अर्जुन तेंडुलकर खेळू शकतो गोव्यातर्फे देशांतर्गत क्रिकेट


12th August 2022, 02:39 am
अर्जुन तेंडुलकर खेळू शकतो गोव्यातर्फे देशांतर्गत क्रिकेट

पणजी : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत असून पुढील देशांतर्गत हंगामात तो गोव्यासाठी खेळू शकतो. डावखुरा वेगवान गोलंदाज इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा एक भाग होता. त्याने २०२०-२१ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हरयाणा आणि पुद्दुचेरीविरुद्ध मुंबईसाठी दोन सामने खेळले. ज्युनियर तेंडुलकरने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी (एनओसी) अर्ज केल्याचे कळते.
एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटने एका निवेदनात म्हटले आहे की, करिअरच्या या टप्प्यावर अर्जुनसाठी जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवणे महत्त्वाचे आहे. आम्हाला विश्वास आहे की दुसऱ्या स्थानावरून खेळल्याने अर्जुनला अधिक स्पर्धात्मक सामने खेळण्याची संधी मिळेल. तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा नवा पर्व सुरू करत आहे.
अर्जुन तेंडुलकरने तीन हंगामापूर्वी भारताच्या अंडर-१९ संघाकडून श्रीलंकेविरुद्ध दोन सामने खेळले होते. त्यावेळी मुंबईच्या संभाव्य मर्यादित षटकांच्या संघातही त्याचा समावेश होता. अर्जुनसाठी सर्वात मोठी निराशा म्हणजे या मोसमात त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी न मिळाल्याने मुंबई संघातून वगळण्यात आले. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अर्जुन तेंडुलकरचा राज्यातील संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश केला जाऊ शकतो.
जीसीएचे अध्यक्ष सूरज लोटलीकर म्हणाले, आम्ही डावखुरा वेगवान गोलंदाज शोधत आहोत. म्हणूनच आम्ही अर्जुन तेंडुलकरला गोवा संघात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. हंगामापूर्वी आम्ही मर्यादित षटकांचे सराव सामने खेळू आणि तो या सामन्यांमध्ये खेळेल. या सामन्यातील त्याच्या कामगिरीच्या आधारे निवड समिती त्याला संघात ठेवण्याचा निर्णय घेतील.