अंगणवाड्या दत्तक घेण्याचा उपक्रम मुलांना प्रोत्साहन देण्यासाठीच!

शिक्षण संचालकांकडून संभ्रम दूर; प्रतिसाद ​वाढत असल्याचेही केले स्पष्ट

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
05th August 2022, 11:39 Hrs
अंगणवाड्या दत्तक घेण्याचा उपक्रम मुलांना प्रोत्साहन देण्यासाठीच!

पणजी : अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या बालकांना मोठ्या विद्यार्थ्यांकडून प्रोत्साहन मिळावे, याच हेतूने उच्च माध्य​मिक विद्यालयांना अंगणवाड्या दत्तक घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उच्च माध्यमिकनी अंगणवाड्या दत्तक घेतल्यानंतरही संबंधित अंगणवाड्या आहे तेथेच सुरू राहतील. त्यावर महिला आणि बाल कल्याण खात्याचाच ताबा राहील, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी शुक्रवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांनी अंगणवाड्या दत्तक घ्याव्यात, अशी सूचना करणारे परिपत्रक शिक्षण खात्याने काहीच दिवसांपूर्वी जारी केले. खात्याच्या या परिपत्रकानंतर अनेकांमध्ये संभ्रम पसरला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना, उच्च माध्य​मिक विद्यालये ज्या अंगणवाड्या दत्तक घेतील तेथील मुलांना आठवड्यातून किमान एकदा संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयांत नेण्यात येईल. तेथील विद्यार्थ्यांसमोर मुलांचे विविध कार्यक्रम घेण्यात येतील. त्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या विद्यार्थ्यांनी अंगणवाड्यांतील मुलांना प्रोत्साहन द्यावे, विद्यालयांनी अंगणवाड्यांना आवश्यक ते सहकार्य करावे केवळ इतकाच उद्देश या निर्णयामागे आहे, असेही झिंगडे म्हणाले.

पंतप्रधानांची होती इच्छा

शिक्षण खात्याने परिपत्रक जारी केल्यानंतर अनेक उच्च माध्यमिक विद्यालयांनी एकापेक्षा जास्त अंगणवाड्या दत्तक घेण्याची तयारी दर्शवली आहे, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले. उच्च माध्यमिक विद्यालये आणि अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांना अशाप्रकारे एकत्र आणण्याची​ इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती. त्यानुसारच, राज्यात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.