गुकेशने रचला इतिहास; जिंकली कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा

सर्वांत तरुण आव्हानवीर होण्याचा मान : कास्परोव्हचा विक्रम मोडित

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
22nd April, 10:57 pm
गुकेशने रचला इतिहास; जिंकली कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा

टोरंटो : जगज्जेत्या बुद्धीबळपटूला आव्हान देणारा खेळाडू निवडण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या कँडिडेटस स्पर्धेत भारताचा १७ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेश याने इतिहास रचला आहे. गुकेशने ही स्पर्धा जिंकत सर्वात तरुण आव्हानवीर होण्याचा मान त्याने मिळवला आहे.

 पाच वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांच्यानंतर कँडिडेट्स टूर्नामेंट जिंकणारा गुकेश हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. आनंद यांनी २०१४ साली ही स्पर्धा जिंकली होती. गुकेश हा वर्ल्ड चॅम्पियनशिप जेतेपदासाठी सर्वात तरुण चॅलेंजर ठरला आहे.

गुकेशने अंतिम फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरासोबत बरोबरी साधली. त्याने स्पर्धेत १४ पैकी नऊ गुण मिळवले. विश्वविजेत्याला आव्हान देणारा खेळाडू निवडण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुकेशला आता या वर्षाच्या अखेरीस चीनच्या डिंग लिरिनविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. वयाच्या २२ व्या वर्षी १९८४ मध्ये कँडिडेट्स जिंकलेल्या रशियाच्या गॅरी कास्परोव्हचा ४० वर्ष जुना विक्रम गुकेशने मोडला आहे. गुकेशच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सोशल मीडियावर अभिनंदनाचा पूर आला आहे. विश्वनाथन आनंद यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. आनंद यांनी 'एक्स'वर लिहिले, सर्वात तरुण चॅलेंजर बनल्याबद्दल डी गुकेशचे अभिनंदन. तू जे केले त्याचा खूप अभिमान आहे. तू ज्या प्रकारे खेळलास आणि कठीण प्रसंग हाताळलेत त्याबद्दल मला वैयक्तिकरित्या खूप अभिमान वाटतो. या क्षणाचा आनंद घ्या. या कामगिरीबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुकेशचे अभिनंदन केले आहे. 

चेन्नईचा रहिवासी असलेल्या गुकेशने ही स्पर्धा जिंकल्यानंतर सांगितले की, सध्या मला खूप दिलासा आणि खूप आनंद वाटत आहे. ही स्पर्धा जिंकल्याबद्दल गुकेशला ८८,५०० युरो (अंदाजे ७८.५ लाख रुपये) रोख बक्षीसही मिळाले. कँडिडेट्ससाठी एकूण बक्षीस रक्कम ५,००,००० युरो होती.