मुख्यमंत्र्यांच्या पंचायत सचिवांना कानपिचक्या

सरकारी कर्मचारी २४ तास सेवेत हवा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
14th May 2022, 12:52 am
मुख्यमंत्र्यांच्या पंचायत सचिवांना कानपिचक्या

पणजी : सचिवांनी स्वतःचे फायदे न पाहता जनतेसाठी काम करावे. सरकारी कर्मचारी ९ ते ५ या वेळापुरताचा मर्यादित नसून त्यांनी २४ तास सेवा देण्याचा प्रयत्न करावा. सरकारी योजना पात्र लोकांपर्यंत पोहोचतील, यासाठी सचिवांनी प्रयत्न करावेत. सरकार आता तक्रार निवारण कक्ष स्थापन करणार आहे. सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.
साखळी येथे मिनरल फाउंडेशनतर्फे आयोजित शिबिरात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. स्वयंपूर्ण मित्र चांगले काम करतात. असेच काम पंचायत सचिव व इतरही करू शकतात. सचिव तसेच तलाठ्यांचा थेट जनतेशी संपर्क असतो. हे त्यांना अधिक चांगली सेवा देऊ शकतात. शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. या योजना लाल फितीत गुंडाळल्या जाऊ नयेत. सचिवांनी चौकटीबाहेर जाऊन योजना लोकांपर्यंत कशा पोहोचतील, याचा विचार करायला हवा. सुर्लाच्या स्वयंपूर्ण मित्राने चांगले काम केले आहे. त्याने एका महिलेला घर बांधण्यास मदत केली. सचिवांनीही अशाच पद्धतीने काम करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कायदेशीर खाणी सुरू करणे गरजेचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा