राजस्थानचे प्लेऑफमधील स्थान ​निश्चित

लखनऊ सुपर जायंट्सवर ७ गड्यांनी विजय : संजू, ध्रुव जुरेलची अर्धशतके

Story: न्यूज​ डेस्क । गोवन वार्ता |
28th April, 12:18 am
राजस्थानचे प्लेऑफमधील स्थान ​निश्चित

लखनऊ :  राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील प्ले ऑफमधील जागा जवळपास निश्चित केली आहे. आरआरने शनिवारी लखनऊ सुपर जायंट्सवर सहज विजय मिळवल्याने त्यांच्या खात्यातील गुणांची संख्या १६ झाली आहे. लोकेश राहुल व दीपक हुडा यांच्या अर्धशतकी खेळीला संजू सॅमसन व ध्रुव जुरेल यांनी चोख प्रत्युत्तर दिले. सॅमसनने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि जुरेलसोबत १२१ धावांची भागीदारी केली. जुरेलने ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.  अारआरने १९ षटकांत ३ बाद १९९ धावा करून ७ गड्यांनी विजय मिळवला. संजू  ३३ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७१ धावांवर नाबाद राहिला, तर ध्रुवनेही ३४ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५२ धावा केल्या. 

प्रथम फलंदाजी करताना कर्णधार केएल राहुलच्या ७६ धावा आणि दीपक हुडाच्या ५० धावांच्या बळावर लखनऊ सुपरजायंट्सने राजस्थान रॉयल्ससमोर १९७ धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राहुल आणि दीपक हुडा यांच्या तिसऱ्या विकेटसाठी झालेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर लखऊने २० षटकांत पाच गडी गमावून १९६ धावा केल्या. राजस्थानकडून संदीप शर्माने दोन बळी घेतले. या सामन्यात तो आपल्या संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मा यांनी राजस्थानला सुरुवातीचे यश मिळवून दिले. पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बोल्टने क्विंटन डी कॉकला बाद केले. यानंतर संदीपने मागील सामन्यातील शतकवीर मार्कस स्टॉइनिसला खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये पाठवून लखनऊचा डाव उद्ध्वस्त केला. मात्र, कर्णधार केएल राहुलने दीपक हुडाच्या साथीनं डाव सांभाळला. दोन्ही फलंदाजांनी जबाबदारीनं खेळ करत तिसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली.