करंझाळे येथील स्वयंअपघातातील दुचाकी चालकाला अटक

|
17th June 2022, 11:59 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी :
करंझाळे येथील जावा शोरूमजवळ झालेल्या स्वयंअपघातात दुचाकीच्या मागे बसलेला दीपक बिस्त (२९, मूळ उत्तराखंड) याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी दुचाकीचालक रवींद्र रावत (२९, मूळ डेहराडून) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायं. ४ वा. करंझाळे येथील जावा शोरूमजवळ दुचाकीचा स्वयंअपघात झाला. यावेळी दुचाकी चालक रवींद्र रावत आणि त्याच्या मागे बसलेला दीपक बिस्त मिरामारहून दोनापावलाला जात होते. करंझाळे येथे जावा शोरूमजवळ पोहचताच रवींद्रचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दोघेही रस्त्यांवर पडून जखमी झाले होते. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पणजी पोलीस तसेच १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील बिस्तला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला रुग्णवाहिकेतून इस्पितळात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टारांनी घोषित केले.
या प्रकरणी पणजी पोलीस निरीक्षक निखील पालयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी यांनी दुचाकी चालक रवींद्र रावतने निष्काळजीपणाने दुचाकी चालवून मागे बसलेल्या सहाय्यकाचा मृत्यू झाल्यामुळे भादंसंच्या कलम २७९, ३३७ आणि ३०४ए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.