चर्चा फक्त ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची !

दारू पिऊन वाहने हाकणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलीस व वाहतूक खात्याने मोहीम उघडावी. जेवढे निष्काळजी दारू पिऊन वाहन चालवणारे असतात तेवढाच निष्काळजीपणा संबंधित सरकारी खात्यांकडून होत आहे. वाहतूक कायद्याची अंमलबजावणी नाही, ओव्हर स्पीडने वाहने हाकणाऱ्यांवर सरकारचे नियंत्रण नाही. गोव्यातील रस्त्यांवर सीसीटीव्हीचे जाळे विणून नियम मोडणाऱ्यांवर त्वरित कारवाई होत असेल तर बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणा होईल.

Story: उतारा | पांडुरंग गांवकर |
30th July 2022, 10:08 Hrs
चर्चा फक्त ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची !

ड्रंक अँड ड्राईव्हमुळे अपघात होऊन कित्येकांचे प्राण गेले. हे आताही सुरूच आहे. यापूर्वी महामार्गालगतची मद्यविक्रीची दुकाने हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. पण त्यानंतर त्या निकालाचा इतका फेरआढावा घेतला गेला, की आता किमान गोव्यात तरी रस्त्याच्या बाजूला दारुची विक्री ‘जैसे थे’च आहे. निवाड्यातून पळवाटा काढत काहींनी अंतर मोजण्यासाठी शक्कल लढवली तर काहींनी शहरी क्षेत्र, ग्रामीण क्षेत्र अशी भागांची विभागणी केली. त्यामुळे सुमारे तीन हजार मद्यालये जी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बंद होणार होती ती वाचली. आज ही सर्व मद्यालये सुरू आहेत. दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांपासून ते पोलीस महासंचालकांपर्यंत सगळेच जबाबदार लोक आता 'ड्रंक अँड ड्राईव्ह'वर बोलत आहेत. पण, रात्री उशिरापर्यंत अनेक मद्यालये खुली असतात.

महामार्गाच्या परिसरातही अनेक ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये मद्य विक्री सुरू असते. 'ड्रंक अँड ड्राईव्ह'चा जो मुद्दा आज सर्वात जास्त चर्चिला जात आहे त्याला कारण आहे दोन दिवसांपूर्वी जुवारी नदीत वाहन कोसळून वाहनातील चार जणांचा बुडून झालेला मृत्यू. या घटनेने संपूर्ण राज्य हळहळले. कारण गोव्यात असे अपघात यापूर्वी फार कमी घडले आहेत. मागच्या महिन्यात म्हापसा येथे बेळगावमधील युवकांचे वाहन पहाटेच्या दरम्यान झाडावर धडकल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला होता. म्हापशातील अपघातामुळे 'ड्रंक अँड ड्राईव्ह'चा विषय चर्चेला आला नव्हता. पण परवा जुवारी पुलावरून वाहन नदीत कोसळल्यामुळे राज्यभर या अपघाताची चर्चा अजूनही सुरू आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मते रात्रीच्या दरम्यान जे अपघात होतात त्यातील बहुतांशी अपघात हे वाहन चालकांनी दारू पिलेली असते त्यामुळेच होतात. मुख्यमंत्र्यांशी मी या विषयावर परवा बोलताना असे अपघात घडू नयेत यासाठी काही गोष्टी करण्याचा त्यांचा विचार आहे हे लक्षात आले. तसे त्यांनी बोलूनही दाखवले. त्यानंतर त्यांनी काही गोष्टी मीडियासमोरही उघड केल्या. पण बऱ्याच गोष्टी ते माझ्यासोबत बोलून गेले होते. त्यातील एक-दोन गोष्टी अंमलात आल्या तर अनेकांचे जीव वाचू शकतात.

मोटर वाहन कायदा २०१९ मध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद आहे. दारू पिऊन वाहन चालवत असलेल्या व्यक्तीला सहा महिन्यांची कैद किंवा दहा हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा तोच गुन्हा केल्यास दोन वर्षांपर्यंत कैद किंवा १५ हजार रुपयांपर्यंत दंड अशी तरतूद आहे. इतकेच नव्हे तर मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवताना आढळल्यास त्यालाही तीन हजार रुपये दंड किंवा तीन महिन्यांचा कारवास अशी शिक्षा आहे. एवढ्या तरतुदी असल्या तरी त्याची अंमलबजावणी होत नाही तर अशा कायद्यांचा काहीच उपयोग नाही. कायद्यातील दंडाच्या तरतुदीही कडक करायला हव्यात. एखादा दारू पिलेला वाहनचालक एखाद्याला धडक देतो तेव्हा त्या चालकाला तुरुंगवास होण्याची गरज आहे. त्याने ठोकर देऊन एखाद्याचा बळी घेतला तर त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हायला हवा. कारण दारू पिऊन वाहन चालवणे हा गुन्हा आहे. पण तो गुन्हा जर कोणी करत असेल व गुन्हा करून सहिसलामत घरी जात असेल तर कायद्यातील पोकळ तरतुदींना काहीच अर्थ राहत नाही. कायद्याचा फेरविचार करताना दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना सक्तीने काही महिन्यांची कैद व दंडाची रक्कम अनिवार्य करण्याची गरज आहे. अन्यथा नियम मोडणारे गुन्हे करत राहतील आणि मोकाट फिरत राहतील. २०२० मधील देशातील रस्ते अपघात व अपघातात मृत्यू आलेल्यांचे आकडे पाहिले तर रस्त्यांवरील वाहन चालवणाऱ्यांकडून किती नियम मोडले जातात ते लक्षात येईल. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या संशोधन विभागाने २०२० मध्ये दारू किंवा ड्रग्स सेवन करून वाहन चालवणाऱ्यांकडून ३,४१६ अपघात झाले व त्यात १,८६२ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. २०१९ मध्ये ५,१२२ अपघात व २,३७६ लोकांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये ओव्हर स्पीडमुळे ९८,२९४ अपघात व ३६,५६६ लोकांचे जीव गेले. २०२० मध्ये असे अपघात ८५,६१६ झाले व त्यात ३२,८७३ जणांचा मृत्यू झाला. दारू पिऊन वाहन चालवणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे, मोबाईल फोनवर बोलत वाहन चालवणे, चुकीच्या मार्गाने वाहन हाकणे, सिग्नल तोडणे अशा अनेक कारणांमुळे देशात २०२० मध्ये १,१५,४५१ अपघात झाले ज्यात तब्बल ४७,६७० लोकांचे बळी गेले. गोव्यात जरी दारू पिऊन अपघात झाल्यानंतर मृत्यू आलेल्यांची संख्या उपलब्ध नसली तरी मर्यादेबाहेर वेगाने वाहन चालवणाऱ्यांमुळे झालेल्या १,८४५ अपघातांमध्ये १८१ लोकांचा मृत्यू झाला आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्याविषयी माहिती एकत्र करण्यासाठीही यंत्रणा नसल्यामुळे ते आकडेच कमी दाखवले जातात. वाहतूक मंत्रालयात गोव्यातील फक्त आठ अपघातांची नोंद आहे. पण सत्य स्थिती ही नाही. रात्रीच्यावेळी होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यू आलेले अनेकजण हे दारुच्या नशेत असतात. पोलिसांनी व वाहतूक खात्याने रात्रीची गस्त वाढवून जर मोहीम उघडली तर महिन्याभरात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची संख्या समोर येईल. चौकशी केली जात नाही त्यामुळेच कोणी सापडत नाहीत. जुवारी नदीत वाहन पडून झालेल्या भीषण अपघातामुळे रस्ते अपघातांची जबाबदारी कोणाची अशी चर्चाच सुरू झाली आहे. मुख्यमंत्री, वाहतूक मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पोलीस महासंचालक या सर्वांचीच वेगवेगळी मते आहेत. कोण म्हणतो रस्त्यांना दोष नको, कोण म्हणतो सरकारला दोष नको, कोण म्हणतो ओव्हर स्पीडमुळे अपघात जास्त होतात तर कोणी म्हणतो दारू पिऊन वाहन चालवत असलेल्या लोकांमुळे जास्त अपघात होतात. ‘चांगले रस्ते, सुरक्षित रस्ते’ हा जनतेचा अधिकार आहे. त्यामुळे मंत्र्यांनी त्यावर आपले ज्ञान पाजळू नये. वाहतूक खाते फक्त ठराविक गोष्टींवरच लक्ष केंद्रीत करून आहे. दारू पिऊन वाहने हाकणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलीस व वाहतूक खात्याने मोहीम उघडावी. जेवढे निष्काळजी दारू पिऊन वाहन चालवणारे असतात तेवढाच निष्काळजीपणा संबंधित सरकारी खात्यांकडून होत आहे. वाहतूक कायद्याची अंमलबजावणी नाही, ओव्हर स्पीडने वाहने हाकणाऱ्यांवर सरकारचे नियंत्रण नाही. गोव्यातील रस्त्यांवर सीसीटीव्हीचे जाळे विणून नियम मोडणाऱ्यांवर त्वरित कारवाई होत असेल तर बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणा होईल. जी मद्यालये रात्री उशिरापर्यंत दारू विकतात त्यांना मद्य सेवन केलेल्यांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची सक्ती केल्यासही अनेक अपघात टळू शकतात. दंडाची रक्कम, कैद अशा कठोर तरतुदी कायद्यात करण्याची अत्यंत गरज आहे. गृह, वाहतूक व सार्वजनिक बांधकाम खात्याने संयुक्तपणे काम केल्यास गोव्यातील अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात येऊ शकते.