साई विघ्नेशला स्ट्रीट प्रीमियर लीगचे विजेतेपद

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th May, 11:53 pm
साई विघ्नेशला स्ट्रीट प्रीमियर लीगचे विजेतेपद

पणजी : साई विघ्नेश म्हापसाने इंडियन्स कॅपिटल्सचा पराभव करत गोवन स्ट्रीट प्रीमियर लीग १चे विजेतेपद पटकावले. स्पर्धा फातोर्डा फ्रेंड्स सर्कलतर्फे आयोजित करण्यात आली होती. एकूण १२ संघांनी यात सहभाग घेतला होता.      

किताबी लढतीत इंडियन्स कॅपिटलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. साई विघ्नेश म्हापसाने प्रथम फलंदाजी करताना ५ षटकांत ८४ धावा फलकावर लगावल्या. लक्ष्याचा पाठलाग करणारा इंडियन्स कॅपिटल संघ ५ षटकांत केवळ ३६ धावाच करू शकला. विजेत्या साई विघ्नेश संघाला चषक व रोख रुपये २ लाख तर उपविजेत्या इंडियन्स कॅपिटल्सला चषक व रोख १ लाख रुपये प्रदान करण्यात आले.  विजेत्या संघाचे मालक विकास आरोलकर यांच्या नेतृत्वाखालील संघाने विजेतेपद मिळविले.    

अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून प्रवीण नाईक याला निवडण्यात आले. उदयोन्मुख खेळाडू म्हणून संतोष मडवळ, उत्कृष्ट फलंदा​ज म्हणून साईश झोरे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून हर्षद मातोंडकर व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गुरुप्रसाद असोसकर याला निवडण्यात आले. मालिकावीर पुनाजी कळंगुटकरला स्मार्ट एलईडी टीव्ही प्रदान करण्यात आला. अंतिम सामन्याला प्रमुख पाहुणे म्हणून फातोर्डा आमदार विजय सरदेसाई, सन्माननीय अतिथी म्हणून मुश्ताक अहमद, जमीर अहमद व इतरांची उपस्थिती होती.