‘मराठी’ची भरारी

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी- कलाकारांनी आणि प्रतिभावंतांनी उमटवलेला आपला ठसा मराठीजनांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. सध्याचे मराठी चित्रपट, त्यांचे विषय आणि मांडणीचा विचार करता दर्जेदार कलाकृती संघर्षाच्या अवस्थेत आहेत, असे म्हणता येईल. उत्तमोत्तम देण्याचा निर्माते-दिग्दर्शकांचा प्रयत्न टिकून राहायला हवा आणि स्वतंत्र शैली विकसित करण्याची धडपडही कायम राहायला हवी. त्या दृष्टीने पुरस्कारांमुळे उत्तेजन मिळते हे बरोबरच आहे; परंतु सरकार आणि प्रेक्षकांनीही उत्तमोत्तम प्रयत्नांची सातत्याने दखल घ्यायला हवी.

Story: प्रासंगिक | राजीव मुळ्ये |
30th July 2022, 10:04 pm
‘मराठी’ची भरारी

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांची हिस्सेदारी यंदाही चांगली आहे. राष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपट यश मिळवतात; परंतु प्रेक्षकांना ते बर्‍याच वेळा पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालूनसुद्धा प्रेक्षकांनी चित्रपट बघितल्यावर, त्यांची वाहवा मिळवल्यावर निर्माता, दिग्दर्शक आणि कलावंतांना जो आनंद मिळतो त्याला ते पारखे होतात. कारण प्रेक्षकांची दाद हाच खर्‍या कलावंतासाठी एक पुरस्कार असतो. मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पातळीवर यावर्षी भरघोस यश मिळाले आहे. गोष्ट एका पैठणीची हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. सायली संजीव आणि शशांक केतकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंतनू रोडे यांनी केले आहे. मी वसंतराव या चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याखेरीज गोदाकाठ, जून, सुमी, कुंकुमार्जन या चित्रपटांनाही विविध विभागांमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. जून हा चित्रपट नेहा पेंडसे यांची निर्मिती असून, या चित्रपटासाठी अभिनेता सिद्धार्थ मेनन याला विशेष पुरस्कार घोषित झाला आहे. अवांछित आणि गोदाकाठ या चित्रपटासाठी अभिनेते किशोर कदम यांनी विशेष ज्यूरी पुरस्कार पटकावला आहे. टकाटक चित्रपटासाठी अनिश गोसावीला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार मिळाला आहे. कुंकुमार्चन हा चित्रपट उत्कृष्ट कौटुंबिक मूल्य असलेला चित्रपट ठरला आहे.

राष्ट्रीय पुरस्काराच्या मुख्य विभागात तान्हाजी ः द अनसंग वॉरिअर चित्रपटासाठी अजय देवगण सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे. या चित्रपटाला लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला असून, त्याचे दिग्दर्शन ओम राऊत या मराठी दिग्दर्शकाने केले आहे, हीसुद्धा मराठी रसिकांसाठी अभिमानास्पद गोष्ट ठरली आहे. नचिकेत बर्वे या आणखी एका मराठी कलावंताने सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कार पटकावला आहे. हिंदी भाषेतील सर्वोत्कृष्ट ठरलेल्या तुलसीदास ज्युनिअर या चित्रपटाच्या यशामध्येही आशुतोष गोवारीकर या मराठी दिग्दर्शकाचा सिंहाचा वाटा आहे. मुख्य विभागात सूरराई पोत्रू हा तमिळ चित्रपट सर्वश्रेष्ठ ठरला. उत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचे पुरस्कारही याच चित्रपटाने पटकावले. तमिळव्यतिरिक्त कन्नड आणि मल्याळम या दाक्षिणात्य भाषांमधील चित्रपटांचा मुख्य विभागात दबदबा दिसून येतो. गेल्या काही वर्षांत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने कलात्मकता, आशय आणि व्यावसायिक यश या सर्वच पातळ्यांवर आघाडी घेतलेली दिसत आहे. बॉलिवूडमध्ये तयार होणार्‍या चित्रपटांच्या तुलनेत कितीतरी अधिक यश हिंदीत डब केलेले दाक्षिणात्य चित्रपटांना मिळत आहे. व्यावसायिक गणितांच्या बाबतीत त्या चित्रपटांच्या पावलावर पाऊल टाकावे की स्वतःची स्वतंत्र वाट चोखाळावी, या द्विधावस्थेत सध्या बॉलिवूडमधील निर्माते-दिग्दर्शक आहेत.  मराठी चित्रपटसृष्टीचा विचार केला, तर बॉलिवूडमधल्या ट्रेन्ड्सचा तिच्यावर परिणाम होत असतोच; मात्र तरीही आशय-विषय-मांडणीच्या बाबतीत ती स्वतंत्रपणे वाटचाल करताना सध्या तरी दिसत आहे. लाटा वगैरेंचा एक काळ होता. कधी विनोदी चित्रपटांची लाट येत असे, तर कधी कौटुंबिक चित्रपटांची. तमाशाप्रधान चित्रपट तर अजूनही येतच असतात. परंतु या लाटांपलीकडे जाऊन मराठी चित्रपट गेल्या काही वर्षांपासून वेगळे काही शोधतो आहे आणि त्याची पावतीही त्याला पुरस्कारांच्या रूपाने मिळत आहे. परंतु तरीही दोन परस्परविरोधी आव्हानांचा सामना मराठी चित्रपटाला करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी एका छोट्या शहरात एक मेसेज समाजमाध्यमांवर फिरत होता. एका मराठी चित्रपटाचा खेळ ठराविक किमान प्रेक्षकसंख्या असल्याखेरीज सुरू करण्यास थिएटरचालकाने नकार दिला होता आणि संबंधित मेसेजद्वारे तेवढी संख्या जमवण्याचा प्रयत्न सुरू होता. एकीकडे अशी अवस्था असताना दुसरीकडे सरकारी अनास्थेची झळसुद्धा मराठी चित्रपटाला बसते. पूर्वी राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट दूरदर्शन वाहिनीवरून दाखविले जात असत. त्या मोबदल्यात चांगली रक्कम निर्मात्यांना मिळत असे. आता हा परिपाठ बंद झाला आहे. अनेकजण चित्रपटाच्या निर्मितीसाठीच ओढाताण करून पैशांची जुळणी करतात. हल्ली प्रमोशनचे वाढलेले प्रस्थ पाहता अनेक निर्मात्यांना थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित करणे शक्य होत नाही. जाहिरातीसाठी प्रचंड खर्च करणे त्यांच्या आवाक्यातील नसते. त्यामुळे चांगला आशय-विषय आणि उत्कृष्ट मांडणी असलेला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटांच्या व्यावसायिक यशाचा यक्षप्रश्न समोर येतो. चित्रपटगृहांना थिएटर न मिळणे, प्रेक्षकवर्ग न मिळणे, सरकारी आधार न मिळणे या गोष्टींमुळे एक गोष्ट निर्मात्यांच्या मनात हळूहळू घर करत राहते, ती अशी की व्यावसायिक गणिते असतील असेच कथानक निवडावे. त्याचप्रमाणे नावाजलेले कलावंतच चित्रपटात असावेत. भरपूर मसाला असावा, तरच चित्रपटात पैसा गुंतवणे योग्य ठरेल. नवीन प्रयोग असलेल्या चित्रपटांवर पैसा लावायला निर्माते तयार होत नाहीत. त्या दृष्टीने सध्याचे मराठी चित्रपट, त्यांचे विषय आणि मांडणीचा विचार करता दर्जेदार कलाकृती संघर्षाच्या अवस्थेत आहेत, असे म्हणता येईल. उत्तमोत्तम देण्याचा निर्माते-दिग्दर्शकांचा प्रयत्न टिकून राहायला हवा आणि स्वतंत्र शैली विकसित करण्याची धडपडही कायम राहायला हवी. त्या दृष्टीने पुरस्कारांमुळे उत्तेजन मिळते हे बरोबरच आहे; परंतु सरकार आणि प्रेक्षकांनीही उत्तमोत्तम प्रयत्नांची सातत्याने दखल घ्यायला हवी. सामान्यतः उदारीकरणाचा काळ सुरू झाल्यानंतर व्यावसायिक आणि प्रायोगिक हे भेद हळूहळू गळून पडले. चांगला प्रायोगिक विषय व्यावसायिक यशाच्या दृष्टीने विचार करून हाताळणे किंवा सरधोपट व्यावसायिक चित्रपटांमध्ये प्रायोगिकता आणणे असे प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू झाले. त्यामुळे हा कलात्मक चित्रपट आणि तो व्यावसायिक चित्रपट असे भेदाभेद आता जवळजवळ संपुष्टात आले आहेत. मात्र तरीही या भेदांच्या पलीकडे जाऊन यशाची व्याख्या करायला हवी. एखाद्या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळाले नाही म्हणून तो टाकाऊ ठरत नाही. कधीकधी तोच सर्वोत्कृष्ट ठरतो. परंतु अवास्तव जाहिरातबाजी करणे निर्मात्याला शक्य नसल्याने तो चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाही. असे मात्र होता कामा नये. आता ओटीटी प्लॅटफॉर्मसह अनेक मंच निर्मात्यांना उपलब्ध आहेत आणि त्यांचाही खुबीने वापर करून घेतला जात आहे. चित्रपटांमधील सर्वच प्रकारचे भेद हळूहळू समाप्त होऊन केवळ चांगला आणि वाईट असे दोनच प्रकार अस्तित्वात येतील; किंबहुना तसे व्हायला हवे. त्यासाठी अन्य वस्तूंची बाजारपेठ आणि चित्रपटांची बाजारपेठ यातील फरक जाणून घेतला पाहिजे आणि चांगले प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचतील, अशा दृष्टीने सर्वच संबंधित घटकांनी प्रयत्न केले पाहिजेत. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये परीक्षकांची पसंती ठरलेले किशोर कदम आणि सिद्धार्थ मेनन हे अभिनेते हे मराठी चित्रपटसृष्टीचे बलस्थान मानायला हवे. चांगले प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचणे आणि लोकांनी मराठीची अस्मिता केवळ शब्दांमधून न सांगता कृतीतून सांगणे, हाच मराठी चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होण्याचा मार्ग आहे. तसे झाल्यास दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणेच मराठीला स्वतःची एक पाऊलवाट सापडेल आणि त्याचा पुढे हमरस्ता होईल.