‘हर घर तिरंगा’ला खलिस्तानवाद्यांचा विरोध

Story: राज्यरंग |  प्रदीप जोशी |
11th August 2022, 11:52 pm
‘हर घर तिरंगा’ला खलिस्तानवाद्यांचा विरोध

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ५ जून १९८४ रोजी सुप्रसिद्ध सुवर्ण मंदिरात लष्कर घुसवून खलिस्तानवादी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर पंजाबातून खलिस्तानवाद्यांचे उच्चाटन झाले, असे वाटले होते. परंतु ही कीड अजूनही अस्तित्वात असून कधीही देशाच्या मुळावर उठू शकते, हे गेल्या दोन वर्षांतील विविध घटनांवरून दिसून आले आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’चा नारा देऊन दि. १३, १४ आणि १५ ऑगस्ट रोजी प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, असे आवाहन देशवासीयांना केले आहे. याला विरोध करून शिरोमणी अकाली दलाच्या एका खासदाराने राष्ट्रध्वजाऐवजी घरावर ‘निशान साहिब’ फडकावण्याचे आवाहन केले आहे. यामुळे पुन्हा राज्यातील वातावरण गढूळ बनले आहे.      

मागच्या वर्षी दिल्लीत सुमारे वर्षभराहून अधिक काळ किसान आंदोलन सुरू होते. केंद्र सरकारने कायदे मागे घेतल्यानंतरच आंदोलकांनी रस्ते रिकामे केले होते. या आंदोलनावेळी लाल किल्ल्यावर काही आंदोलकांनी राष्ट्रध्वजाच्या जागी पिवळा ध्वज फडकावला होता. काही लोकांनी खलिस्तानवादी घोषणा दिल्या होत्या. सार्वजनिक इमारतीच्या भिंतींवर खलिस्तान समर्थनार्थ घोषणा लिहिल्या होत्या. देश-विदेशांत घडलेल्या अशा विविध घटनांवरून खलिस्तानी कीड वळवळत असल्याचे दिसून आले होते. आता शिरोमणी अकाली दल (अमृतसर)चे अध्यक्ष तथा संगरूरचे खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी पंजाबवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाऐवजी शिखांचा ध्वज ‘निशान साहिब’ फडकावण्याचे आवाहन केले आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानावरही टीका करताना भारतीय सैनिकांना ‘शत्रू’ संबोधले. ते म्हणाले की, (खलिस्तानी दहशतवादी) जरनैल सिंह भिंद्रनवाले हे शत्रू सैन्याशी लढताना हुतात्मा झाले. शीख हा स्वतंत्र आणि वेगळा समुदाय आहे. या वक्तव्यावरून शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी मात्र मान यांचे कान टोचले आहेत. भारतीय ध्वज सर्वांचा आहे आणि पंजाबच्या लोकांना त्याचा अभिमान आहे, असे पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे.दुसरीकडे ‘सिख फॉर जस्टिस’ ही खलिस्तानी दहशतवादी संघटनाही हात पाय पसरू पहात आहे. भारत-पाक सीमेवरील अटारी येथे सर्वांत उंच ३६० फुटांवर भारताचा राष्ट्रध्वज डौलाने फडकत आहे. ‘हर घर तिरंगा’च्या पार्श्वभूमीवर या संघटनेने सामाजिक माध्यमांतून प्रसारित  केलेला व्हिडिओ चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये बुरखा घातलेली महिला दिसत आहे. ती म्हणते, ‘‘सिख फॉर जस्टिस’ संघटनेला काश्मीरच्या फुटीरतावाद्यांचा पाठिंबा आहे. अटारी ही शिखांच्या गुरूंची भूमी आहे; मात्र भारत तेथे तिरंगा झेंडा फडकावत आहे. शिखांच्या भूमीवर गेल्या ७५ वर्षांपासून भारताने नियंत्रण मिळवले आहे. आमचा उद्देश अटारी सीमेवर तिरंग्याच्या ठिकाणी खलिस्तानचा झेंडा फडकावण्याचा आहे. ही निर्णायक वेळ आहे. आम्ही काश्मिरी मुजाहिदीन खलिस्तानच्या युद्धात शीख बंधू-भगिनींसमवेत आहोत.’’ या व्हिडिओत एका प्रसंगात तिरंगा ध्वजावर गोळीबार करण्यात येत असल्याचे दाखवले आहे.या व्हिडिओची गंभीर दखल घेऊन तपास यंत्रणा या महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.      

कोणतीही समस्या दुर्लक्ष करून संपत नसते, तर तिची पाळेमुळे नष्ट करावी लागतात. देशाचा लचका तोडू पहाणारी खलिस्तानवादी चळवळ उग्र रूप धारण करण्यापूर्वीच ठेचली पाहिजे. ही कीड कायमची हद्दपार करण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे.