हिरव्या जर्सीत आरसीबी बदलणार नशीब

ईडन गार्डनवर आज कोलकाताविरुद्ध सामना

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
21st April, 12:12 am
हिरव्या जर्सीत आरसीबी बदलणार नशीब

कोलकाता : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १७वा सीझन आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) साठी खूपच खराब गेला आहे. या मोसमात ७ सामने खेळल्यानंतर आरसीबीने फक्त एक जिंकला आहे आणि ६ सामने गमावले आहेत. दरम्यान, रविवारी आरसीबी हिरव्या जर्सीत आपले नशीब आजमावणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आता येथून प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे. आरसीबी या मोसमातील पुढील सामना रविवारी (दि.२१) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळणार आहे. या सामन्यात, आरसीबी हिरवी जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. आरसीबीने २०११ च्या मोसमात प्रथमच ही जर्सी घालून आयपीएल सामना खेळला होता. तेव्हापासून फक्त २०२१ मध्ये त्यांनी करोना वॉरियर्सबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आकाशी-निळी जर्सी घालून सामना खेळला.  २०१७च्या मोसमानंतर आरसीबी हिरवी जर्सी घालून दुसऱ्यांदा केकेआर विरुद्ध सामना खेळणार आहे. गेल्या वेळी केकेआरने त्यांचा ६ गडी राखून पराभव केला होता.

हिरव्या जर्सीतील आरसीबीचा विक्रम

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १२ सामने हिरवी जर्सी परिधान करून खेळले आहेत, त्यापैकी त्यांना केवळ ४ सामने जिंकता आले, तर  पावसामुळे एका सामन्याव्यतिरिक्त त्यांना ७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या मोसमात आरसीबी हिरवी जर्सी परिधान करून राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला होता, ज्यामध्ये त्यांनी ७ धावांनी सामना जिंकला होता. या सामन्यात आरसीबी संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिल आणि ग्लेन मॅक्सवेल यांची अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली.