दूर्वा शोभते मस्तकी

Story: दरवळ | प्राची नाईक, दाडाचीवाडी, धारगळ |
12th August 2022, 11:56 Hrs
दूर्वा शोभते मस्तकी

जास्वंद दूर्वा शोभते मस्तकी

शेंदूर लाल अंगावर उधळूनी

गणांचा राजा शोभतोस खरा....

महादेव शंकराच्या पूजेत बेलाच्या पानाला महत्त्व आहे. श्रीविष्णूंच्या पूजेत तुळशीच्या पानांना महत्त्व आहे. त्याचप्रमाणे गणपती पूजनात दुर्वांना अत्याधिक महत्त्व आहे. गणपतीला दूर्वा अत्यंत प्रिय आहे. दूर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती पूजन पूर्ण होत नाही. गणपतीची पूजा दुर्वांशिवाय अपूर्ण मानली जाते. पाच देवांपैकी प्रथम गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वांचा विशेष वापर केला जातो. 

गणपतीचे पूजन करताना एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला वाहाव्यात जसे की तीन, पाच, सात, नऊ अशा दुर्वांची जोडी. हिरवीगार दुर्वांनी भरलेला हार गणपतीच्या गळ्यात लाखात एक शोभून दिसतो. प्लास्टिकच्या हारांपेक्षा दुर्वांचा हार जास्त सुंदर दिसतो. गणपतीला दूर्वा अत्यंत प्रिय असण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते की, गणेश पुराणातील एका कथेनुसार कौण्डिन्य ऋषीच्या पत्नीने गणपतीला ज्या दूर्वा अर्पण केल्या त्याची तुलना कुबेराच्या धनाशी होऊ शकत नाही असे नोंदवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर अनेक शास्त्रांमध्ये दुर्वांची अद्भुत महिमा वर्णन करण्यात आली आहे. श्रावणातील शुद्ध अष्टमीला दुर्वाष्टमी साजरी केली जाते. 

शेतात दूर्वा मेरेच्या कुशीला हिरव्यागार दिसतात. अगदी सबंध गवतामध्ये दूर्वा नयनरम्य पहायला मिळतात. दूर्वा वनस्पती वर्षभर उपलब्ध असते. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर उगवते. दुर्वांशिवाय कोणत्याही देवाची पूजा अधुरी आहे. दुर्वांना पूजेत प्रथम स्थान दिले जाते. पूजेच्या ताटात इतर फुलांबरोबर दूर्वा असायलाच हव्यात. अभिषेक करताना दुधामध्ये दूर्वा घालून दूध शिंपडलं जातं. दूर्वाविषयी पौराणिक अनेक कथा सांगितल्या आहेत. त्यामधील दुसरी कथा म्हणजे... सीतेने जेव्हा आपल्या सासऱ्यांना म्हणजेच दशरथ राजाला त्यांच्या निधनानंतर पिंड  दिले होते. पण  कोणीही तिच्यावर विश्वास ठेवण्यास तयार होईना, तेव्हा दुर्वाने सीतेला साथ दिली. आपण पुरावा असल्याचे दुर्वाने सर्वांना पटवून दिले. तेव्हा सीतेने दुर्वाला वरदान दिले की तुला अंत नाही. जेव्हा पाण्याचा एक थेंब तुझ्यावर पडेल तेव्हा तू पुन्हा नव्याने जीवित होणार.  त्यामुळे दूर्वाला मृत्यू नाही. 

दूर्वाही एक महत्त्वपूर्ण वनस्पती आहे. जी गुणकारी उपयुक्त व सर्व प्राणीमात्रांसाठी आयोग्यवर्धक व अनेक रोगांवर रामबाण असल्याचे सिद्ध झाले आहे. दूर्वांना आयुर्वेदामध्ये महाऔषधीचे स्थान दिले गेले आहे. अनेक पौष्टिक आणि औषधी गुणांनी मुक्त दुर्वांचा उपयोग हिंदू धर्मामध्ये पूजा पाठासाठी तर होतोच पण त्याशिवाय या दिव्य औषधांमध्ये बरेच से आजार बरे होतात. दुर्वांच्या रसामुळे पोटातील विकार नष्ट होतात. आदिवासी लोक जखम किंवा घावावर दुर्वांना बारीक वाटून त्याचा लेप बांधतात. असे या मौल्यवान दूर्वा पूजेसाठी उपयुक्त ठरल्या आहेत त्याचबरोबर नैसर्गिक औषध म्हणूनही प्रसिद्ध आहेत.