खरी मैत्री...

'मैत्री' हा शब्द जरी छोटासा असला तरी हा शब्द खूप काही सांगून जातो. या छोट्याशा शब्दांत खूप काही भावना असतात.

Story: ललित | वर्षा बर्डे |
24th June 2022, 10:06 pm
खरी मैत्री...

आपल्याला आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर माणसं भेटतात. आपण कधी कुणाशी संवाद साधतो मग त्या संवादाचे मैत्रीत रुपांतर होतं. पण काही मित्र कामापुरतेच असतात, पण काही मित्र जन्मभर लाभलेल्या साथीचं  वरदान असतात आणि हेच जन्मभराचे वरदान म्हणजे 'खरी मैत्री'. खरी मैत्री आयुष्यातील चांगल्या गोष्टी वाढवते, आनंदात आणखी भर घालते आणि आयुष्यातील दुःख कमी करण्याचा प्रयत्न करते.

इंग्रजीत एक म्हण आहे "अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इनडीड". गरजेच्या किंवा संकटाच्या वेळी जो आपला हात देतो तोच खरा मित्र असतो. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सर्वांबरोबर पाउलं उचलत बरोबरीने चालण्यासाठी, खांद्यावर हात ठेवून बोलण्यासाठी, आपल्या सुख दु:खात सहभागी होण्यासाठी, मनातल्या गोष्टी सांगून मन हलकं करण्यासाठी एका विश्वासनीय माणसाची गरज आणि सोबत हवी असते, आणि तो विश्वसनीय माणूस आपला खरा मित्र असतो. मैत्री हे एक सुंदर, अतूट धाग्याने बांधले गेलेले नातं आहे. ज्याला 'मैत्री' या शब्दाचा अर्थ कळला त्याने जग जिंकलेच म्हणून समजा. 

खऱ्या मैत्रीत कधी गैरसमज होत नाहीत. मैत्रीचं नातं निस्वार्थीपणाने जपलं पाहिजे म्हणून फक्त स्वत:चाच विचार न करता दुसऱ्यांचाही विचार करायला पाहिजे. स्वतः ला दुसर्‍यांच्या जागेवर ठेवून बघा आपोआप त्या व्यक्तीचं दुःख आणि भावना समजतील. मग गैरसमज व्हायला काही कारण पण  सापडणार नाही. ज्या मित्राला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यावे लागतात तो आपला मित्र कधीच होऊ शकत नाही. जसं वस्तूला दोन बाजू असतात तसंच मैत्रीमध्येही दोघांच्या दोन बाजू असतात. प्रत्येकाचं मत आणि प्रत्येकाला मन असतं. या गोष्टीचा  विचार करून या संसारात जो वावरतो तोच खरा मित्र असतो. खऱ्या मैत्रीत एकमेकांबद्दल सहानुभूती, प्रेम, काळजी, भावना आणि आपुलकी असते.    

या जगात सगळ्यात कठीण कार्य म्हणजे 'माणसांना कसं ओळखावं?'... मैत्री आहे तर जीवनात आनंद आहे, मैत्री आहे तर सोबतीचा अनुभव आहे. पण जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा कधी- कधी डोकं बधीर होऊन जातं आणि अशा वेळेला काय करावं ते सुचत नाही.अशा प्रसंगी जो मित्र आपला पाय मागे घेतो तो कधीच खरा मित्र होऊ शकत नाही पण जो मित्र मदतीचा हात पुढे करतो तोच आपला खरा मित्र असतो.

आपण वाईट परिस्थितीतून जात असताना चांगले मित्र आधाराचा हात देतात व मायेच्या शब्दांनी बोलतात पण स्वार्थी मित्र कायम भडकवतच  राहतील. आपल सिक्रेट सिक्रेटच ठेवणारा मित्र खरा असतो, तर "मी कुणाला काहीच सांगणार नाही" असं म्हणणारा मित्र जर गावभर दवंडी पेटवत गेला तर तो मित्र हा मित्र नसतो. आपलं  दु: ख पाहून जर समोरचा दुःखी  होतो, आपल्या डोळ्यातले अश्रू पाहून समोरच्यच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली तर समजा तीच मैत्री खरी आहे, कारण स्वार्थी वृत्तीने केलेली मैत्री दुःखात ना साथ, ना हात कधीच देत नाही. स्वार्थी वृत्तीने केलेली मैत्री आपल्यासोबत फक्त आनंद साजरा करते काही जण  भांडणं करायला फक्त  कारणं  शोधत असतात. ज्यांना खरे मित्र लाभले त्यांचे आयुष्य किती चांगलं असेल...? पण ज्यांनी मैत्रीसारख्या प्रेमळ नात्यात विश्वासघाताचा धडा अनुभवला ते मात्र पुन्हा कुणाशी मैत्री करताना असंख्य विचार करतील. काही जणांना धोका पचत नाही. अशी माणसं मैत्रीचा हात पुढे करायला डगमगतात. खऱ्या मैत्रीत कदर आणि आदर या दोन्ही शब्दांना स्थान दिलं जातं.   प्रत्येकालाच मित्र म्हणून वागणूक देणे ही आपल्या हातून घडलेली मोठी चूक ठरू शकते कारण मैत्री कधीच एकतर्फी नसते. मैत्रीसारख्या नि:स्वार्थी नात्यात जर विश्वासघाताचा  पाठ अनुभवला तर मनावर परिणाम हे होतातच. विश्वासू माणूस जेव्हा वाईट वागतो तेव्हा प्रचंड त्रास होतो. मैत्रीच्या धाग्यात  'अहंकार' या शब्दाची गाठ कधीच बांधू नये. या शब्दाला कधीच स्थान देऊ नये. प्रेम आणि विश्वासाने केलेली मैत्री ही अतूट असते आणि एकनिष्ठ असते. विश्वासघात झाल्यावर स्वत::ला कधीच कमी लेखू नका, स्वतःला सावरा कारण अनुभव जरी वाईट असले तरी त्या  वाईट अनुभवातून शिकलेले धडे हे नेहमी चांगलेच असतात, म्हणून स्वत::ला त्रास करून घेण्यापेक्षा सकारात्मक विचाराने स्वतःला सावरा, सकारात्मक धडा शिकून पुढील वाटचालीसाठी प्रारंभ करा.