य साधता आले नाही. ८९व्या मिनिटाला स्पोर्टिंगचा कर्णधार जोयल कुलासो याला दुसरे पिवळे कार्ड मिळाल्याने मैदान सोडावे लागले.

धेंपोने या विजयासह १३ सामन्यांतून २४ गुण मिळवत आपले दुसरे स्थान बळकट केले आहे. एससी बंगळुरूने दोन सामने शिल्लक असतानाच आपला आय-लीग प्रवेश यापूर्वीच निश्चित केला आहे. स्पोर्टिंगचा संघ १९ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. शेवटच्या लीग सामन्यात त्यांना शनिवारी युनायटेड एससीशी दोन हात करावे लागणार आहेत. द्वितीय स्थानासह आय-लीग स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी धेंपोला सुदेवा दिल्ली (२३ गुण) यांच्याविरुद्ध केवळ बरोबरी पुरेशी आहे.