कुंकळ्ळीत मासळीवाहू ट्रकला अपघात, चालक जखमी


09th August 2022, 12:34 am
कुंकळ्ळीत मासळीवाहू ट्रकला अपघात, चालक जखमी

कुंकळ्ळी येथे नदीपात्रात पडलेला मासळीवाहू ट्रक. (संतोष मिरजकर)

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव :
मंगळुरुवरून मासळी घेऊन रत्नागिरी (महाराष्ट्र) येथे जात असलेला मासळीवाहू ट्रक कुंकळ्ळी येथील उस्कीनीबांध-पांझरखण याठिकाणी पुलावरुन नदीपात्रात पडण्याची घटना रविवारी रात्री घडली. यात जखमी चालक एमडी नईम अन्सारी याला दुखापत झाली आहे. चालकाला झोप लागल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चालक एम.डी. नईम अन्सारी हा मंगळुरु येथून मासळी ट्रकमध्ये भरून ती रत्नागिरी-महाराष्ट्र याठिकाणी घेऊन जात होता. रविवारी मध्यरात्री सुमारे १च्या सुमारास हा मासळीवाहू ट्रक कुंकळ्ळीतील उस्कीनीबांध-पांझरखण येथे आला असता, ट्रकचालकाचा गाडीवरील ताबा सुटला व हा ट्रक पुलाच्या संरक्षक कठडा तोडून थेट नदीपात्रात कोसळला. या दुर्घटनेत ट्रकचालक अन्सारी हा जखमी झाला. मात्र, अपघातानंतर जखमी अवस्थेतच चालक क्लिनरच्या बाजूच्या दरवाज्यातून बाहेर आला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. कुंकळ्ळी पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये हे प्रकरण नोंद केले आहे. चालकाला झोप लागली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

रस्त्याचे तत्काळ रुंदीकरण करा : नाईक
कुंकळ्ळीतील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नाईक यांनी सांगितले की, रात्रीच्यावेळेस हा अपघात झाला असून वारंवार या रस्त्यावर अपघात होत असतात. कारण हा रस्ता खूप अरुंद आहे. राज्यातील सर्व महामार्ग, बायपासचे रुंदीकरण झाले. याआधी गडकरी यांनीही सारझोरा-बाळ्ळी रस्ता करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या रस्त्यासाठी कोणाचीतरी जागा संपादित केली जात असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण केले जात नाही. या रस्त्यावर मोठेमोठे ट्रक येतात, रेल्वेचे कंटेनर यार्ड असून तेही याच रस्त्यावरून जातात. त्यामुळे राज्य सरकारने तत्काळ या रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी त्यांनी केली.       

हेही वाचा