उकल

दहावीच्या जीवशास्त्राच्या पुस्तकात एक धडा ह्या नुट्रिशनवर आपण अभ्यास करतो, त्यात हे विटामिन बी कॉम्प्लेक्स विषयीची प्रश्नोत्तरं दोन तीन गुणांसाठी पाठ केली जातात आणि नंतर त्यातले कित्येक घटक आपण विसरूनही जातो. एवढेच काय ते सामान्य माणूस हे विटामिन बी कॉम्प्लेक्सशी तोंडओळख करून घेतो. पण याच विटामीन बी कॉम्प्लेक्सच्या कमतरतेमुळे कितीतरी समस्या उद्भवू शकतात हे सहसा कुणाच्या खिजगणतीतही नसतं.

Story: स्टेथोस्कोप | डॉ. अनिकेत मयेकर |
18th June 2022, 11:47 Hrs
उकल

डॉक्टरांकडे येणारा रुग्ण हा कधीकधी एखाद्या विणकामासारखा असतो. म्हणजे दिसायला नुसती गुंतागुंत. कसं काय केलंय, कुठला पीळ कुठे पडलाय ह्याची डोकेफोड केली तरी अंदाज लागत नाही. मात्र अचानक एक धागा असा हाताला लागतो की त्या धाग्याला धरून ताणलं की एकेक पीळ - गाठ सुटत जाते. अगदी अलगदपणे... आमच्या इंटर्नशिपमध्ये आलेली एक केस... ती केसही अशीच होती. कारण तसं काही मोठसं नव्हतं. पोटाच्या तक्रारीमुळे एक मुलगा हॉस्पिटलमध्ये एका एम डी डॉक्टरांच्या हाताखाली अॅडमिट झालेला. वय असेल २५- २६च्या दरम्याने. त्याला अॅंटिबायोटिक्ससारखी नियमित औषधं चालू होती. पेशंटमध्ये सुधारणाही होत होती. परंतु नियमित चेक केल्या गेलेल्या बीपी चार्टमध्ये त्याचा बीपी वाढलेला होता. मग रक्तदाबा संदर्भात डॉक्टरांनी रक्त चाचण्या, कार्डिएक टेस्ट  करून घेतली . रिपोर्ट्स तर सर्व नॉर्मल. परंतु रक्तदाब जास्त असल्यामुळे बीपीच्या गोळ्या सुरू करून टाकल्या. मात्र यामध्ये रक्तदाब का वाढला याचे उत्तर मात्र अनुत्तरीतच होतं. पण खोलवर माग काढल्यावर समजलं की त्याला Anxiety disorder आहे. म्हणजेच काय तर सगळ्या गोष्टींची अशी एक अनामिक भीती जी सतत रूग्णाला सतावत असते आणि त्याचे परिणाम म्हणून मग इतर समस्या उद्भवू शकतात. यालाही हेच निदान सापडलं खरं, याचाही रक्तदाब वाढण्याचं कारणसुद्धा हेच होतं. पण या सगळ्याचं मूळ तर हेही नव्हतं. कारण ही Anxiety कशामुळे आहे ते कळत नव्हतं. मग अजून थोडं खोलवर जावं म्हणून विटामिन बी १२, विटामिन डी, आयर्न स्टडी करण्यात आले. हा… आता खर्‍या मूळ कारणाकडे पोहोचलोच होतो. त्याच्यात इथेच इमबॅलेंस झाल्याने ही समस्या उद्भवली होती. त्याचेच कारण म्हणजे त्याची anxiety आणि ही वाढल्यामुळे डिप्रेशन, बीपी वाढणे असे दोष त्या मूलामध्ये उद्भवत होते. पूर्ण डोंगर पोखरून हा उंदीर निघाला होता. मात्र हा इवलासा उंदीर पण डोंगर पोखरू शकतो ही गोष्टही लक्षात घेण्यासारखी होती. 

विटामीन बी कॉम्प्लेक्स! दहावीच्या जीवशास्त्राच्या पुस्तकात एक धडा ह्या नुट्रिशनवर आपण अभ्यास करतो, त्यात हे विटामीन बी कॉम्प्लेक्स विषयीची प्रश्नोत्तरं दोन तीन गुणांसाठी पाठ केली जातात आणि नंतर त्यातले कित्येक घटक आपण विसरूनही जातो. एवढेच काय ते सामान्य माणूस हे विटामिन बी कॉम्प्लेक्सशी तोंडओळख करून घेतो. पण याच विटामिन बी कॉम्प्लेक्सच्या कमतरतेमुळे कितीतरी समस्या उद्भवू  शकतात हे सहसा कुणाच्या खिजगणतीतही नसतं. 

आपल्या शरीराला वेगवेगळ्या मिनरल्सची गरज असते. विटामिन्स, मिनरल्स, प्रोटिन्स, कार्ब्स आणि गुड फॅट्स आपले शरीराचे आरोग्य राखण्यास मदत करतात. जर शरीरात कोणत्याही एखाद्या पोषण तत्वाची कमतरता असेल तर अनेक तर्‍हेच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे यांचे सेवन आणि आहारात वापर गरजेचे आहे. विटामिन बी १ (थायमिन), विटामिन बी २ (रिबोफ्लोविन), विटामिन बी ३ (नायसिन), विटामीन बी ५ (पॅंटोथेनिक अॅसिड), विटामिन बी ६ (पायरीडोक्सिन), विटामिन बी ७ (बायोटीन), विटामिन बी ९ (फोलेट), विटामिन बी १२ (कोबालामिन) हे विटामिन बी कॉम्प्लेक्सचे विविध प्रकार आहेत. जे आपल्या वेगवेगळ्या अन्नघटकातून मिळत असतात. जसे की शेंगदाणा, हिरव्या भाज्या, फळे, अंडी, मासे, मांस, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा इत्यादि. 

विटामिन बी शरीराच्या अनेक कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात आणि आपले आरोग्य चांगले राखतात. विटामिन बी पाण्यामध्ये विरघळतात त्यामुळे शरीर या विटमिन्सना स्टोअर करू शकत नाही त्यामुळे रोज विटामिन बी रोज आहारात असणे आवश्यक आहे. विटामिन बी कॉन्प्लेक्सच्या कमतरतेमुळे वेगवेगळे विकार उत्पन्न होतात. काही प्रमुख लक्षणांमध्ये हाता पायांना मुंग्या येणे, मांसपेशी कमजोर होणे, शरीराचे वजन घटणे, झोप कमी येणे, शरीरावर लाल चट्टे येणे, शरीरावर सूज येणे, नजर कमजोर होणे, पचनक्रियेत त्रास होणे, इतर हृदयाशी संबंधित आजार, मेंदूच्या विकासात कमतरता होणे अश्या प्रकारचे विकार यात दिसून येतात. त्यामुळे या घटकांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. रोजच्या आहारात तर यांचे सेवन असावेच पण याच्या कमतरतेमुळे उद्भवणारे कोणतेही आजार किंवा लक्षणे शरीरात दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या सुरू करणे कधीही चांगले. 

आपल्या मानवी शरीराची रचना एवढा काटेकोर विचार करून केलेली आहे की त्यात एक तत्व जरी कमी जास्त झाले तर त्याचे पडसाद आपले शरीर लगेच देऊ लागते. त्या मुलाच्या बाबतीत वेगळे काहीच नव्हते, एका विटामिन बी १२च्या कमतरतेमुळे बाकीच्या सगळ्या व्याधी त्याच्या मागे लागून त्याची ससेहोलपट होऊ लागली. पण सगळ्याची उकल फक्त एका गोष्टीत होती याचा वरवरून थांगपत्ताही नव्हता.