नितीश कुमार बनले आठव्यांदा मुख्यमंत्री

बिहारमधील राजकीय घडामोडी; उपमुख्यमंत्रिपदी तेजस्वी यादव

|
10th August 2022, 08:08 Hrs

पटना : महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून येथे नितीश कुमार यांनी भाजपाशी काडीमोड घेत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या पदासाठी त्यांनी आठव्यांदा शपथ घेतली आहे. त्यांनी भाजपसोबत असलेली युती तोडून राष्ट्रीय जनता दल (राजद) तसेच इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन महागठबंधनची स्थापना केली आहे. नितीश कुमार यांच्यासोबत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनीदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राजद या पक्षासोबत महागठबंधन करून बिहारमध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन केले आहे. त्यांनी बुधवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महागठबंधनमध्ये एकूण सात पक्ष आहेत. महागठबंधनमधील सर्व पक्षांचे एकूण १६४ आमदार असून या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र त्यांनी मंगळवारीच राज्यपालांकडे सोपवले होते. त्यानंतर बुधवारी राज्यपालांनी त्यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले होते.
२०१७ मध्ये ‘काहीही झाले तरी राजदसोबत जाणार नाही’, म्हणणारे नितीश कुमार बुधवारी त्यांच्याच पाठिंब्यावर पुन्हा मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जाहीर आव्हान दिले आहे. निवडणूक काळात त्यांचे (भाजप) वागणे योग्य नव्हते. आमच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. पण त्यांच्याकडून जदयूला हरवण्यासाठीच प्रयत्न केले गेले. मी आमच्या पक्षातील सर्वांशी चर्चा केली. सगळ्यांच्याच मनात या आघाडीत राहायला नको हीच भावना होती. म्हणून भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. अटल बिहारी वाजपेयींकडे आम्ही सगळे गेलो होतो. ते आम्हाला फार मानत होते. आम्ही ते कधीही विसरू शकत नाही. वाजपेयी आणि इतरांनी दिलेलं प्रेम आम्ही विसरू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.

पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्ष आव्हान

नितीश कुमार यांनी भाजपशी युती तोडून बिहारमध्ये नवे सरकार स्थापन केल्यानंतर त्यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देणारा विरोधी पक्षांचा चेहरा म्हणून पाहिले जाऊ लागले होते. मात्र, पंतप्रधान पदाच्या उमेदवारीमध्ये आपल्याला रस नसल्याचे नितीश कुमार यावेळी म्हणाले. २०२४ च्या कोणत्याही पदासाठी आमची दावेदारी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ मध्ये जिंकले, पण २०२४ मध्ये ते जिंकतील का? अशा शब्दांत नितीश कुमार त्यांच्यावर टीका केली आहे. यातून त्यांनी मोदींना अप्रत्यक्ष आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.