महाराष्ट्र सत्तांतराच्या उंबरठ्यावर

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही आणखी चार आमदार गुवाहटीत : गुजरात पोलिसांकडून मारहाणीचा आमदार देशमुखांचा आरोप


23rd June 2022, 12:36 am
महाराष्ट्र सत्तांतराच्या उंबरठ्यावर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना परत येण्याचे आवाहन केल्यानंतरही शिवसेनेचे आणखी चार आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहेत. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांसोबत गुवाहटीच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत.       

गुवाहटीला गेलेल्या आमदारांमध्ये गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील, योगेश कदम, मंजुळा गावित यांचा समावेश आहे. हे चारही आमदार हॉटेलमध्ये पोहोचताच त्यांचे इतर आमदारांनी स्वागत केले. या घडामोडीमुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढत आहे, तसे सरकार अस्थिर होत चालले आहे. एकनाथ शिंदे यांनी आधीच आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा केला आहे. आणखी किती आमदार शिंदे गटात सामील होतात, याबाबत उत्सुकता आहे. 

बंडखोरांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावे, मी मुख्यमंत्रिपदी नको त्याक्षणी मी राजीनामा द्यायला तयार आहे. मी राजीनाम्याचे पत्र तयार ठेवले आहे. मला कोणताही मोह नाही. भाजपसोबत जाण्याचा विचार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले असते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर ठीक आहे. पण मला दु:ख झाले की, माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको आहे. 

— उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे.

— एकनाथ शिंदे, बंडखोर आमदार, शिवसेना    

मुख्यमंत्री राजीनामा देणार नाहीत : संजय राऊत      

शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, असा कोणताही सल्ला दिलेला नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत आणि राहतील. अविश्वास ठराव मांडल्यास आम्ही बहुमतही सिद्ध करू, असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. ही लढाई शेवटपर्यंत लढायची अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री राजीनामा देणार नाहीत, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.      

नितीन देशमुख यांची सूरतहून सुटका

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमधील सूरतला गेलेले आमदार नितीन देशमुख तेथून आपली सुटका करून घेऊन बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या गटात सामील होण्यासाठी महाराष्ट्रात परतले. नागपूर विमानतळावर आगमन झाल्यावर पत्रकारांशी बोलताना नितीन देशमुख यांनी घडलेला घटनाक्रम सांगून गुजरात पोलिसांवर आरोपही केले. ते म्हणाले, माझी तब्येत पूर्णपणे चांगली आहे. गुजरातच्या शंभर ते दीडशे पोलिसांचा माझ्यावर पहारा होता. पोलिसांनी मला बळजबरीने रुग्णालयात नेले, तेथे मला बळजबरी इंजेक्शन देण्यात आले. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर २०-२५ लोकांनी पकडून बळजबरी माझ्या दंडात इंजेक्शन टोचले. माझ्या शरीरावर माझ्या अनिच्छेने उपचार करण्यात आले. ते इंजेक्शन कशाचे होते याची मला माहिती नाही. परंतु, मला जे ‘हार्ट अटॅक’ आल्याचे बोलले जात आहे, ते धादांत खोटे आहे. हार्ट अटॅक सांगण्यामागे त्यांचा हेतू चुकीचा होता. 

आमचे मंत्री होते म्हणून मी सोबत गेलो होतो, पण रात्री आम्हाला ठेवलेल्या हॉटेलमधून निघून मी सूरत शहराच्या रस्त्यावर आलो. त्यानंतर शंभर ते दीडशे पोलीस माझ्या मागावर होते. त्यांनी मला पकडून हॉस्पिटलमध्ये नेले आणि अटॅक आल्याचा बनाव रचला. या लोकांना माझा घात करायचा होता, असा आरोपही आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. 

आमदार नितीन देशमुख मुंबईला परत जाण्यावरून सूरत येथील हॉटेलमध्ये गोंधळ घालत होते, त्यावेळी त्यांना गुजरात पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केली, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.

पत्रावर असलेली सही माझी नाही : आमदार नितीन देशमुख 

नाव एकनाथ शिंदेंचे, पण शिवसेनेचे आमदार पळवापळवीचे षड् यंत्र भाजपचे आहे. गुजरातमध्ये आम्हाला जेथे ठेवले होते, त्या हॉटेलमध्ये दशहतीचे वातावरण होते. मला तिथे जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. एकनाथ शिंदे यांच्या पत्रावर माझ्या नावासह असलेली सही माझी नाही. मी इंग्रजीत सही करतो मराठीत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 


हेही वाचा