संशयितांचे जामीन अर्ज फेटाळले

द. गोव्यातील आर्थिक फसवणूक प्रकरण

|
09th August 2022, 12:33 Hrs
संशयितांचे जामीन अर्ज फेटाळले

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव :
दक्षिण गोव्यातील गुंतवणूकदारांची जादा व्याजदराचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक झाली होती. याप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य संशयित जयकुमार गोहील याच्यासह स्वेझेल फर्नांडिस, लिंबाजी लमाणी आणि मुईद माधवानी या तिघांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता. सोमवारी या चौघांचेही अर्ज न्यायालयाकडून फेटाळून लावण्यात आले.
दक्षिण गोव्यातील मडगाव, पाजीफोंड व वास्को परिसरात कार्यालय काढून अडीच हजारांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांना रंजिता एंटरप्रायझेसच्या माध्यमातून जादा व्याजदराचे आमिष दाखवून सुमारे ९ कोटी ३३ लाख रुपयांना फसवण्यात आले. या आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी आर्थिक गुन्हा विभागाकडे नोंद झाल्या होत्या. त्या सर्वांचा तपशील घेऊन पोलीस निरीक्षक विद्धेश शिरोडकर यांनी मुख्य संशयित तथा कंपनीचे मालक जयकुमार गोहील, त्याची पत्नी आरती कश्यप यांच्यासह कर्मचारी स्वेझेल फर्नांडिस, लिंबाजी लमाणी आणि मुईद माधवानी या संशयितांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
त्यानंतर विभागाचे पोलीस निरीक्षक राजाशद शेख यांनी वरील संशयितांविरोधात गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या विविध कलम अंतर्गत आणि गोवा ठेवीदार व्याज संरक्षण कायद्यांतर्गत आणि बक्षीस, फसवणूक आणि पैसा अभिसरण योजना (बंदी) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मुख्य संशयित जयकुमार गोहीलला गुजरात येथून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर कंपनीचे कर्मचारी स्वेझेल फर्नांडिस, लिंबाजी लमाणी आणि मुईद माधवानी या तिघांना अटक करण्यात आली होती. या तिन्ही संशयित कर्मचार्‍यांना दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असून स्वेझेल फर्नांडिस, लिंबाजी लमाणी आणि मुईद माधवानी या तिघांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. तिघांच्याही जामीन अर्जावर सुनावणीवेळी न्यायालयात पोलिसांनी त्यांची बाजू मांडली.

आर्थिक गुन्हा शाखेकडून अटक केलेल्या रंजिता एंटरप्रायझेस कंपनीचे जयकुमार गोहील यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच गोहिल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यावर तोही फेटाळण्यात आला. आरती कश्यप या मुख्य संशयित जयकुमार गोहिलच्या पत्नीला १५ महिन्यांचे मूल असल्याने तिला याआधीच जामीन मिळालेला आहे.