सनरायजर्स हैदराबादची दिल्लीवर मात

हैदराबाद गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी : सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
21st April, 12:13 am
सनरायजर्स हैदराबादची दिल्लीवर मात

दिल्ली : सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या १७ व्या मोसमातील ३५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर ६७ धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. हैदराबादने दिल्लीला विजयासाठी २६७ धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीला या विजयी धावांचा पाठलाग करताना २० षटकेही खेळता आली नाही. दिल्लीचा डाव १९.१ षटकात‍ १९९ धावांवर आटोपला. दिल्लीकडून जेक फ्रेझर-मॅकगर्कने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. तर हैदराबादकडून टी नटराजन याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. हैदराबादचा हा पाचवा विजय ठरला. तर दिल्लीला पाचव्या पराभवाचे तोंड पाहावे लागले.
दिल्ली कॅपिट्ल्सकडून जेक फ्रेझर-मॅकगर्क याने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या खेळीमुळे दिल्लीच्या विजयाचा आशा वाढल्या होत्या. मात्र, विजयासाठी आवश्यक त्या रन रेटने इतर फलंदाजांना खेळता आले नाही. जेक फ्रेझर-मॅकगर्क याव्यतिरिक्त दिल्लीसाठी कॅप्टन ऋषभ पंत याने ३५ चेंडूमध्ये ५ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावा केल्या. अभिषेक पोरेलने २२ चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले. तर इतर फलंदाज निष्प्रभ ठरले. हैदराबादकडून नटराजनशिवाय नितीश रेड्डी आणि मयंक मार्कंडे या दोघांनी २-२ विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांच्या खात्यात १-१ विकेट गेली.

आयपीएल २०२४च्या ३५वा सामना शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्याशी खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. या हंगामात सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज तुफानी फलंदाजी करत आहेत. दिल्ली कॅपिटल्ससोबतच्या खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादने पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी करत विरोधी संघ दिल्लीसमोर २६७ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. पॉवर प्लेमध्ये या संघाने १२५ धावा ठोकल्या होत्या, जो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा पॉवर प्ले स्कोअर ठरला.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, हैदराबादने केलेली सुरुवात पाहून पंतचा निर्णय चुकीचा ठरला. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली. पॉवर प्ले संपल्यानंतर कुलदीप यादवने ४६(१२) च्या धावसंख्येवर अभिषेकला बाद करून दिल्लीसाठी पुनरागमन केले. यानंतर एडन मार्कराम केवळ १ धावा काढून बाद झाला.
ट्रॅव्हिस हेडला ८९ धावांवर कुलदीप यादवने बाद केले. हेड ३२ चेंडूत ८९ धावांवर बाद झाला. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि ६ षटकारही मारले. तर अभिषेकने १२ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ४६ धावांची खेळी केली. हेनरिक क्लासेन १५ (०८), नितीश रेड्डी ३७ (२७), अब्दुल समद १३ (०८) आणि पॅट कमिन्स १ धावांवर बाद झाले.
नितीश कुमार-शाहबाजची अर्धशतकी भागिदारी
हेनरिक क्लासेन १५ धावा करून बाद झाला तेव्हा हैदराबादची धावसंख्या ४ बाद १५४ अशी होती. यानंतर नितीशकुमार रेड्डी आणि शाहबाजने अप्रतिम फलंदाजी करत अर्धशतकी भागिदारी करून हैदराबादला १५व्या षटकातच २०० धावांचा टप्पा पार करून दिला. नितीश रेड्डीने ३६, तर शाहबाज २९ चेंडूंत २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५९ धावा करून नाबाद परतला.
हेडचे विक्रमी अर्धशतक
ट्रेव्हिस हेडने अवघ्या १६ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ३३७.५० च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक झळकावले. हेडच्या आयपीएल कारकीर्दीतील हे तिसरे अर्धशतक विक्रमी ठरले. हेड हैदराबादसाठी संयुक्तरित्या कमी चेंडूत वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला. हेडच्या आधी त्याचा सलामी सहकारी अभिषेक शर्मा यानेच १६ चेंडूमध्ये या हंगामात मुंबई विरुद्ध ही कामगिरी केली होती.
दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई
अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडने दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली. खलील अहमदने एका षटकात १९ धावा दिल्या. ललित यादवने दोन षटकांत ४१ धावा दिल्या. नॉर्खियालाही हैदराबाच्या सलामीवीरांनी जोरदार चोपले. त्याने एका षटकामध्ये २२ धावा दिल्या. कुलदीप यादवने २०, तर मुकेश कुमारने २२ धावा दिल्या.

हैदराबादने कोलकाताचा विक्रम मोडला
हैदराबादच्या डावात ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या दोघांनी पाचव्याच षटकात शतकी सलामी भागीदारी केली. या सलामी जोडीने ५ षटकांत १०३ धावा केल्या. या भागीदारीत हेडचे ६२ आणि अभिषेकचे ४० धावांचे योगदान राहिले. त्यानंतर या दोघांनी सहाव्या षटकाचा खेळ संपल्यांतर एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला. आयपीएलच्या इतिहासात हैदराबाद पावर प्लेच्या ६ षटकांमध्ये सर्वाधिक धावा करणारी टीम ठरली. हैदराबादने केकेआरचा रेकॉर्ड ब्रेक केला. हैदराबादने बिनबाद १२५ धावा केल्या आणि केकेआरचा १०५ धावांचा पावर प्लेमधील विक्रम मोडीत काढला.
आयपीएलमधील पावर प्लेमध्ये सर्वाधिक धावा

१२५/० - हैदराबाद वि. दिल्ली, २०२४*
१०५/० - कोलकाता वि. बंगळुरू, २०१७
१००/२ - चेन्नई वि. पंजाब, २०१४
९०/० - चेन्नई वि. मुंबई, २०१५
८८/१ - कोलकाता वि. दिल्ली, २०२४*

जेक फ्रेझर-मॅकगर्कची विस्फोटक खेळी

हैदराबादने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पृथ्वी शॉच्या रूपाने दिल्लीला पहिला झटका मिळाला. त्यानंतर जेक फ्रेझर-मॅकगर्क मैदानात आला. मॅकगर्कने अवघ्या १५ चेंडूत तडाखेदार अर्धशतक ठोकले. त्याने यासह अभिषेक आणि ट्रेव्हिसला मागे टाकून आयपीएलमधील वेगवान अर्धशतक करणारा चौथा फलंदाज ठरला. जेक फ्रेझर-मॅकगर्कने या खेळीत ५ षटकार आणि तितक्याच चौकारांच्या मदतीने ३५३.३३ च्या स्ट्राईक रेटने ५३ धावा ठोकल्या. अर्धशतकानंतर आणखी आक्रमक होत जेक फ्रेझर-मॅकगर्क टॉप गिअर टाकत फटकेबाजी केली. त्याच्या खेळीमुळे दिल्लीच्या आशा वाढल्या. मात्र मयंक मार्कंडने मॅकगर्कला ६५ धावांवर विकेटकीपर हेन्रिक क्लासेनच्या हाती झेलबाद केले. जेक फ्रेझर-मॅकगर्कने १८ चेंडूत ५ चौकार आणि ७ षटकारांसह ६५ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक
हैदराबाद : २० षटकांत ७ बाद २६६ धावा
दिल्ली : १९.१ षटकांत सर्वबाद १९९ धावा
सामनावीर : ट्रेव्हिस हेड