संशयित विकी देशमुखला जामीन मंजूर


09th August 2022, 12:32 am
संशयित विकी देशमुखला जामीन मंजूर

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी :
मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध पोलीस स्थानकांत गुन्ह्यात हवा असलेल्या कुख्यात गुन्हेगार विक्रांत उर्फ विकी दत्तात्रय देशमुख याच्या पणजी पोलिसांनी मुसक्या आवळून अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या संशयिताला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने २० हजार रुपयांचा व इतर अटीवर जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणी नवी मुंबई पोलीस विभागाच्या नेरुळ पोलीस स्थानकात आपल्या टोळीतील सहकारी सचिन गार्जे याच्या अपहरण आणि खून प्रकरणात २०१९ मध्ये खून प्रकरणी, भादंसंच्या, शस्त्र कायदा आणि मोक्का कायदांतर्गत विक्रांत उर्फ विकीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात तो फरार असल्यामुळे मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान, विकी गोव्यात असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली होती. त्यानुसार उत्तर गोव्यात त्याच्यावर पाळत ठेवण्यात आले.
त्यानुसार शनिवार ३० जुलै रोजी सायंकाळी संशयित विकी पणजीच्या एका कॅसिनोत असल्याचे माहिती पणजी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या गाडीजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतला. याच दरम्यान त्याच्या गाडीची झडती घेतली असता, त्याच्या गाडीत एक पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूस सापडली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून रीतसर अटक केली.
अटक केलेल्या संशयित विकीला न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी ठोठावली होती. दरम्यान संशयिताने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी सोमवारी न्यायालयाने संशयिताला २० हजार रुपयाचा वैयक्तिक बाॅन्ड आणि १० हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, संशयित विकी देशमुख याची पोलीस कोठडी संपल्यानंतर मुंबई पोलिसांनी २०१९ मधील टोळीतील सचिन गार्जे अपहरण आणि खून प्रकरणात हस्तांतरण रिमांडावर त्याला ताब्यात घेतले होते.      

हेही वाचा