पुलवामामध्ये चकमक; तीन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये शनिवारी संध्याकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार झाले आहेत. पुलवामाच्या द्रबगाम भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला.

Story: श्रीनगर : |
13th June 2022, 12:48 Hrs
पुलवामामध्ये चकमक; तीन दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये शनिवारी संध्याकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार झाले आहेत. पुलवामाच्या द्रबगाम भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला.
शनिवारी रात्री उशिरा एका दहशतवाद्याचा; तर इतर दाेन दहशतवाद्यांचा रविवारी सकाळी झालेल्या कारवाईत खात्मा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांना घेरले होते, त्यानंतर एक दहशतवादी मारला गेला. घटनास्थळावरून दोन एके-४७ रायफल, एक पिस्तूल आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे.
आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारले गेलेले सर्व दहशतवादी स्थानिक होते आणि ते लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. त्यापैकी एकाचे नाव जुनैद शिरगोजरी असे असून तो १३ मे रोजी कॉन्स्टेबल रियाझ अहमद यांच्या हत्येमध्ये सामील होता. पुलवामा जिल्ह्यातील फाजील नजीर भट आणि इरफान मलिक अशी अन्य दोन दहशतवाद्यांची नावे आहेत.
३६ तासांत ४ दहशतवादी ठार
खोऱ्यात गेल्या ३६ तासांत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या कुलगाममधील खांडीपोरा भागात शनिवारी सकाळी हिजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतवादी मारला गेला. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे दोन दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याआधी मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील याच भागात २४ तासांत सुरक्षा दलांनी तीन वेगवेगळ्या चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार केले होते.