आठवण अशीही स्मरते

स्त्री जन्म म्हटले की असंख्य त्रास हे आलेच. एक स्त्री जेव्हा आई होते तेव्हा तिला आपल्या बाळासाठी आपले आरोग्य चांगले ठेवणे जरुरीचे असते. आत्ता ठणठणीत असलेला माणूस कधी आजारी पडेल सांगता येणार नाही. माणसावर प्रसंग काही येत नाहीत असे नसतेच. काही वेळा नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही दुसरीकडे ठेवून मातेला थोडे दूर राहायचा ही प्रसंग येतो.

Story: ललित | सोनाली सु.पेडणेकर |
20th May 2022, 10:08 Hrs
आठवण अशीही स्मरते

त्या दिवशी सकाळी आठ वाजता घरातला लँडलाईन फोन वाजला. सासूबाईंने तो उचलला "हॅल्लो, कोण बोलतोय " त्या बाजूने तिचाच मोठा मुलगा जय बोलत होता तो म्हणाला "आई मी जय बोलतोय" आई म्हणाली " हां बोल, काय आज सकाळी सकाळी आईची आठवण कशी झाली?" जय म्हणाला,"अग आई थोडा प्रोब्लेम आहे. हिचं ना उद्या ऑपरेशन आहे"

"काय? काय झालं? कसलं ऑपरेशन?" आईने थोडं भीतीच्या स्वरात विचारले. जय म्हणाला, "अगं घाबरायचे कारण नाही. पण तुम्हा सर्वांना आज  इथे यावे लागेल." आईने हो म्हटले आणि फ़ोन खाली ठेवला.

जय मोठा मुलगा आणि माझा नवरा त्याच्या पाठीमागचा. दोघे भाऊ काही कारणास्तव वेगळे राहत होते. जय सांगे येथे तर आम्ही वास्कोला. तसे बोलून चालून सारे काही सुरळीत होते. सासूबाई माझ्याकडे रहायच्या. त्या दुसऱ्या सुनेकडे राहायला तयारच नव्हत्या . का कुणास ठाऊक. मला ते माहिती नव्हते. ती थोडी आजारी पण असायची. तिने आपल्या धाकट्या मुलाला सांगितले, दादाने आज सर्वांना आपल्याकडे बोलाविले आहे. आठ दहा दिवस थांबावे लागेल असंही सांगितले आहे. तुला सांग म्हटलंय इथनंच कामाला जा " तो तिचा धाकटा मुलगा म्हणजे माझे नवरोबा. त्याने आईला विचारले, "का? मध्येच असे का बोलाविले आणि ते ही चक्क आठ-दहा दिवस?" आई म्हणाली, "हो भाभीचे उद्या ऑपरेशन आहे. तिला आज रात्री दवाखान्यात अॅडमिट करायचे आहे" हा म्हणाला, "आता काय आमची आठवण झाली. बाकी आम्ही नको ना त्याला. आपल्यावर प्रसंग ओढवला तेव्हा आम्ही का हवे आहोत?"

 " ते असुदे रे. सोडून दे सारे. अश्या वेळी आम्ही नाही गेलो तर कोण जाईल? अश्यावेळी आपलीच माणसे गरजेची" आई म्हणाली. तेव्हा एक महिन्या अधीच भाभीला मुलगा झाला होता. तिच्या पोटात ट्यूमर झाला होता . तो तिची डिलिव्हरी झाल्यावर काढावा. कारण पोटातली पिशवीच काढावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले होते. आणि तेच ऑपरेशन होते.

माझ्या मुली तेव्हा खूप लहान होत्या. हो! मला दोन मुली आणि माझ्या दिराला दोन मुलगे. माझी मोठी मुलगी चार वर्षांची होती तर छोटी दोन. हा मला म्हणाला, "चल गं! बॅग भर, जाऊ आपण" मी आणि आईने आमच्या कपड्यांचे बॅग भरले. दुपारचे जेवण करुन आम्ही निघालो.

सहा वाजता तिथे पोचलो. त्या आधीच भाभी हॉस्पिटलमध्ये गेली होती. कामाला जी मुलगी होती ती तर घरची कामे करत होती. आता त्या एक महिन्याच्या दिराच्या मुलाला पाहण्यासाठी आम्हाला दादाने बोलावले होते. त्या मुलीकडे सोडणे त्याला भीती वाटली असावी बहुतेक. त्याला कामाला असलेल्या त्या मुलीवर विश्वास नव्ह्ता. मी आपल्या मुलाची नीट देखरेख करीन ह्याची भाभीला खात्री होती. बाकी पाहता तिचे बहीण भाऊ जवळच राहत होते. माझी दोन वर्षांची मुलगी तेव्हा माझ्या अंगावरचे दूध प्यायची. आम्ही तेथे गेल्यामुळे आता त्यांना टेन्शन नव्हते. त्या तान्हुल्याला पाहण्याची वेळ माझ्यावर आली होती. त्याची पूर्ण देखभाल भाभीला घरी आणेपर्यंत माझ्यावर होती. त्याला डब्याचे दूध घालावे लागे. मी ते वेळोवेळी त्याला पाजत होते. एक आई जेव्हा तान्हुल्याच्या जवळ नसेल तर तो आईच्या दुधाला तळमळेलच ना!  माझ्या नवऱ्याने आपल्या कामावर चार दिवसाची रजा  घेतली होती. कारण त्याला माहिती होते सासूबाईचं कुठल्याही वेळेस आरोग्य बिघडते. त्यावेळी मी एकटी या चार मुलांना पाहताना थकून गेले असते. दीर तर भाभीजवळ जायचे. जेवण घ्यायला घरी यायचे. भाभीला  चार दिवसानंतर घरी पाठवणार असे डॉक्टरने सांगितले होते.  एका रात्री तान्हुला खूप रडायला थांबला काही केल्या थांबेना. डब्याच्या दुधाला तोंड लावेना. मला काही सुचेनासे झाले. मनात गोंधळ माजला. काय करावे कळेना… पण तितक्यातच मी त्याला माझ्या पदराखाली घेतले. तान्हुला त्याच क्षणी शांत झाला. तृप्तीतले सुखच जणू तान्हुला अनुभवत होता.