राष्ट्रपतीपद : एनडीएकडून द्रौपदी मुर्मू, यूपीएकडून यशवंत सिन्हा उमेदवार


23rd June 2022, 02:21 am
राष्ट्रपतीपद : एनडीएकडून द्रौपदी मुर्मू, यूपीएकडून यशवंत सिन्हा उमेदवार

नवी दिल्ली : देशाच्या नव्या राष्ट्रापतींची निवडणूक १८ जुलै रोजी होणार आहे, मात्र सर्वांच्या नजरा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांवर आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्षाकडून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्यात आले आहे, तर सत्ताधारी पक्षाकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

सिन्हा २७ जून रोजी सकाळी ११.३० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील. मंगळवारी विरोधी पक्षांच्या बैठकीत टीएमसीने यशवंत सिन्हा यांचे नाव पुढे केले, ज्याला १९ विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला. 

यशवंत सिन्हा पाटणा विद्यापीठात होते शिक्षक

यशवंत सिन्हा यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९३७ रोजी पाटणा येथील कायस्थ कुटुंबात झाला. त्यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर १९६० पर्यंत पाटणा विद्यापीठात शिक्षक म्हणून काम केले.

राजकारणात टाकले पाऊल

तब्बल अडीच दशके भारतीय प्रशासकीय सेवेत राहिल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला. १९८६ मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला. त्यांना पक्षाचे सरचिटणीसपद देण्यात आले. १९८८ मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेले.

१९८९ मध्ये त्यांच्या पक्षाची जनता दलाशी युती झाल्यानंतर त्यांना पक्षाचे सरचिटणीस बनवण्यात आले. १९९०-९१ मध्ये चंद्रशेखर सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्रीपदही भूषवले होते. त्यानंतर १९९८ ते २००२ पर्यंत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. २००२ मध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे पदही भूषवले होते. 

भाजपने एनडीएच्यावतीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर विचारमंथन करण्यासाठी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पक्ष मुख्यालयात झाली. आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू या सहा वर्षे एक महिना झारखंडच्या राज्यपाल होत्या. मुर्मू या मूळचा रायरंगपूर, ओडिशाचा आहे. मुर्मू या ६४ वर्षांच्या आहेत.