पोलोन्नुरुवा : अवशेषरूपी उरलेली एक सुंदर नगरी

मी तर इथे येऊन ‘त्या काळात जायला ‘time travel’ करता आलं असतं तर किती बरं झालं असतं’ हा विचार मनात घोळवत होते. डोळे मिटून ‘पूर्वी ही इमारत कशी होती असेल’ असा विचार प्रत्येक ठिकाणी करत होते. आपलं काल्पनिक जग निर्माण करण्यात जी काही मजा आहे ना, ती शब्दात सांगणं कठीण.

Story: प्रवास | भक्ति सरदेसाई |
18th June 2022, 11:35 Hrs
पोलोन्नुरुवा : अवशेषरूपी उरलेली एक सुंदर नगरी

पुलस्ती ऋषींचं जन्म स्थान मानली जाणारी पौलस्तपुरी किंवा पोलोन्नुरुवा ही श्रीलंकेतली जागतिक वारसा स्थळांमध्ये गणली जाणारी आणखी एक जागा. आम्ही ह्या राजधानीचे प्राचीन अवशेष पहायला आलो होतो. पहिल्याच नजरेत लक्षात आलं की ही नगरी तिच्या काळात किती सुंदर होती असावी. लांबच्या लांब पसरलेला परिसर, ठीकठिकाणी कोणे एके काळी बांधलेल्या (परंतु आता पडलेल्या) इमारती. अनेक झाडांनी मिळून शोभा वाढवावी अशा हिरव्यागार रस्त्याने आम्ही रिक्षाने चाललो होतो. झाडांच्या छत्रछायेखाली असल्याने दुपारचं ऊन अजिबात स्पर्श करत नव्हतं. त्यामुळे एकंदरीतच ह्या अनुभवाची मजा द्विगुणित झाली होती. 

रस्त्याच्या दोन्ही बाजूला राजवाडे, प्राचीन देवळं, थिएटर्स, उद्यानं, असं बरंच काही दिसत होतं. आम्ही प्रत्येक ठिकाणी थांबून त्या त्या जागेबाबत विचारून घेत होतो. इतिहासप्रेमींनी नक्की पहावी अशी ही जागा, हे मात्र खरं. बाराव्या शतकात बांधल्या गेलेल्या भव्य उद्यान-शहराचे स्मारक अवशेष हे. आजूबाजूला इतकी घनदाट झाडी आहे पण कॅंबोडियातल्या ‘अंकॉर-वॅाट’ सारखं एकाही झाडाने ह्या अवशेषांवर चढून कब्जा मिळवलेला नाही. 

मी तर इथे येऊन ‘त्या काळात जायला ‘time travel’ करता आलं असतं तर किती बरं झालं असतं’ हा विचार मनात घोळवत होते. डोळे मिटून ‘पूर्वी ही इमारत कशी होती असेल’ असा विचार प्रत्येक ठिकाणी करत होते. आपलं काल्पनिक जग निर्माण करण्यात जी काही मजा आहे ना, ती शब्दात सांगणं कठीण. त्यासाठी कथाकार असावं लागतं. पण ह्या परिसरात एक वेगळीच जादू आहे. कल्पकता असणाऱ्या कोणालाही दिसतील अशी दृश्य आपोआप दिसू लागतात आणि आपोआप आपण त्या जुन्या काळात पोहोचतो. 

अश्याच वेगवेगळ्या अवशेषांची माहिती घेत घेत, त्यांच्या सभोवताली फोटो काढत असताना एक कटू अनुभव आला आणि माझा मूडच गेला. झालं असं, की जसे इतर लोक फोटो काढत होते तशी मी पण “माझाही एक असा फोटो काढ” असं आदित्यला म्हणत एका अवशेषाच्या भिंतीला जाऊन टेकले. तिथे एका ग्रुपला घेऊन आलेल्या एका वाटाडीने मला नेमकं पकडलं आणि बरंच काही सुनावलं. मी तिला म्हटलं देखील की “अगं बाई, मला माहीत नाही इथे टेकायचं नाही ते. तसं कुठे काही लिहिलेलं नाहीये आणि इथे बघ ना आजूबाजूला सगळेच तसे फोटो काढताहेत.” तर त्यावर ती मला म्हणाली “हो पण त्यांच्या तिथे हे सगळं चालतं, तुमच्या भारतात मी आले असताना मला पण देवळांमध्ये फोटो काढायला दिले नाहीत कोणी. हे अवशेष आम्हाला पवित्र आहेत, तुमच्या देवळांसारखेच.” ते ऐकून माझ्या डोक्यात प्रकाश पडला की ही बाई निव्वळ दुष्टपणाने मला एवढं ऐकवते आहे. आता अशा व्यक्तीला काय म्हणायचं? मी “ठीक आहे परत नाही काढत फोटो” असं पुटपुटत तिथून काढता पाय घेतला आणि थोडी पुढे गेले. तर ही परत माझ्याच मागे! “तू माफी नाही मागितलीस” मला तिने आठवण करून दिली. आता मात्र माझाही पेशंस संपला “मी भिंतीची माफी मागितली, तुझी का मागू?” असं मी तिला ऐकवलं. तो पर्यंत थंड डोक्याच्या आदित्यला धोक्याची लक्षणं दिसली नि तो मला घेऊन परत रिक्षेकडे गेला. आम्ही थेट एका कॅफेमध्ये गेलो.

चहा बिस्किटं खाऊन झाल्यावर परत मूड सुधारला. हसत हसत आम्ही परत साईटवर आलो. अशा गोष्टी तर होतच राहतात पण त्यामुळे आपण आपला मूड खराब करून घेतला तर आपलंच नुकसान होतं. त्या बाईचा विषय मी डोक्यातून काढून टाकला आणि पुन्हा मजा घेत घेत ही ‘हेरिटेज सिटी’ बघू लागलो.

रॉयल पॅलेस हे ह्या परिसरातलं कधीही न चुकवावं असं आकर्षण आहे. रॉयल पॅलेस म्हणजे राजा पराक्रमबाहुचा राजवाडा. सात मजली इमारत म्हणून बांधण्यात आलेल्या ह्या राजवाड्याचे फक्त 3 मजले उरले आहेत. आजूबाजूला नजर फिरवली तसं भोवताली असलेल्या अरण्यानं मन मोहून घेतलं नि महालात प्रवेश करताना पयाऱ्यांवरच्या कोरीव कामाने लक्ष वेधून घेतलं. 

पोलोन्नुरुवामध्ये शिवमंदिरं आहेत. चोलांचं जेव्हा इथे राज्य होतं तेव्हा ही बांधली गेली होती आणि म्हणूनच ही देवळं इतर इमारतींपेक्षा फार जुनी आहेत. आम्ही दोन पाहिली. त्यातल्या एका देवळाला पाहून अगदी तांबडी सुर्लाच्या देवळाची आठवण झाली. तशीच बसकी रचना, पाषणाचं बांधकाम, छोटासा कळस, लहानशी गर्भकूड, त्यात शिवलिंगावर कोणीतरी घातलेली फुलं, हे सगळं पाहून खूप बरं वाटलं. ह्या पडीक शहरातही देवाला पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं नाही ह्या विचाराने मन प्रसन्न झालं.  

इथून जरा पुढे जाऊन मनोरंजनासाठी बांधलेलं थेटर दिसलं. ह्या इमारतींची खासियत म्हणजे ह्याच्या प्रत्येक भिंतीजवळ सुंदर दगडी कोरीव हत्ती आहेत आणि बारकाईने पाहिलं तर प्रत्येक हत्ती वेगळा दिसतो. पराक्रमबाहुला हत्ती फार आवडत म्हणे. त्याला खूश करण्यासाठी कदाचित तेव्हाच्या आर्किटेक्टने जिथे मिळेल तिथे हत्ती कोरले होते. कारण हे हत्ती अगदी पायऱ्यांपासून खांबांपर्यंत सगळीकडेच दिसले. 

पोलांनुरुवाच्या शहरात पाहण्यासारखं ‌अजूनही बरंच काही होतं. वेळही होता. आम्ही रमत गमत आस्वाद घेत सगळं पाहत होतो. क्षण टिपत होतो. आठवणी बनवत होतो. क्रमशः