डिचोलीतील कारापूरचे वीरभद्र नृत्य

कारापूर येथील वीरभद्राचे युद्धनृत्य गोमंतकातल्या लोकमानसासाठी आकर्षण ठरले. विठ्ठलापूर येथील राणे सरदेसाई आणि साखळी कारापूर त्याचप्रमाणे सत्तरीतील जनतेसाठी हा उत्सव आकर्षण ठरला.

Story: विचारचक्र | |
24th April, 01:03 am
डिचोलीतील कारापूरचे वीरभद्र नृत्य

डिचोली तालुक्यातील कारापूर या गावात वाळवंटी नदीच्या उजव्या तिरावरती विठ्ठलापूर वसलेले आहे. येथील श्री विठ्ठलाचे ऐतिहासिक मंदिर गेल्या पाच शतकांपासून भक्तांचे प्रेरणास्थान बनलेले आहे. या मंदिरात चंद्र कालगणनेतील चैत्रापासून फाल्गुनपर्यंत विविध सण उत्सवांचे आयोजन केले जाते. गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या रामनवमीच्या दुसऱ्या दिवसापासून ते हनुमान जयंतीपर्यंत चैत्रोत्सव संपन्न होतो. संपूर्ण गोव्यात कारापूर - विठ्ठलापूर येथील हा चैत्रोत्सव भाविकांचे आकर्षण ठरलेले आहे. पेडणे ते काणकोणपर्यंत गोव्यात ठिकठिकाणी श्री विठ्ठलाची मंदिरे उभारण्यात आलेली आहेत. त्यातील कारापूरचे मंदिर हे गोवा आणि परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान ठरलेले आहे. या मंदिराच्या चैत्रोत्सवात होणारे वीरश्रीयुक्त वीरभद्र नृत्य गोमंतकीयांसाठी आकर्षण ठरलेले आहे.

वीरभद्राचा शिवगणामध्ये समावेश होतो. भगवान शंकराने जेव्हा देवी पार्वतीच्या पित्याने म्हणजेच दक्ष राजाने आयोजित केलेल्या यज्ञात सहभागी होण्यासाठी गेली, त्यावेळी देवी पार्वती आणि तिचे पती भगवान शंकर यांना अपमानित केले म्हणून क्रोधीत झालेल्या पार्वतीने धगधगत्या यज्ञकुंडामध्ये आपणाला लोटून दिले. देवी पार्वती यज्ञात जळून खाक झाली. ही वार्ता समजल्यावर भगवान शंकराने आपल्या जटा आपटून शिवगणांना पाचारण केले. त्यातूनच वीरभद्राचा जन्म झाला. हाती नग्न तलवारी आणि क्रोधायमान अवस्थेमध्ये प्रकट झालेल्या वीरभद्राने दक्षाच्या यज्ञाचा विद्ध्वंस मांडला. त्याचे प्रलयंकारी आणि रौद्र भीषण रूप पाहून यज्ञसमारंभाच्या वेळी उपस्थित देवादिक घाबरून गेले. शेवटी भगवान शंकराने वीरभद्राला शांत केले आणि त्याला आकाशात मंगळ ग्रहाचे स्थान प्रदान केले. त्यानंतर वीरभद्र ही शिवगणामध्ये महत्त्वाची देवता गणली जाऊ लागली. 

आज भारतात वीरभद्राची ठिकठिकाणी मंदिरे निर्माण झालेली आहेत. परंतु कर्नाटकातल्या वीरशैव पंथांमध्ये वीरभद्राची उपासना विशेष लोकमान्य ठरलेली आहे. कर्नाटकातल्या बऱ्याच गावात वीरभद्राची एकापेक्षा एक सुंदर मंदिरे उभारण्यात आलेली आहेत. गोवा कदंब राजवटीत वीरशैव पंथियांच्या गुरूचे आगमन झाले असावे आणि पूर्वापार शिवभूमी असणाऱ्या गोमंतकात वीरभद्राचे चरित्र आणि जीवनकार्य लोकमानसात रुजले. कर्नाटकात वीरभद्राची जी मंदिरे उभारण्यात आली त्यातून प्रेरणा घेऊन गोमंतकात सोळाव्या शतकाच्या आसपास वीरभद्र नृत्य आयोजन बहुदा कारापूर येथील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात चैत्र पौर्णिमेच्या उत्सवात दरवर्षी होऊ लागले. कारापूर येथील वीरभद्राचे युद्धनृत्य गोमंतकातल्या लोकमानसासाठी आकर्षण ठरले. विठ्ठलापूर येथील राणे सरदेसाई आणि साखळी कारापूर त्याचप्रमाणे सत्तरीतील जनतेसाठी हा उत्सव आकर्षण ठरला. दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या चांदण्या रात्री वाळवंटी नदीच्या किनारी वसलेल्या श्री विठ्ठलाच्या मंदिराच्या प्रांगणात हाती तळपत्या तलवारी घेऊन व्रतस्थ वीरभद्र लोककलाकार युद्धनृत्य सादर करतो.

झांज, पखवाज या वाद्यांच्या संगीतावर हे युद्धनृत्य संपन्न होते. चैत्र पौर्णिमेच्या उत्सवाप्रीत्यर्थ विठ्ठलपुरात दर रात्रीला मोचेमाडकर दशावतारी नाट्य मंडळातर्फे लोकनाट्याचे सादरीकरण केले जाते. शेवटच्या रात्री दशावतारी नाट्यकलाकार दक्ष आख्यान सादर करतात आणि त्यात देवी पार्वती यज्ञात उडी मारल्यावर प्रत्यक्ष वीरभद्राचे आगमन मंदिराच्या प्रांगणात होते. त्यावेळी सहभागी लोकांत वीरश्रीचा संचार होतो. संपूर्ण वातावरण लोकसंगीताच्या पार्श्वभूमीवर भारावून जाते. लोकवाद्यांचे वादन शिगेला पोहोचते आणि त्यावेळेला युद्धनृत्याच्या अविष्कारात भावतलीन झालेला वीरभद्र बेभान होऊन नाचू लागतो. त्याच्यात संचार झाल्याचे भाविकात मानले जाते. हातातल्या तळपत्या तलवारींनी त्याने लोकांवर वार करू नये म्हणून दोन्ही बाजूने त्याला जेरबंद करण्यासाठी स्थानिक धडपडतात आणि शेवटी भारावलेल्या अवस्थेत वीरभद्राला शांत केले जाते. 

युद्ध नृत्याच्या वेळी वीरभद्राला आवाहन करण्यासाठी स्थानिक लोककलाकार, “कैलास वळीगे वीरभद्र अण्णा, विरानवीर महावीर वीरभद्र अण्णा” या आव्हानातून वीरभद्राची ही संकल्पना कर्नाटकातून आल्याचे स्पष्ट होते. वीरभद्राला आवाहन करण्यासाठी कन्नड भाषेतील विशेषणाचा वापर केला जातो. कारापुरातील वीरभद्राची लोकनृत्याची ही उत्सव परंपरा गोव्यातल्या बऱ्याच मंदिरांमध्ये लोकमान्य ठरलेली आहे. आज वीरभद्राचे युद्धनृत्य गोव्यात सांगेतील कोसंबे घरातल्या लोककलाकाराने स्वीकारलेले आहे. सांगे शहरातील ग्रामदैवत पाईक देवाच्या सानिध्यात स्त्री कलाकार मयुरावर विराजमान होऊन शारदा नृत्य सादर करते आणि त्यानंतर मर्दानी पुरुष वीरभद्राचे सादरीकरण करतो. फोंडा शहरात श्री विठ्ठलाच्या प्रेरणेने वीरभद्राचे युद्धनृत्य शिमगोत्सवाच्या समारोपाच्या कालखंडात संपन्न होते. फोंडा तालुक्यातील धालोत्सव हा जरी कष्टकरी महिलांचा लोकोत्सव असला तरी त्यात शेवटच्या दिवशी वीरभद्राचे होणारे युद्धनृत्य आकर्षण ठरलेले असते. पेटलेल्या आगीचा राळ उठलेला असतो आणि या प्रकाशात वीरश्रीयुक्त वीरभद्राचे लोकनृत्य संपूर्ण वातावरण चैतन्यमय करून टाकते. डिचोली शहरामध्ये गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला देवी शांतादुर्गेच्या मठामध्ये वीरभद्राचे पारंपरिक युद्ध नृत्य सादर केले जाते. गोव्यातल्या मंदिरात वीरभद्र युद्धनृत्याची लोकपरंपरा गेल्या कित्येक शतकांपासून अव्याहतपणे चालू आहे. या लोकनृत्याच्या सादरीकरणातून कधी काळी गोवा ही शिवभूमी होती आणि इथे जेव्हा वैष्णव संप्रदायाचे आगमन झाले, तेव्हा जुन्या परंपरा आणि इतिहास यांची सांगड घालणारा लोकोत्सव त्या ठिकाणी आयोजित करावा जेणेकरून व्यापार उद्योगाला चालना लाभेल, दूरवरच्या भाविकांची पावले लोकोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी येतील, ही त्यामागची आयोजकांची भावना असली पाहिजे. आज वीरभद्राचे युद्धनृत्य गोमंतकाच्या लोकनृत्य परंपरेमध्ये आकर्षण बिंदू ठरलेले आहे. डिचोली, फोंडा, सांगे आदी ठिकाणी संपन्न होणारे हे युद्धनृत्य इथला समृद्ध इतिहास आणि लोकसंस्कृतीवर प्रकाशझोत टाकत आहे. गोवा कदंब, बहामनी, विजयनगर, आदिलशाही अशा राजघराण्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा इथल्या सांस्कृतिक जीवनावर उमटलेल्या आजही प्रकर्षाने पाहायला मिळतात. त्यात वीरभद्राचे युद्धनृत्य ही एक अपूर्व अशी परंपरा आहे. गोव्यात ख्रिस्ती झालेल्या कुणबी जमातीत धालोत्सवाची आणि फुगडीची परंपरा आजही पाहायला मिळते. माणसाचा धर्म बदलला तरी त्याची संस्कृती सहजासहजी नष्ट होत नसते, त्याची प्रचिती कुणबी नृत्यातून पाहायला मिळते. सासष्टीतील चांदोर हे पूर्वाश्रमीचे चंद्रपूर राजधानीचे शहर. कुशावती नदीकिनारी वसलेली ही राजधानी आज परिवर्तनाच्या लाटेत आहे, परंतु येथे संपन्न होणारे मुसळ नृत्य जुन्या ऐतिहासिक पाऊलखुणांचे दर्शन घडवते. कारापूर गावातील विठ्ठलापूर येथे चैत्र पौर्णिमेच्या उत्सव प्रसंगी होणारे वीरभद्राचे युद्धनृत्य आम्हाला या मंदिराच्या ऐतिहासिक संचितांचे दर्शन घडवते. वीरभद्राचे युद्धनृत्य पाहण्यासाठी गोव्यातूनच नव्हे तर देशाच्या अन्य भागांतून लोकसंस्कृतीचे जाणकार येतात आणि या कृत्याच्या आविष्काराने प्रफुल्लित होतात.

प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून पर्यावरणप्रेमी आहेत.)
मो. ९४२१२४८५४५