सरकारची मोहीम, ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग!

मुख्यमंत्र्यांची नागरिकांना सहभागाची हाक : १५ हजार शोषखड्डे, २०० बंधारे बांधणार

|
23rd June 2022, 11:46 Hrs
सरकारची मोहीम, ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग!

साखळी रवींद्र भवन या ठिकाणी आयोजित अभियानाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत जलसिंचन खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर,  जलसिंचन खात्याच्या प्रमुख अभियंता प्रमोद बदामी, नगरसेवक आनंद काणेकर, शुभदा सावईकर व इतर.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई :
पाण्याचा तक्ता कमी होत चालला आहे आणि बदल स्पष्ट दिसताहेत. बदलती जीवनशैली सिमेंट आणि कॉंक्रिटचा अतिवापर व जंगलतोड ही महत्त्वाची कारणे आहेत. विशिष्ट स्तोत्राखाली रिचार्ज करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत विशिष्ट उपायांचा अवलंब करणे गरजेचे बनले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग च्या माध्यमातून पाणी जमिनीतील पुनर्जीवित करणे, पाइपद्वारे पाणी जमिनीच्या पातळीच्या टाक्या किंवा खड्ड्यांमध्ये जमा करणे व त्यानंतर प्रक्रिया करून पाणी जमिनीत सोडणे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मदत होत आहे. गोवा सरकारच्या जलसंपदा खात्याच्या माध्यमातून समुद्रत वाहून जाणारे पाणी रोखून नवीन धरणे बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.
जलसिंचन खात्याच्या माध्यमातून जलशक्ति अभियानांतर्गत साखळी रवींद्र भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जलसिंचन खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये मयेचे आमदार प्रेमेन्द्र शेट जलसिंचन खात्याचे प्रमुख अभियंता प्रमोद बदामी साखळी नगरपालिकेचे नगरसेवक आनंद काणेकर शुभदा सावईकर व इतरांची खास उपस्थिती होती.
व्यवस्थित नियोजन होत नसल्यामुळे पाण्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. निसर्गाला पाण्याची गरज आहे. त्यासाठी एकत्रित प्रयत्न करूयात, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. संयुक्तरीत्या काम करून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून पाण्याची हार्वेस्टिंग प्रामुख्याने करण्यावर भर दिल्यास येणाऱ्या काळात पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
खाण खंदकामधील पाण्याचा वापर करणार
खनिज परिसरामधील खंदकामध्ये प्रचंड प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध आहे .या पाण्याचा वापर येणाऱ्या काळात कृषी लागवडीच्या विकासासाठी करण्यात येणार आहे. पाळी या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयत्न सफल झालेला आहे. यामुळे येणाऱ्या काळात या पाण्याचा वापर संबंधित भागातील कृषी बागायतीसाठी वापरण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
डिचोली मतदारसंघाचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी यावेळी बोलताना पाण्याचा गैरवापर होणार नाही याची विशेष काळजी प्रत्येकाने घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.

जलस्रोत खात्याचा पुढाकार : मंत्री शिरोडकर
* जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले की पाणी हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा घटक आहे. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात समुद्रामध्ये जाणार नाही याची विशेष काळजी प्रत्येकाने घ्यावी.
* त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांमध्ये पाणी संवर्धनाची भावना निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये दोन शाळांचे नियुक्ती करण्यात येणार आहे.
* पाणी संवर्धनाच्या बाबतीत त्यांनी केलेले कार्य या संदर्भात या शाळांना 25 हजार रुपयांचे पहिले तर १५ हजार रुपयांच्या दुसरे पारितोषिक देण्याची घोषणा यावेळी मंत्र्यांनी केली.
* त्याचप्रमाणे जुलै १५ पर्यंत गोव्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाच्या पाण्याचे खंदक खोदण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जलशक्ती अभियान अंतर्गत पावसाच्या पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी खड्डे आणि खंदक खोदण्याची जलसंपदा विभागाची योजना आहे.
* नद्यांमध्ये जाणारा कचरा फिल्टर करण्यासाठी फायबर गेट्स, सुसज्ज असलेल्या नाल्यावर सुमारे दोनशे बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.

पाणी वाटप संस्थांना खड्डे खोदण्यासाठी निधी
यावेळी पाणी वाटप संस्थेत प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मंजुरी दिली. या निधीच्या माध्यमातून पावसाळ्यातील खड्डे खोदण्याचे योजना अमलात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यामध्ये आजोबा पाणी वाटप संस्था केरी, केळबाई पाणी वाटप संस्था मोर्ले, माळसा पाणी वाटप संस्था केरी, बजरंग बली पाणी वाटप संस्था केरी घोडेश्वर पाणी वाटप संस्था रावण, निर्मला पाणी वाटप संस्था केरी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे उपस्थित असलेल्या मुलांनी बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

शाळांनी घालून दिला वस्तुपाठ
अशा उपक्रमांसाठी पेडणेतील पर्यावरणप्रेमी विक्रमादित्य पणशीकर हे सातत्याने कृतीशील प्रयत्न करत असून, सरकारी प्राथमिक शाळा शिरगाव डिचोली व सरकारी माध्यमिक शाळा तोरसे पेडणे यांनी भूजल संवर्धन हा उपक्रम राबवून आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.