आगशी येथे ८० हजाराच्या दहा स्टील पट्ट्यांची चोरी

रिक्षा चालकाला अटक; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

|
21st June 2022, 12:11 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी :
आगशी पंचायतीजवळ ठेवलेल्या ८० हजार रुपयांची १० स्टील पट्टी चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी धिरू नाईक चव्हाण (४५, मूळ कर्नाटक) या रिक्षा चालकाला अटक केली आहे. अटक केलेल्या संशयिताला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.
आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी दिलीप बिल्डरचे व्यवस्थापक प्रेमजाल शुक्ला यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, शनिवारी १८ रोजी रात्री ९.३० वा. आगशी पंचायती जवळ ठेवलेल्या ८० हजार रुपयांची १० स्टील पट्टी रिक्षामधून चोरी केल्याचे म्हटले आहे. याच दरम्यान सुरक्षा रक्षकाने त्याचा पाठलाग केला असता, संशयित रिक्षा घेऊन पसार झाला. याची दखल घेऊन आगशी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तुलशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत नाईक यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
याच दरम्यान रविवारी रात्री चोरीसाठी वापरण्यात आलेली रिक्षा पोलिसांना सापडली. त्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालक धिरू नाईक चव्हाण याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने चोरी केलेला एेवज जप्त करून रीतसर अटक केली. अटक केलेल्या संशयिताला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.