अग्रलेख । वादळी मध्यांतर

शिवसेनेने लगेच शिंदे यांना गटनेतेपदावरून हाकलले असले तरी इथे हे राजकीय वादळ शमलेले नाही. उलट या वादळाची तीव्रता आणखी वाढली आहे. महाराष्ट्रात सरकार विरोधात आमदारांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला तर तो सफल होणार नाही याची कल्पना आल्यानंतरच, शिंदे यांनी गुजरात गाठले.

Story: अग्रलेख । |
22nd June 2022, 12:54 am
अग्रलेख । वादळी मध्यांतर

महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडू शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे. लवकरच चित्र स्पष्ट होईल. अनेक कारणांमुळे नाराज असलेले शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे शेवटी शिवसेनेपासून फारकत घेण्याच्या तयारीत आहेत. हे सगळे अचानक झालेले नाही. गेल्या अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री ठाकरे आणि शिंदे यांच्यातील दरी वाढत गेली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला बसलेला दणका हे आघाडीतील काही पक्षांमध्ये सगळे व्यवस्थित चाललेले नाही असेच दाखवत होता. या निवडणुकीने शिवसेनेतील वितुष्ट आणखी वाढले. शिवसेनेत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान असलेले नेते एकनाथ शिंदे आता बंडखोरी करत असल्यामुळे 'गद्दार नको' म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आपलेच नेते शेवटी गद्दार निघाले असे म्हणायची पाळी आली आहे. शिंदे सुमारे २१ आमदारांना घेऊन 'नॉट रिचेबल' झाल्यानंतर शिवसेनेने त्यांची गटनेतेपदावरून हाकालपट्टी केली. दुसऱ्या बाजूने शिंदे यांनी ट्वीट करत आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत त्यामुळे सत्तेसाठी प्रतारणा करणार नाही असे म्हटले आहे. ट्वीटमधून बाळासाहेबांनी आम्हाला 'हिंदुत्वाची शिकवण' दिली असा उल्लेख असल्यामुळे शिंदे काय भूमिका घेतात त्याकडे सर्वांचे लक्ष आहे. अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले शिंदे आता पक्ष सोडण्यासाठी निमित्त शोधत आहेत. भाजपनेही त्यांचे ब्रेनवॉशिंग केलेले असावे अन्यथा एवढा मोठा निर्णय ते घेण्याची शक्यताच नव्हती. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिंदे यांची असलेली जवळीक हेही त्यांच्या बंडाचे एक कारण आहे. एकनाथ शिंदेंनी भाजपच्या पाठिंब्यामुळेच शिवसेनेला वेठीस धरले आहे. कुठल्याही स्थितीत महाराष्ट्रात भाजपला सत्तेत यायचे आहे. अडीच वर्षे वाट पाहूनही शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षात सत्ता सोडण्याइतके मतभेद निर्माण न झाल्यामुळे भाजपा अस्वस्थ होती. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची सत्ता आली तर त्याचा फायदाच भाजपला होणार आहे. त्यासाठी राज्यसभा असो किंवा विधान परिषद दोन्ही निवडणुकींत भाजपने आपली खेळी दाखवली आहे. आता एकनाथ शिंदे यांची ढाल त्यांनी पुढे केली आहे. शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन करावी अन्यथा पुढचा विचार केला जाईल असे एकनाथ शिंदे गटाचे म्हणणे असल्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर धर्मसंकट आहे. एकनाथ शिंदे मोदींच्या गुजरातमध्ये सुरतमधील एका हॉटेलात थांबले आहेत. शिवसेनेने लगेच शिंदे यांना गटनेतेपदावरून हाकलले असले तरी इथे हे राजकीय वादळ शमलेले नाही. उलट या वादळाची तीव्रता आणखी वाढली आहे. महाराष्ट्रात सरकार विरोधात आमदारांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला तर तो सफल होणार नाही याची कल्पना आल्यानंतरच, शिंदे यांनी गुजरात गाठले. तेथून आसामला जाण्याची तयारी झाली. तिथे आमदारांच्या संपर्कात कोणी येणार नाही याचीही व्यवस्था केली आहे. या सगळ्या घडामोडींमुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस अडचणीत आले आहेत. शिंदेंची खेळी यशस्वी झाली तर या दोन्ही पक्षांना सत्तेबाहेर रहावे लागेल. भाजप - शिवसेना पुन्हा एकत्र येतील अशी भीती या दोन पक्षांना आहे, पण शिंदे अशा ठिकाणी जाऊन थांबलेत की तिथे कोणी जाऊन त्यांची समजूतही काढू शकत नाही. एकूणच महाराष्ट्रातील राजकारणातील अडीच वर्षांच्या सत्तेच्या मध्यांतरानंतर आलेले हे वादळ कुठे नेते ते पहावे लागेल.
महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती, पण शेवटी सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले. शिवसेनेने आपल्या विचारसरणीच्या विरूद्ध जाऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत चूल थाटली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होण्याचा हट्ट धरला नसता तर आज भाजप - शिवसेना एकत्र असती. मुख्यमंत्रिपद आपल्याजवळ रहावे या मतावर शिवसेना ठाम राहिली. दोन्ही पक्षांची ताटातूट झाली. अर्थात शरद पवार यांची भूमिकाही या सगळ्या प्रकरणात महत्त्वाची होतीच. शिवसेनेत मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे इच्छूक होते, पण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरल्यामुळे शिंदे तेव्हापासूनच दुखावले होते. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यानंतर सर्वात वजनदार नेता म्हणून एकनाथ शिंदेंचाच उल्लेख होतो. असे असतानाही वारंवार त्यांना डावलले गेले. त्यांना दुखावण्याची एकही संधी शिवसेनेने सोडली नाही. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी देखरेख करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना नियुक्त केले होते. त्या घटनेमुळे शिंदे आणखीच दुखावले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीवरून उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यातील मतभेद आणखी उफाळून आले. तिथूनच या राजकीय नाट्याची नांदी झाली. हे सगळे कुठे येऊन थांबते ते पहावे लागेल.