भारतीय लोकशाही ढासळली तर पूर्ण जगासाठी ती समस्या!

- लंडनमधील परिषदेत राहुल गांधी यांची मोदी सरकारवर जोरदार टीका

Story: लंडन : |
23rd May 2022, 01:28 Hrs
भारतीय लोकशाही ढासळली तर पूर्ण जगासाठी ती समस्या!

लंडन : भारतातील लोकशाही जगाच्या हिताची असून, ती जणू जगासाठी जहाजाच्या नांगराप्रमाणे काम करते. भारतीय लोकशाही जर ढासळली तर अवघ्या जगासाठी ती समस्या ठरेल, असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर टीका करताना दिला. भारतात दोन प्रकारची शासनपद्धती आहे. एक आवाज दाबणारी आहे व दुसरी आवाज ऐकणारी आहे. देशभरात रॉकेल पसरवले आहे. आता फक्त एक ठिणगी टाकण्याचा अवकाश आहे, अशी टीकाही त्यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे केली.
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांच्याशी ‘ब्रिज इंडिया’ या संस्थेने ‘आयडियाज फॉर इंडिया’ या परिषदेत संवाद सत्र ठेवले होते. या वेळी त्यांनी देशासाठी भव्य-सुंदर घडवण्यासाठी बहुसंख्याच्या कृतिशील सहभागाबाबत काँग्रेसचा दृष्टिकोन स्पष्ट केला.
राहुल म्हणाले, काँग्रेसची विचारधारा लढण्यासाठी सज्ज आहे. भाजप केवळ विरोधकांचा आवाज दाबून फक्त स्वत: आक्रोशत राहणारा पक्ष आहे. मात्र, आम्ही (काँग्रेस) विरोधकांसह समोरच्याचे नीट ऐकून घेतो. या दोन पक्षांत विभिन्नता आहे. दोन्ही पक्षांची बांधणीच अगदी वेगळी आहे.
या परिषदेत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आणि तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा हे विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते.
राहुल गांधी म्हणाले...
* की साम्यवादी असो किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ! एक ठरावीक विचारसरणी लोकांच्या गळी उतरवणाऱ्या या विचारधारा आहेत. सर्व कार्यकर्त्यांना काय बोलायचे हे पढवले जाते. त्याशिवाय बाकी काही बोलायचे नाही, याची सक्त ताकीद त्यांना दिली जाते.
* काँग्रेसची रचना तशी नाही. आम्ही भारतीयांना समजून-उमजून घेतो. त्यांना त्यांचे म्हणणे मांडू देतो. त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देतो. भारतीयांमध्ये सुसंवाद-परस्पर सौहार्दाचा व्यवहार असावा, असे आम्हाला वाटते.
* भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताला फक्त भूगोल मानतात. भारत ही ‘सोन्याची चिमणी’ असून, तिचा लाभ निवडक घटकांसाठी असल्याचे ते मानतात. काँग्रेस पक्ष मात्र सर्वाना समान संधी व लाभ देतो.
चीन घुसखोरीशी
युक्रेनप्रश्नाची तुलना
रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाविषयी विचारले असता राहुल यांनी त्याची तुलना चीनच्या भारतातील घुसखोरीशी केली. रशिया जसे युक्रेनची भौगोलिक एकात्मता व सार्वभौमता मानत नाही, युक्रेनचे दोन जिल्ह्यांचे स्वामित्व न मानता रशियाने ते जिल्हे घेण्यासाठी, युक्रेनवर आम्ही आक्रमण करत आहोत, मात्र युक्रेनने ‘नाटो’शी केलेली आघाडी मोडावी, अशी वल्गना पुतिन यांच्या नेतृत्वाखाली रशिया करत आहे. चीन म्हणतो, की भारताचे अमेरिकेशी संबंध आम्ही मान्य करू; मात्र या प्रदेशांवरील भारताचा हक्क आम्ही मान्य करणार नाही. मात्र, चीनशी सीमेवरील तणावावर भारत सरकार चर्चा करू इच्छित नाही. पँगाँग सरोवरवर मोठा पूल चीनने बांधला. यावर भारत संवाद-चर्चा होऊ देत नाही.