समाजसेवेसाठी झुंजणारी : श्रृती सुरेश घाटवळ

Story: गगनभरारी | प्राची नाईक, दाडाचीवाडी, धा� |
05th August 2022, 10:46 pm
समाजसेवेसाठी झुंजणारी : श्रृती सुरेश घाटवळ

लता शंकर कोरगावकर यांचा जन्म १८ जानेवारी, १९६७ रोजी गोव्यातील काणका-म्हापसा येथे झाला. त्या लहान असताना त्यांच्या घरात राजकारणाविषयीची चर्चा होत असायची, त्यामुळे लता यांना लहान असतानाच राजकारणात उत्सुकता व आवड निर्माण झाली. ९ जुलै, १९८९ रोजी शिरगाव गावातील सुरेश सिताराम घाटवळ यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या आणि त्यांचे सासरचे नाव श्रृती सुरेश घाटवळ झाले. परमेश्वर योगायोग जुळवून आणतो अगदी तसंच झालं. श्रृती यांचे सासरे स्व. सिताराम गो.घाटवळ हे स्वतंत्र सैनिक होते. त्यांनी कित्येक काळ तुरुंगवास भोगला होता. त्यांनाही राजकारणाची आवड होती. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर ते पंचायतीची निवडणूक लढले व  जिंकले. ते गरीब व गरजू लोकांना नेहमी मदत करायचे.

श्रृती घाटवळ यांचे उद्दिष्ट होते की समाजातील लोकांसाठी काहीतरी चांगले करावे. श्रृती यांना निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी त्यांच्या संपूर्ण परिवाराने समर्थन दिले व संपूर्ण वाडा (मधलावाडा शिरगाव) त्यांच्या सोबत राहिला आणि १९९७ मध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत श्रृती घाटवळ शिरगाव गावात बहुमतांनी पंच म्हणून निवडून आल्या. चार वर्षे उपसरपंच आणि एक वर्ष पंच म्हणून त्यांनी समाजसेवा केली. दारिद्र्याखालील (बी.पी.एल) लोकांना त्यांनी आर्थिक मदत केली. स्वावलंबी मंडळ उभे करून त्यातून शिरगाव गावातील लोकांपर्यंत अनेक असे उपक्रम सुरू केले.

काही काळानंतर त्या आपल्या कुटुंबासोबत मुळगाव येथे स्थायिक झाल्या. २०१२ साली त्या मुळगाव पंचायत निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या. शिरगावातील लोकांनी त्यांना एक पंच, सरपंच म्हणून वावरताना पाहिले होते. त्यांच्या एकजुटीने, कष्ट घेऊन काम करण्यामुळे त्यांना मुळगाव पंचायत निवडणुकीसाठी उभे राहण्याची संधी मिळाली आणि २०१२ मध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीच्या वेळी पुन्हा बहुमतांनी विजयी झाल्या. आणि तिथेही त्यांनी आपले कार्य चालू ठेवले. आपल्या सामाजिक कार्यात कधीही खंड पडू दिला नाही. एस. एच. जी. च्या माध्यमातून त्यांची सगळीकडे ओळख झाली. 

२०१२ ते २०१७ या काळात त्यांनी लोकांसाठी अनेक योजना आखल्या. वॉटर रिसॉर्ट डेव्हलपमेंटच्या अंतर्गत ओहोळ बांधले. त्यांनी घरोघरी पाणी पुरवठा, वीज पुरवठा, ग्रह आधार तसेच लाडली लक्ष्मी योजना प्रदान केली. तसेच दयानंद सामाजिक सुरक्षेच्या अंतर्गत  ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कार्ड उपलब्ध करून दिले. २०१६ साली त्या एन. आर. आय. एम. (स्त्री शक्ती)ला सामील झाल्या आणि त्यांच्यामार्फत प्रशिक्षण घेऊन सी.आर. पी. म्हणून त्यांची निवड झाली.

२०१७ साली त्यांनी साळ, मुळगाव, शिरगाव या पंचायतीच्या मार्फत स्वावलंबी मंडळ तयार करून ग्रामीण भागातील महिलांना विविध प्रकारची मदत केली. २०१८ मध्ये त्यांनी दीनदयाळ पथक संस्थेच्या संचालक म्हणून काम केले. व त्यांच्या माध्यमातून शाळा, आयुर्वेदिक दवाखाने सुरू केले.

२०१८ मध्ये ( स्त्री शक्ती) या प्रकल्पातून वेगवेगळ्या तालुक्यात जसे (पेडणे, सत्तरी डिचोली, तीसवाडी, बार्देस) या स्वावलंबी मंडळाच्या महिलांना प्रशिक्षण दिले. त्याचप्रमाणे त्यांनी ज्या लोकांच्या मदतीसाठी योजना आखल्या होत्या त्या तशाच चालू ठेवल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून त्यांचे अजूनही काम चालूच आहे.

श्रृती घाटवळ म्हणतात की "मी आता इथपर्यंत पोहोचले ते फक्त माझ्या माणसांच्या सहकार्यामुळे. त्या म्हणतात की, आपले पती श्री. सुरेश घाटवळ सदैव माझ्यामागे पाठीच्या कण्याप्रमाणे उभे राहतात. त्याचप्रमाणे स्त्री शक्ती प्रोजेक्टमध्ये त्यांना आणणाऱ्या वसुंधरा राणे आणि GIPARD मध्ये सहभागी करून घेणाऱ्या सरिता पाटील या दोघांचेही  त्यांना सहकार्य लाभले. श्रृती घाटवट यांनी नेहमीच पुढाकार घेऊन लोकांना आर्थिक मदत केली. समाजसेवा करून त्याच बरोबर राजकारणही सांभाळले.  यांना पुढील वाटचालीस व भावी कार्यास शुभेच्छा.