त्याचं काम... तिचं काम...

Story: मर्मबंधातली ठेव | कविता प्रणीत आमोणकर |
24th June 2022, 10:03 pm
त्याचं काम... तिचं काम...

पूर्वी स्त्री आणि पुरुष यांची कार्यक्षेत्रे निश्‍चित होती. कुणीही एकमेकांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करीत नसे. घराचे व्यवस्थापन तिच्या हाती आणि त्यासाठी लागणारे अर्थार्जन करण्याची, कुटुंबाला संरक्षण देण्याची जबाबदारी घरातील कर्त्या पुरुषावर होती. त्यावेळेस घराबाहेरचे ताणतणाव त्याच्यावर पडत असल्याने घरी आल्यावर त्याला स्वस्थपणा मिळावा, म्हणून त्याला घरकामापासून मुक्तता होती. पुढे जाऊन घरचा कर्ता पुरुष होणार असल्याने लहान मुलावरही त्याचप्रमाणे संस्कार केले जात असत. त्यावेळेस ते योग्यही होते. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. शिक्षण घेऊन शिक्षित झालेली स्त्री आज पुरुषाच्या बरोबरीने अर्थार्जनासाठी बाहेर पडत आहेत. दोघांची कार्यक्षेत्रे घराबाहेर असल्याने जास्त वेळ घराबाहेर जातो. घरातील स्त्री आणि पुरुष दोघेही अर्थार्जन करीत आहे. अशा परिस्थितीत पुरुषांनी कालबाह्य झालेले संस्कार आणि मानसिकता बदलायला हवी.

पूर्वीची स्त्री ही फक्त चूल व मूल यातच गुरफटून गेली होती. घराचा उंबरठा ओलांडून जायची तिला मुभा नव्हती. परंतु आज परिस्थिती बदललीय. आज सुलभ स्त्रीशिक्षणामुळे स्त्रियांपुढे आपली कर्तबगारी दाखवण्यासाठी मोकळे आकाश आहे. स्त्रियांमधील असलेल्या चिवट जिद्दीमुळे प्रत्येक स्त्री कोणतेही काम आत्मीयतेने करण्यास तयार असते. मुली व स्त्रियांनी आज प्रत्येक क्षेत्र काबीज केले आहे व त्या पुरुषांच्याच बरोबरीने काम करताना दिसतात. फक्त पुरुषांची मक्तेदारी म्हणून गणल्या गेलेल्या  क्षेत्रातही त्या कुठेही कमी पडत नाहीत. मग, अशा परिस्थितीत पुरुषांनी स्त्रियांची मक्तेदारी म्हणून गणल्या गेलेल्या क्षेत्रात स्त्रीच्या बरोबरीने काम केले पाहिजे. त्यासाठी प्रथम आल्या मानसिकतेमध्ये बदल करायला हवा. शहरांमध्ये अनेक घरांमधून असे बदल दिसतही आहेत.

शहरामधून जरी हे बदल अपरिहार्यता म्हणून दिसत असले तरी, त्याला सार्वत्रिक बदल असे म्हणता येणार नाही. आज जरी स्त्रिया आर्थिक सक्षम होण्यासाठी घराबाहेर पडल्या तरी घरकाम, मुलांचे संगोपन या गोष्टी त्यांना काही सोडत नाहीत. अशा वेळी दुहेरी भूमिका त्यांना निभावावी लागते. घरातील कामे पटापट आवरून जेवण बनवून सकाळी ऑफिससाठी बाहेर पडताना कित्येक जणी आपला नाश्ता करायलाच विसरून जातात. संध्याकाळी घरी आल्यावर परत त्यांना पदर खोचून काम करणे भाग असते.  आपण कामाहून संध्याकाळी घरी आल्यावर बायकोने गरमागरम चहाचा कप हातात आणून द्यावा, अशी अपेक्षा नवऱ्याला असते. पण तो हा विचार करत नाही, की आपली बायकोही दिवसभर ऑफिसमध्ये काम करून आलेली आहे व तिलाही ताणतणावामुळे थकवा येतो. आरामाची व अशीच हातात कोणीतरी चहा आणून द्यायची तिचीही अपेक्षा आहे. कामावरून घरी आल्यावर स्त्रियांना परत संध्याकाळच्या जेवणासाठी किचनमध्ये उभे राहावे लागते. त्यानंतर सर्व आवराआवरही आलीच. अशा वेळी पुरुषाने जर आपल्या बायकोला स्वयंपाकघरात थोडीफार मदत केली, तर ते वावगे ठरणार नाही. भांडी घासणे, सामान व्यवस्थित ठेवणे, झालेले जेवण वाढून घेणे इत्यादी बारीकसारीक कामे करायला त्याला लाज वाटू नये. 

ज्या स्त्रिया नोकरी, व्यवसाय करतात, त्यांना घरची जबाबदारी सुटत नाही. त्याचबरोबर काही प्रमाणात येणारे आर्थिक स्वातंत्र्य आणि मान त्यांना मिळतो. पण, काहीही कमावत नसलेल्या गृहिणीचे काम हे ‘थँकलेस जॉब’सारखे असते. सगळ्यांचं सगळं व्यवस्थित करूनही पदरात उणीदुणी, हेटाळणी येते. सकाळी उठून सर्वांसाठी नाश्ता करून तो त्यांच्या समोर ठेवणे, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, घराची साफसफाई, कपडे,भांडी, घरी आलेल्या गेलेल्यांचे स्वागत करणे यात ती अगदी भरडली जात असते. घरासाठी एखाद्या मोलकरणीसारखे दिवसरात्र राब राब राबणे हेच तिच्या नशिबात येते. अशा स्त्रीचे घरातल्या माणसांसमोर काहीही मूल्य नसते. कामवाली बाई ठेवली, तर तिला पगार द्यावा लागतो. पण घरातली स्त्री ही हक्काची कामवालीबाई, ती सुद्धा पगाराशिवाय... कामवालीबाई सोडून जाऊ नये म्हणून तिची बडदास्त ठेवली जाते. तिचे मन सांभाळले जाते. कामवाल्याबाईला निदान किंमत तरी असते, गृहिणीला किंमतही नसते आणि मूल्यही नसते.

तिच्या श्रमांना प्रतिष्ठा नसण्याचे मूळ ‘त्याचे काम, तिचे काम’ या कालबाह्य श्रमविभागणीच्या मानसिकतेत आहे. आपला समाज आजही त्या मानसिकतेतून बाहेर आलेला नाही. त्याच मानसिकतेतून भरडली जात असलेली स्त्री, तिच्या मुलाला खेळण्यासाठी, मनोरंजनासाठी मुभा देत असते आणि मुलीला घरकामाला जुंपत असते. ‘तू मुलगी आहेस. तुला स्वयंपाक करता आला पाहिजे. तुला घरकाम करता आले पाहिजे.’, असे मुलीला सांगणारी आई, मुलाला मात्र कधीच केर काढायला लावत नाही, भांडी घासायला, घासलेली भांडी जाग्यावर ठेवायला सांगत नाही. जाग्यावर आणून दिलेल्या चहाची कपबशीही, तो चहा प्यायल्यानंतर तशीच ठेवायला लावते, स्वत: ती उचलते किंवा मुलीला उचलायला सांगते. मोठा झाल्यावर त्याच मुलाने बसल्या जागी चहाची अपेक्षा कामावरून आलेल्या बायकोकडून केली आणि चहाची कपबशीही जागेवर तशीच ठेवली, तर हा सर्वथा त्याचा दोष म्हणता येणार नाही. श्रमांची विभागणी त्याला शिकवलीच नाही आणि त्यामुळे श्रमप्रतिष्ठाही तो शिकला नाही. तो हेच शिकला आहे की, ‘हे तिचे काम आहे, त्याचे काम नाही’.

‘अमुक एक काम दुय्यम आहे, ते तू करायचे नाही’, हे त्याच्या मनावर कुणी ठसवले? एका स्त्रीनेच ना? मुळात स्त्रीची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. जे ती स्वत: भोगते, ते पुन्हा भोगण्यासाठी स्वत:च्या मुलीला तयार करते, हा दोष तिचा नाही? 

‘आपल्या मुलाला काहीच घरकाम करता येत नाही’, हे अभिमानाने सांगणारी आई, ‘आपल्या मुलीला तिच्या सासरी नोकरी सांभाळूनही घरचं सगळं करावं लागतं’, अशी तक्रार करत असते. आपली आई करत असलेल्या कामाचा आदर, स्वत: तिला हातभार लावून मुलगा राखत असेल, तर त्याला बायकोच्या श्रमांचे मूल्य लक्षात येईल. अन्यथा नाही.  

कालानुरूप, परिस्थितीनुरूप आपण अनेक बदल स्वत:मध्ये करून घेत असतो. त्यामुळे ‘आपल्यावर तसे संस्कार झालेच नाहीत. तशी सवयच नाही.’, ही सबब पुरुषांनी देऊन चालणार नाही. जसा बदल स्त्रीने आपल्या मानसिकतेत करण्याची आवश्यकता आहे, तसाच बदल पुरुषांनीही आपल्या मानसिकतेत करणे आवश्यक आहे. स्वत:च्या वर्तनाची जबाबदारी संस्कारांवर आणि दुसऱ्या स्त्रीवर ढकलताना, तिने दिलेले इतर संस्कार आपण कितीसे पाळत आहोत याचा विचार करणेही गरजेचे आहे. स्वत:च्या मुलीला ‘सातच्या आत’ घरात यायला सांगणाऱ्या वडिलांनी, संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी रामरक्षा म्हणणे स्वत: कधी सोडून दिले याचाही विचार अवश्य करावा. कपबशीही न उचलण्याच्या स्वत:च्या सवयीची जबाबदारी, स्वत:च्या सोयीसाठी दुसऱ्या स्त्रीवर ढकलणे योग्य नाही. स्वत:ला नव्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत, स्वत:वर नवे संस्कार करून घेतले पाहिजेत. 

‘त्याचं काम, तिचं काम’, अशी विषम आणि असंस्कृत विभागणी करण्याऐवजी, ‘पडेल ते काम’ केले आणि ‘कुठलेही काम हलक्या दर्जाचे नसते’ ही मानसिकता ठेवली, तर अनेक घरांमधून उद्भवणाऱ्या समस्या बहुतांशी नष्ट होतील. श्रमांची योग्य विभागणी होईल आणि श्रमांना प्रतिष्ठाही लाभेल.