गृहकर्जावरील विविध कर सवलती

आपल्या भारतात कर वाचविण्याचा सामान्यातल्या सामान्य माणसाला माहीत असलेला उपाय म्हणजे गृह कर्ज. परंतु बऱ्याच वेळी गृह कर्जातल्या नेमक्या कोणत्या बाबी आपला कर वाचवू शकतात या बाबतीत मात्र हाच करदाता अनभिज्ञ असतो. म्हणूनच आज आपण यासंबंधी सविस्तर माहिती घेऊ. गृहकर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड करीत असलेल्या व्याजावर किंवा मुद्दलीवर आपल्याला करमाफी किंवा करसवलत मिळते. याची माहिती आपण पाच भागात घेऊ.

Story: तिचे नियोजन | सी. ए. राधिका काळे |
20th May 2022, 10:07 Hrs
गृहकर्जावरील विविध कर सवलती

मुद्दल परतफेडीवरती करसवलत :

गृहकर्ज मुद्दल फेडीवरती करप्राप्त उत्पन्नातून वजावट ही कलम 80C खाली मिळते हे तर आपल्याला ठाऊकच आहे. १.५० लाख रुपयांपर्यंत ही कर वजावट आपल्याला मिळत असते. त्याच प्रमाणे स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्कावर सुद्धा ही कर वजावट मिळते. परंतु ही वजावट घेण्याकरिता ज्या वर्षात आपण स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्क भरलेले असते त्याच वर्षी ही वजावट घेता येते. व ही वजावट घेण्याकरिता १.५० लाख मर्यादा आहे. तसेच मुद्दल परतफेडीवरती कर वजावट लाभ घेण्यासाठी घराचे बांधकाम पूर्ण होऊन त्यासंबंधीचा दाखल असणे महत्वाचे आहे. म्हणजेच घराचे बांधकाम  अपूर्ण असेल आणि मुद्दल परतफेड केली असेल तर आपल्याला कर वाजवटीचा लाभ घेता येत नाही.

व्याजावरील वजावट :

गृहकर्ज व्याज फेडीवरती आपल्याला कर वजावट मिळते. जर बांधलेले घर किंवा खरेदी केलेले घर आपण स्वतःच्या निवासाकरिता वापरत  असू तर त्या वर्षात जास्तीत जास्त २ लाखांपर्यंत कर वजावट मिळते. घर जर भाड्याने दिले असेल तर भरलेले संपूर्ण व्याज वजावट म्हणून मिळते.

बांधकाम पूर्व व्याज परतफेड: 

बऱ्याच वेळी घराचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच आपण कर्जही परत फेड चालू केलेली असते. अश्या वेळी बांधकाम पूर्ण होण्याआधी जे व्याज भरले जाते ते बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच्या वर्षापासून कर वाजवटीस पात्र ठरते. ही रक्कम ५ वर्षांसाठी समप्रमाणात विभागली जाते. तसेच घरात स्वतः राहणार असू तर २ लाखांची मर्यादा लागू होते व घर भाड्याने दिले असल्यास भरलेल्या पूर्ण व्याजापोटी वजावट मिळते.

कलम 80EE  अंतर्गत कर वजावट: 

ज्या करदात्यांच्या पहिल्यांदाच गृहकर्ज घेतले आहे आणि घराची किंमत ५० लाख किंवा त्या पेक्षा कमी आहे तसेच घेतलेल्या कर्जाची मुद्दल ३५ लाख किंवा त्या पेक्षा कमी आहे अश्या करदात्यांचा ५०,००० अतिरिक्त वजावट दिलेली आहे. परंतु ही वजावट फक्त ०१.०४.२०१६ ते ३१.०३.२०१७ या वर्षात घेतलेल्या कर्जासाठीच  मिळते.

कलम ८० EEA  अंतर्गत कर वजावट: 

हे कलम नव्यानेच समाविष्ट करण्यात आलेले आहे. ह्या कलाम अंतर्गत जी गृहकर्जे ०१.०४.२०२० ते ३१.०३.२०२२ ह्या कालावधीत घेतली गेली आहेत त्यांच्यासाठी १.५ लाखाची जास्तीची व्याज वजावट दिली गेली आहे. म्हणजेच २ लाख अधिक १.५ लाख एवढ्या व्याजावर लाभ मिळू शकतो. हे गृहकर्ज घेणारा करदाता प्रथमच गृहकर्ज घेणारा असावा. विकत घेतलेल्या घराची किंमत ४५ लाख किंवा कमी असावी. तसेच त्या करदात्याच्या नावे अन्यत्र  घर असता कामा नये.