घरातील प्राणी व लोकांचे जुगाड !

घरात कुठेही भिंतीवर मोठी पाल किंवा झुरळ दिसले तर जास्त भीती वाटत नाही पण जेव्हा ते गायब होतात तेव्हा जास्त भीती वाटते की हे गेले कुठे? त्यांना शोधणे खूप कठीण असते. गुगलवर पालींना पळवून लावण्याचे खूप उपाय आहेत. जसे कांदा, लसूण किसून त्यात लिंबू मिसळावा व घरात स्प्रे करावे. असे केल्याने पाली यायच्या बंद होतात म्हणे. मी हा उपाय करून पाहिला. पाली तर तशाच आहेत, पण पाहुणे यायचे बंद झालेत. चला! काहीतरी उपयोग झाला.

Story: आदित्यच्या चष्म्यातून | आदित्य सिनाय � |
30th July 2022, 10:00 pm
घरातील प्राणी व लोकांचे जुगाड !

कुठल्याही गोष्टीचा तसा चांगला व वाईट उपयोग असतोच की! टीव्हीवर जाहिरातीत काही स्प्रे दाखवितात जे फवारल्याने म्हणे झुरळ किंवा डास मरतात. आमच्या घरी खोल्या व कोपरे इतके आहेत की स्प्रेची एक बाटली नव्हे, त्यांच्या कंपनीतील संपूर्ण टाकी लागणार. तरी झुरळ मरणार की नाही ते माहीत नाही. मध्यरात्री झुरळांची व उंदरांची स्वयंपाकघरामध्ये जणू पार्टीच चालू असते. म्हणून उंदिर इतके लवकर मोठे होतात. माणसांमध्ये खाल्लेले अंगाला लागत नाही वगैरे म्हणतात पण उंदरामध्ये असा प्रकार नाही वाटतो. सर्वच उंदिर धष्टपुष्ट असतात. झुरळ पावसाळ्यातच उडतो असे म्हणतात पण काय ठाऊक रोज त्याला चांगले खायला मिळाले तर रोजच त्यांच्या पंखांना शक्ती मिळून तो उडायला लागणार. काही उंदिर मारण्याचे केक जाहिरात करतात की आमचा केक खाल्ल्याने उंदिर घराबाहेर जाऊन मरतील. आमच्या घरी मी दोन अनुभव घेतले आहेत. एक तर केक खाऊन नंतर उंदिर मस्त पाणी पितात किंवा आणखी काही तरी खातात. माहीत नाही अशाने मग विषाचा त्यांच्यावर काहीच परिणाम कसा होत नाही तो. दोन नेगेटिव्हने एक पॉजिटिव्ह होते अशातला प्रकार वाटतो हा. दुसरे म्हणजे आमचे घर एवढे मोठे आहे की केक खाल्ल्यांतर उंदीर बाहेर पोहोचतच नाही. कुठे तरी या भिंतीला, त्या दाराला, कुठे कपाटाच्या खुराला तर कुठे खांब्याला आदळतो व तो घरातच आपला शेवटचा श्वास घेतो. बरं कुठे खाली जमिनीवर मेला तर सापडतो. पण आलमारीत किंवा कुठे फॉल्स सीलिंगमध्ये अडकला तर त्याला काढण्यात त्रास घेण्यापेक्षा खोलीत आठ दिवस एयर फ्रॅशनर लाऊन दिवस काढलेले बरे.

जुन्या घरात कुठेही काही उघडे ठेवलेले चालत नाही. एकतर उंदिर इतके हुशार असतात की ते झाकण काढून व्यवस्थित पोटभरून खातात. उंदिर मारण्यासाठी आता आणखी एक उपाय म्हणजे ग्लू पॅड. पण गावातील उंदिर फार हुशार असतात. ते ग्लू पॅड उलटे टाकून जातात. एक दिवस तर ग्लू पॅडला फक्त उंदराचे केस लागलेले व पायाचे ठसे. म्हणजे मला वाटते एक उंदिर जर त्यावर चिटकला तर दुसरा उंदिर येऊन त्याला सोडवतो. तसे टीमवर्क चांगले असते प्राण्यांमध्ये. म्हणजे बघा ना एकीकडे गोड पदार्थ ठेवला तर लगेच मुंग्यांची सेना येते. आमच्याकडे 4G-5G असून इतक्या लवकर होत नाही पण मुंग्यांची कम्युनिकेश स्किल एकदम जलद आहे. मला वाटते उंदिर टीव्हीवर जाहिरात वगैरे बघून आता हुशार झालेयत. म्हणजे एकजण बघतो की हा केक खाल्ल्याने आम्ही मरणार म्हणून हा केक खायचा नाही असा संदेश जणू ते आपल्या सहकाऱ्यांना देतात. उंदिर मारण्याचा पारंपरिक उपाय म्हणजे दांडा किंवा झाडू! पण त्याच्या मागे धावणार कोण? आताची युवा पिढी हळूवार जॉगिंग करते. उंदराच्या गतीने धावायला त्यांना कुठे जमणार! दुसरे म्हणजे उंदरांना आधीच समजते की आम्हाला मारणार म्हणून ते पण अशा ठिकाणी लपतात की तासनतास तुम्ही शोधा, ते सापडणार नाहीत. रात्री दिसला तर त्याला शोधता-शोधता सकाळ होते. अशावेळी हळू लाईट बंद करून बसल्यास उंदिर मिळू शकतो. काळोखात मग ते बाहेर येतात. पण परत अशा प्रकारे नाचवतात की चुकून कधी हाताला लागतात. घरात मांजर असेल तर मग झालेच समजा कल्याण. सकाळी घरातील दृश्य पाहून असे वाटणार की जणू चोर चोरी करून गेलाय! उंदिर हे गणपतीचे वाहन. चतुर्थीत त्याला महत्त्वपूर्ण स्थान व सम्मान असतो. बाकी दिवसात टॉम अँड जॅरी चालूच असते.

आणखी एक कठीण काम म्हणजे डास मारणे. डासांपासून स्वतःची रक्षा करणे खूप कठीण असते. रक्तदान करके देखो, अच्छा लगता है! ही फीलिंग सगळे लोक रोज घेतात. मला डासांचे एक समजत नाही. तुम्हाला आमचे रक्तच पाहिजे  ना? आम्ही रक्तदान करायला तयार आहोत पण ते चावल्यानंतर तुमचे ते काही द्रव आमच्या अंगात कशाला सोडतात! त्याच्यामुळे जास्त त्रास होतो. चुपचाप रक्त पिऊन जायचं बरं का! असे केल्यास आम्ही पण तुम्हाला मारणार नाहीत. डास मारण्यासाठी कितीही उपाय केल्यास व्यर्थ असतात. स्प्रे फवारल्याने डास मरतात म्हणे. गावातील डास स्प्रेमुळे काही काळ बेशुद्ध होतात. नंतर काही वेळाने परत उडायला लागतात. ते आता स्प्रेला इम्युन झाले आहेत. ऑडोमॉसने डास नाही चावत असे म्हणतात पण तो सुद्धा उपाय व्यर्थ आहे. कारण चावायचे चावतातच किंवा डास ऑडोमॉस न लावलेला जागा शोधतात. तुम्हाला काय वाटले फक्त माणसे हुशार आहेत? जेव्हा प्रश्न जगण्या-मरण्याचा येतो तेव्हा प्रत्येक जीव स्वतःला वाचवायची धडपड करतोच! बॅटने डास अचूक मरतात. म्हणजे वाचण्याचा चान्स राहत नाही. पण तरी सुद्धा कधी छोटे डास बॅटच्या आरपार जातात! बॅट घेऊन कोण हलवत राहणार? कॉयलने डास तर जात नाहीत पण धुराने खोकला सुरू होतो. कधी-कधी तर डास कॉयलवर सुद्धा बसतात. इलॅक्ट्रिक यंत्राच्या वासाने तर कधी डोके दुखायला लागते तर कधी डोळे लाल होतात. म्हणून सर्वात छान उपाय म्हणजे मच्छर दाणी! ती खाटच्या किंवा जमिनीवर टाकावी  त्यात झोपावे. पण तरी सुद्धा गम्मत अशी होते की मच्छरदाणीत आत जाताना हळूच डास आत प्रवेश करतात किंवा तुमच्यावर बसूनच बरोबर आत येतात. तरी मग जागा कमी असल्यामुळे तुम्ही डास मारू शकतात. झोपेत जर तुम्ही मच्छरदाणीला टेकून झोपलेयत तर बाहेरून डास व्यवस्थित आपला डंक टोचून जातात. म्हणजे कुठल्याही उपायाने संपूर्ण बचाव होणारच असा नाही!

एक अजब आहे बुवा लोकांचे! लोक आपल्या पाळीव प्राण्याची काळजी स्वतःहून जास्त घेतात. काही घरात तर कुत्र्याला जास्त मान-सन्मान असतो पण ज्येष्ठ मंडळींना नसतो. असे लोक स्वतःला प्राणीप्रेमी म्हणतात. पण प्राणीप्रेमी मांसाहार कसा करतात हेच समझत नाही. त्यांच्या कुत्र्यावर दगड मारला तर तुमच्या अंगावर धावून येणारे लोक कोंबडीवर सुरा चालवून मस्त खातात! म्हणजे प्राणी प्रेम हे ठरावीक प्राण्यांपुरतेच आहे वाटते. असो, आपल्या-आपल्या आवडी-निवडी! सर्वांशी मैत्री करा म्हणजे कुणालाच मारावेसे वाटणार नाही.