कळंगुटला नमवत स्पोर्टिंगने आव्हान कायम

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धा : १-० असा पराभव

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd April, 11:54 pm
कळंगुटला नमवत स्पोर्टिंगने आव्हान कायम

वास्को : बिस्वा दार्जीच्या गोलच्या जोरावर स्पोर्टिंग क्लब दी गोवा संघाने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी कळंगुट असोसिएशनचा १-० असा पराभव केला. वास्कोच्या टिळक मैदानावर या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.      

२९व्या मिनिटाला बिस्वाने केलेल्या गोलच्या जोरावर स्पोर्टिंगने २२ सामन्यांत ४३ गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. त्यांना अजून दोन सामने खेळायचे आहेत आणि ते लीगमध्ये आघाडीवर असलेल्या सेसा एफएशी बरोबरी करू शकतात ज्यांचे ४५ गुण आहेत आणि एक सामना शिल्लक आहे.       

दुसर्या स्थानावर असलेल्या पॅक्स ऑफ नागवा एससीचे २३ सामन्यांतून ४४ गुण आहेत. दोन्ही संघांना मंंगळवारी पहिल्या गोलाच्या शोधात आक्रमक सुरुवात केली. कळंगुटला पहिली गोलसंधी प्राप्त झाली पण चर्चिल ब्रदर्स एफसीविरुद्ध शेवटच्या क्षणी पेनल्टी वाचवणारा स्पोर्टिंगचा गोलरक्षक अभिमन्यू सिंगने आपला चांगला फॉर्म कायम ठेवत कळंगुटच्या जोवितो फर्नांडिसच्या प्रयत्नाला यश मिळवू दिले नाही.       

‘फ्लेमिंग ऑरेंज’ने हळूहळू खेळात पुनरागमन केले आणि २९ व्या मिनिटाला गोलकोंडी फोडली. कुणाल कुंडईकरने घातक क्रॉस पाठवला आणि जोनास कुलासोकडे चेंडू सोपविला. त्याने लगेचच बिस्वा दार्जीकडे चेंडू पास केला. दार्जीने संधीचे सोने करत गोल लगावला.       

उत्तरार्धात कळंगुटने आपला हेतू स्पष्ट केला. रिचर्ड कार्दोझचा मैदानी फटका लक्ष्यापासून थोडक्यात दूर राहिला तर बदली खेळाडू क्रितिकेश गडेकरच्या दमदार प्रयत्न स्पोर्टिंगच्या खेळाडूला लागून कॉर्नरसाठी बाहेर गेला. अखेरच्या मिनिटांत स्पोर्टिंगला दोन चांगल्या संधी मिळाल्या, पण आयव्हन कॉस्टा आणि जॉयसन गावकर यांच्या वाट्याला यश आले नाही.