हैदराबादचा राजस्थानवर एका धावेने थरारक विजय

भुवनेश्वरचे निर्णायक षटक : यशस्वी-परागचे प्रयत्न व्यर्थ

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
03rd May, 12:02 am
हैदराबादचा राजस्थानवर एका धावेने थरारक विजय

हैदराबाद : गुरुवारी गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सचा सामना इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादशी झाला. दोन्ही संघांमधील हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात आला.

नितीश रेड्डी आणि ट्रॅव्हिस हेडचे अर्धशतक आणि हेनरिक क्लासेनच्या शानदार खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी २०२ धावांचे लक्ष्य ठेवले. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ३ गडी गमावून २०१ धावा केल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा एका धावेने पराभव केला. राजस्थान रॉयल्स संघ २० षटकात ७ गडी गमावून २०० धावा करू शकला.

२०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. संघाने पहिल्याच षटकात संजू सॅमसन आणि जोस बटलरचे विकेट गमावले. भुवनेश्वर कुमारने त्याला बाद केले. दोन्ही फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. यानंतर यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ७८ चेंडूत १३४ धावांची भागीदारी झाली. यशस्वी ४० चेंडूत ६७ धावा करून बाद झाला. रियान परागने ४९ चेंडूत ७७ धावा केल्या. हेटमायरला ९ चेंडूत केवळ १३ धावा करता आल्या.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादची सुरुवातही खूप खराब झाली. आवेश खानने अभिषेक शर्माला बाद करून हैदराबादला सुरूवातीलाच मोठा धक्का दिला. पुढच्याच षटकात अनमोलप्रीत सिंग संदीप शर्माचा बळी ठरला, त्यामुळे हैदराबादवर दबाव वाढला. अभिषेक १२ तर अनमोलप्रीत फक्त ५ धावा काढून बाद झाला. पहिल्या ६ षटकात त्यांची धावसंख्या २ विकेट्सवर केवळ ३७ धावा अशी होती. यानंतर नितीश रेड्डी आणि ट्रॅव्हिस हेड यांनी आक्रमण करत तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली.

ट्रॅव्हिस हेड ४४ चेंडूत ५८ धावा करून परतला. त्याच्या बॅटमधून ६ चौकार आणि ३ षटकार आले. तर नितीश रेड्डीने ४२ चेंडूत ७६ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या बॅटमधून ३ चौकार आणि ८ षटकार आले. तर हेनरिक क्लासेनने १९ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले.

डावाच्या पहिल्या १० षटकांमध्ये राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीचे वर्चस्व होते, मात्र पुढच्या १० षटकांत हैदराबादच्या फलंदाजांनी तुफानी शैलीत फलंदाजी केली. पहिल्या १० षटकांत हैदराबादला २ गडी गमावून केवळ ७५ धावा करता आल्या होत्या. पण शेवटच्या १० षटकांत १ विकेट गमवाताना हैदराबादच्या फलंदाजांनी १२६ धावा केल्या.

राजस्थान रॉयल्सकडून आवेश खानने सर्वाधिक बळी घेतले. त्याने ४ षटकात ३९ धावा देत २ बळी घेतले. त्याच्याशिवाय संदीप शर्माने ४ षटकात ३१ धावा देत १ बळी घेतला. ट्रेंट बोल्ट आणि रविचंद्रन अश्विनने चांगली गोलंदाजी केली, पण युझवेंद्र चहलने ४ षटकात ६२ धावा दिल्या.

थर्ड अंपायरचा वादग्रस्त निर्णय

ट्रॅव्हिस हेडला १५व्या षटकातील चौथ्या चेंडूवर आवेश खानने क्लीन बोल्ड केले. हेड आऊट होण्यापूर्वी एक मोठा वाद झाला होता.वास्तविक, एका चेंडूपूर्वी तो संजू सॅमसनने स्टंपिग आऊट केले होते. त्यानंतर हे प्रकरण थर्ड अंपायरपर्यंत पोहोचले. यावेळी रिप्लेमध्ये दिसत होते की हेडची बॅट क्रीझमध्ये नव्हती. कारण त्याची बॅट हवेतच होती. अशा परिस्थितीत थर्ड अंपायर हेडला आऊट देतील, अशी सर्वांना अपेक्षा होती, पण थर्ड अंपायरने आश्चर्यकारकपणे हेडला नॉट आऊट घोषित केले.

खेळाडू आणि चाहत्यांना बसला धक्का

थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे राजस्थानचे खेळाडू आश्चर्यचकित झाले. हेड नॉट आऊट आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. थर्ड अंपायरच्या निर्णय पाहून राजस्थान संघाचा संचालक कुमार संगकाराही संतापला. यावेळी त्याचा संयम सुटलेला पाहिला मिळाला. सहसा शांत दिसणारा संगकारा फोर्थ अंपायरशी सीमारेषेजवळ चर्चा करताना दिसरा. दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. दरम्यान, पुढच्याच चेंडूवर आवेशने हेडला क्लीन बोल्ड केले. हे पाहून संगकारा पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसला.

अंपायरिंगवर उपस्थित केले प्रश्न 

आयपीएलच्या या हंगामाबाबत अंपायरिंगबाबत बरीच चर्चा झाली आहे. खराब अंपायरिंगमुळे संघांसह चाहत्यांनाही त्रास झाला आहे. थर्ड अंपायरने ट्रॅव्हिस हेडबाबत दिलेल्या निर्णयावर सोशल मीडियावर टीका होत आहे. लोकांचा असा विश्वास आहे की हेड आऊट होता, पण त्याला नॉट आऊट घोषित करण्यात आले. सायमन कॅटिचनेही समालोचन करताना बॅट अजूनही हवेत असल्याचे सांगितले.