टेरर फंडिंग : चौघांची नोकरीतून हकालपट्टी

जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांची कारवाई : सर्वांवर दहशतवाद्यांशी संबंध ठेवल्याचा आरोप

|
14th August 2022, 12:17 Hrs
टेरर फंडिंग : चौघांची नोकरीतून हकालपट्टी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दहशतवादाविरोधात मोठी कारवाई केली आहे. त्यांनी टेरर फंडिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले बिट्टा कराटेची पत्नी असबाह उल अर्जमंद खानसह चार जणांची सरकारी नोकरीतून हकालपट्टी केली आहे. या सर्वांवर दहशतवाद्यांशी संबंध ठेवल्याचा आरोप आहे.
निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांत बिट्टाच्या पत्नीसह वैज्ञानिक मुहीत अहमद भट, काश्मीर विद्यापीठाचे वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक माजिद हुसैन कादरी व पाक पुरस्कृत हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनचा मुलगा सय्यद अब्दुल मुईदचा समावेश आहे. तो आयटी, जेकेईडीआयमध्ये व्यवस्थापक होता. या सर्वांवर कलम ३११ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कलमांतर्गत सरकारला कोणत्याही चौकशीविना आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा अधिकार मिळतो.
बिट्टा कराटेच्या पत्नीवर जेकेएलएफसाठी पैसे जमवल्याचा आरोप
जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) अतिरेकी फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटेची पत्नी असबाह उल अर्जमंद खान २०११ बॅचच्या जम्मू काश्मीर प्रशासकीय सेवेच्या (जेकेएएस) अधिकारी होत्या. त्यांच्यावर पासपोर्ट तयार करण्यासाठी खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. तसेच देशाला धोकादायक ठरणाऱ्या परदेशातील व्यक्तींशी संबंध ठेवल्याचाही आरोप आहे. असबाहवर प्रतिबंधित जेकेएलएफसाठी फंड गोळा करण्याचाही आरोप आहे. बिट्टा कराटे टेरर फंडिंगशी संबंधित एका प्रकरणात तिहार कारागृहात बंदिस्त आहे. त्याने १९९०च्या दशकाच्या प्रारंभी अनेक काश्मिरी पंडितांच्या हत्या केल्या होत्या. त्याला पंडितांचा कसाई म्हणूनही ओळखले जाते.
हिजबुल म्होरक्याच्या मुलावर दहशतवादी हल्ल्यात हात असल्याचा आरोप
सय्यद अब्दुल मुईद हिज्बुलच्या म्होरक्याचा तिसरा मुलगा आहे. त्यालाही सरकारी सेवेतून बेदखल करण्यात आले आहे. सय्यद अहमद शकील व शाहिद युसूफला मागील वर्षी सेवेतून निलंबित करण्यात आले होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुईदवर पंपोरमध्ये जम्मू काश्मीर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इंस्टीट्युटवर (जेकेईडीआय) झालेल्या तीन कथित दहशतवादी हल्ल्यांत हात असल्याचा आरोप आहे. हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सहाउद्दीनच्या तीन मुलांची प्रशासकीय सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
भटवर कट्टरतावाद पसरवण्याचा, तर कादरीवर दहशतवाद्यांना साथ देण्याचा आरोप
डॉक्टर मुहीत अहमद भटवर पाकिस्तानच्या मदतीने विद्यार्थ्यांत कट्टरपंथी विचारधारा पसरवण्याचा आरोप आहे. माजिद हुसैन कादरीवर लश्कर ए तोयबासह अन्य संघटनांसोबत संबंध ठेवल्याचा आरोप आहे.
आतापर्यंत ४० कर्मचारी निलंबित
जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत ४० कर्मचाऱ्यांची सरकारी सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. यात सलाउद्दीनची दोन मुले व डीएसपी देवेंद्र सिंह यांचाही समावेश आहे. सिंह यांना श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गालगत एका मोस्ट वाँटेड दहशतवादी व अन्य दोन जणांसोबत ताब्यात घेण्यात आले होते.