पहिला टी-२० : भारतीय महिलांकडून बांगलादेशचा ४४ धावांनी पराभव

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
28th April, 08:31 pm
पहिला टी-२० : भारतीय महिलांकडून बांगलादेशचा ४४ धावांनी पराभव

ढाका : भारतीय महिला क्रिकेट संघाने ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेश संघाचा ४४ धावांनी पराभव केला आहे. 

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय खेळाडूंनी निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १४५ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ २० षटकांत ८ विकेट गमावून १०१ धावाच करू शकला. 

रेणुका सिंग आणि पूजा वस्त्राकर यांच्या धारदार गोलंदाजीने बांगलादेशी संघाच्या फलंदाजीला संघर्ष करण्यास भाग पाडले. रेणुका सिंगने ३ आणि पूजा वस्त्राकरने २ बळी घेत भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

बांगलादेशी संघाने पहिल्या २९ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. अशा स्थितीत संघाची कर्णधार निगार सुलतानाने अर्धशतकी खेळी खेळून संघाला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. सुलतानाने ४८ चेंडूत ५१ धावांची खेळी खेळली. यादरम्यान तिने ५ चौकार आणि १ षटकारही लगावला. खरे तर बांगलादेशच्या महिला संघाच्या ७ खेळाडूंना धावांच्या बाबतीत दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारताची गोलंदाजी इतकी तगडी होती की बांगलादेश महिला क्रिकेट संघ शेवटच्या ५ षटकांत केवळ २३ धावाच करू शकला.

तत्पूर्वी, भारताने बांगलादेशला विजयासाठी १४६ धावांचे लक्ष्य दिले होते. सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्मृती मानधना (९) फरीहा त्रिस्नाच्या गोलंदाजीत बोल्ड होऊन पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर यास्तिका भाटियाने शेफाली वर्मासह दुसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली.

शेफालीने २२ चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार ठोकत ३१ धावा केल्या. यास्तिका भाटियाने २९ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ३६ धावा केल्या. हरमनप्रीत कौरने २२ चेंडूंत ४ चौकारांसह ३० धावांची खेळी केली. संजीवन सजना ११ धावा करून बाद झाली. भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत ७ विकेट गमावत १४५ धावा केल्या. बांगलादेशकडून राबेयाने तीन बळी घेतले. मारुफा अख्तर, फरिहा त्रिस्ना आणि फहिमा खातून यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.