झिंबाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना


14th August 2022, 01:11 am
झिंबाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना

बंगळुरू : १८ ऑगस्टपासून झिंबाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया रवाना झाली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ झिंबाब्वेला रवाना झाला आहे. टीम इंडिया १८, २० आणि २२ ऑगस्ट रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झिंबाब्वेविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. टीम इंडिया झिंबाब्वेला रवाना झाल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सोशल मीडिया अकाउंटवर प्रसिद्ध कृष्णा, दीपक चहर, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, महम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांचे फोटो दाखवण्यात आले होते.

एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे देखील संघासोबत दिसले. लक्ष्मणला झिंबाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. एजबॅस्टन येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये असताना, लक्ष्मण आयर्लंडमधील टी-२० संघासोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून होता आणि साउथॅम्प्टनमधील पहिल्या टी-२० साठी देखील उपस्थित 

होता.

जुलैमध्ये त्रिनिदादमध्ये वेस्ट इंडिजचा ३-० असा पराभव करून भारताने येथे प्रवेश केला आहे. दुसरीकडे झिंबाब्वेने बांगलादेशविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली. ही मालिका आयसीसी विश्वचषक सुपर लीगचा एक भाग आहे आणि झिंबाब्वेला टेबलच्या पहिल्या आठमध्ये स्थान मिळणे खूप महत्त्वाचे आहे. असे झाल्यास झिंबाब्वे पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट पात्र ठरेल. त्याचबरोबर भारत मेगा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

राहुल सांभाळणार संघाचे नेतृत्व

११ ऑगस्ट रोजी संघात समाविष्ट झालेल्या राहुलकडे भारताचे कर्णधारपद आहे. शिखर धवनच्या जागी तो नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारेल. धवनचे आधी कर्णधार म्हणून नाव देण्यात आले होते आणि आता राहुलकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

२५ मे रोजी कोलकाता येथे आयपीएल २०२२ च्या एलिमिनेटरमध्ये खेळल्यापासून राहुल स्पर्धात्मक क्रिकेटमधून बाहेर आहे. त्याचा संघ, नवोदित लखनौ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ईडन गार्डन्सवर १४ धावांनी पराभूत झाला 

होता.

त्यानंतर जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी राहुलची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, परंतु नवी दिल्लीतील पहिल्या सामन्यापूर्वी तो मालिकेतून बाहेर पडला होता. जर्मनीतील स्पोर्ट्स हर्नियाच्या शस्त्रक्रियेमुळे राहुलला इंग्लंड आणि आयर्लंडच्या दौऱ्यांपासूनही वगळण्यात आले.

झिंबाब्वेसमोर समस्या वाढल्या

बांगलादेशला पराभूत केल्यानंतर झिंबाब्वे आता भारतीय क्रिकेट संघाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. १८ ऑगस्टपासून उभय संघांमधील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना झाला आहे. झिंबाब्वेनेही संघ जाहीर केला आहे. मात्र, संघाची घोषणा झाल्यानंतर झिंबाब्वेसमोरील आव्हाने वाढली आहेत, कारण संघाचा कर्णधार क्रेग इर्विनसह असे ४ खेळाडू बाहेर पडले आहेत, जे टीम इंडियाला अडचणीत आणू शकतात.

संघाच्या घोषणेसह झिंबाब्वे क्रिकेटने सांगितले की, कर्णधार क्रेग इर्विन अद्याप पायाच्या स्नायूंच्या समस्येतून बरा झालेला नाही. इर्विन बराच काळ झिंबाब्वेचा भाग आहे आणि तो संघाचा महत्त्वाचा फलंदाजही आहे. इर्विनने १०५ सामन्यांमध्ये २,८९९ धावा केल्या आहेत ज्यात भारताविरुद्ध ४ सामन्यांत ५७ च्या सरासरीने ११५ धावा केल्या आहेत. साहजिकच झिंबाब्वेला इर्विनच्या कर्णधारपदाची आणि फलंदाजीची उणीव भासेल.

झिंबाब्वेला दुसरा मोठा धक्का वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजारबानीच्या रूपाने बसला आहे. आपल्या जलदगतीने फलंदाजांना अडचणीत आणणारा मुजरबानी मांडीच्या दुखापतीमुळे या मालिकेचा भाग नाही. मुजरबानी कधीही भारताविरुद्ध खेळला नाही, पण त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत त्याने ३३ सामन्यांत ३० च्या सरासरीने ४६ विकेट घेतल्या आहेत.

वेगवान गोलंदाजीत संघाला दुहेरी फटका बसला आहे. मुजारबानीशिवाय संघाचा वरिष्ठ मध्यमगती गोलंदाज तेंडाई चताराही दुखापतग्रस्त आहे. यामुळे तो या मालिकेत खेळू शकणार नाही. झिंबाब्वेसाठी चताराची कामगिरी सातत्यपूर्ण असून त्याने ७९ सामन्यांत १०२ बळी घेतले आहेत.