माडःसमाजजीवनातील स्थान

भारतीय संस्कृतीत नारळाचे झाड ज्याला आपण माड या नावाने ओळखतो त्या झाडाला आजही खूप महत्त्वपूर्ण स्थान समाजजीवनात दिले जाते

Story: वृक्षवल्ली आम्हा सोयरे | प्राची जयवंत |
18th June 2022, 11:55 Hrs
माडःसमाजजीवनातील स्थान

भारतीय संस्कृतीत नारळाचे झाड ज्याला आपण माड या नावाने ओळखतो त्या झाडाला आजही खूप महत्त्वपूर्ण स्थान समाजजीवनात दिले जाते. माडाच्या झाडापासून मिळालेल्या नारळाला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ म्हणतात. कार्य कोणतेही असो, सर्वात आधी नारळ ठेवून त्या कार्याला सुरुवात केली जाते. या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हणतात. 

ग्रामीण भागात पूर्वी लग्न समारंभाचा कार्यक्रम असला की घरी माडाच्या पानांपासून (चुडत) छान असा मंडप घालायचे. निसर्गातील कोणत्याही घटकापासून बनविलेल्या वस्तूंचा वापर म्हणजे नेहमीच वातावरणात थंडावा आणणारा आणि मन प्रसन्न करणारा आसतो. पण आता मात्र कपड्यांपासून बनविलेले पडदे मंडप घालण्यासाठी वापरतात परंतु ग्रामीण भागात अजूनही काही ठिकाणी चुडतांपासून बनविलेले मंडप घातले जातात, कारण त्याशिवाय कोणत्याही समारंभाला शोभा येत नाही. नारळाचे झाड असे एकमेव झाड आहे ज्याच्या सर्व भागांचा उपयोग होतो. पूर्वी आमचे आजोबा माड तोडण्यासाठी दुसर्‍या गावात जायचे तेव्हा तिथे माडांपासून मिळालेला कवाळा (माडाच्या आतील भागात असलेला चविष्ट खाद्य) आमच्यासाठी घरी आणायचे. त्याची चव अजूनही तोंडावर तशीच आहे. बालपणात आम्ही माडाच्या बोण्याला हिर टोचून त्यापासून  वस्तू बनवून त्यासोबत खेळायचो. बागेत गेल्यावर वर पाहिलं की वाऱ्याबरोबर माडाची चुडते डुलत असायची  ते दृश्य पाहून असे वाटायचे की  माड जणू नृत्य करीत आहेत. माडाची पाने डुलण्यामुळे तो अंगावर स्पर्श करून जाणारा 'पवनदेव' ए.सी.आणि कुलरलासुद्धा मागे टाकतो, नैसर्गिक वारा आणि यंत्रापासून मिळालेला वारा यात खूप फरक आहे हे भासवतो.

नारळाच्या झाडाच्या पानांचा उपयोग हा गावच्या घरावर छप्पर बांधण्यासाठी पण केला जातो. पावसाचे पाणी घरात येऊ नये यासाठी त्यावेळी आधीच्या काळात छप्पर नारळाच्या झाडाचे बनवले जायचे. पाऊस संपल्यावर मे महिन्यात माझी आई झाडाच्या पानांपासून चुडते बनविते या उदाहरणावरून असं समजायला हरकत नाही की अतिशय उपयुक्त अशी ही लोककला  अजूनही जपलेली आहे. लोक या कलेला अजूनही पुढे नेत आहेत. आज देखील आमच्या घराच्या अंगणात सभोवताली आईने झाडांच्या पानांपासून बनविलेली चुडते बाबांनी छान बांधून ठेवलेली आहेत. अश्याप्रकारे पावसाळ्याचे पाणी आत न येण्याची सोय केलेली आहे.

आज जर तुम्ही गावात प्रवेश केलात तर तुम्हाला प्रत्येकाच्या घरात माडाच्या झाडांपासून बनवलेली वस्तू ही भेटेलच. भारतात माडाची लागवड खूप ठिकाणी केली जाते. नारळाच्या झाडाचे खूप फायदे आहेत. काही गावातील लोक माडाच्या सोडणापासून दोऱ्यासुद्धा तयार करतात. नारळाची बर्फी म्हणा किंवा हिरांपासून बनविलेला झाडू ,माडाच्या प्रत्येक भागापासून बनविलेल्या वस्तूचा आजही आदर करतात. नारळाच्या झाडाचे खूप फायदे आहेत. नारळ हा फक्त नुसते एक फळ नाही आहे तर हे एक जीवनातील मौल्यवान घटक आहे.

नारळ सुकवून त्याचे तेल काढले जाते त्या तेलाचा वापर स्वयंपाक करण्यासाठी, दुखापत बरी व्हावी म्हणून, तसेच केसांची निगा राखण्यासाठी वापरण्यात येते. लहान मुलांची मालिश करण्यासाठी देखील हे तेल वापरतात. गावातील लोक शेतात गवत बांधण्यासाठी नारळाच्या किसुळापासून बनविलेल्या दोऱ्या वापरतात तसेच विहिरीतील पाणी काढण्यासाठी या दोरीचा उपयोग केला जातो.

भारतात अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात उदा : दिवाळी, गणेश चतुर्थी, नागपंचमी, विजयादशमी, गुढीपाडवा हे सण साजरे करताना नारळापासून बनविलेले पदार्थ बनवले जातात जसे, दिवाळीसाठी लाडू, पोहे तर गणेश चतुर्थीसाठी करंज्या, मोदक इत्यादी सर्व पदार्थांसाठी नारळाचा वापर होतो.

आजारी माणसांना आडसर (कच्चा नारळाचे पाणी )दिले जाते. शाळेत टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा घेतल्या जायच्या तेव्हा मुले नारळाच्या करवंट्यापासून छानसे तबले तयार करायची. जमिनीवर घालण्यासाठी नारळाचा किसापासून पायपुसणी देखील बनविली जातात.