कोविड बळींच्या कुटुंबांची परवड

आरोग्य खात्याचा निष्काळजीपणा; अर्थसाह्य योजनेचे २६८ अर्ज स्थगित

Story: विश्वनाथ नेने । गोवन वार्ता |
14th May 2022, 12:39 Hrs
कोविड बळींच्या कुटुंबांची परवड

पणजी : कोविड बळींच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने समाजकल्याण खात्यातर्फे २ लाखांचे अर्थसाह्य देणारी योजना सुरू केली आहे. अर्थसाह्यासाठी हजारोंच्या संख्येने अर्ज आले आहेत. पण, यातील २६८ अर्ज स्थगित ठेवण्यात आले आहेत. कारण, या कुटुंबांतील सदस्यांचा मृत्यू कोविडमुळे झाल्याची नोंद आरोग्य संचालनालयाकडे नाही. आश्चर्य म्हणजे, गोमेकॉ आणि इतर इस्पितळांमध्ये त्याची नोंद आहे. या प्रकारामुळे आरोग्य संचालनालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोविडने अनेकांच्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे प्राण घेतले. यामुळे या कुटुंबांसमोर सदस्य गमावण्याचे दुःख तर होतेच. पण, पुढे उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्नही निर्माण झाला होता. यांचा भार हलका करण्यासाठी राज्य सरकारने ‘एक्स ग्रेशिया असिस्टंस टू ऑफ कीन ऑफ द डिसिज्ड बाय कोविड १९’ नावाची योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत कोविडमुळे घरातील कमावत्या व्यक्तिचा मृत्यू झाला असल्यास त्याच्या कुटुंबाला २ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. समाजकल्याण खात्यामार्फत ही योजना राबवली जाते.
वरील योजनेसाठी समाजकल्याण खात्याकडे एकूण २ हजार ९४ अर्ज आले आहेत. पैकी १ हजार ८२७ अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. १ हजार २३० अर्ज लेखा खात्याकडे देण्यात आले आहेत तर ५९७ अर्जांच्या रकमेचे वाटप प्रत्यक्षात होणे अजून बाकी आहे. इतपत ठिक आहे. पण, २६८ अर्ज स्थगित ठेवण्यात आले आहेत. याचे कारण म्हणजे आरोग्य संचालनालयाकडे या २६८ जणांचा मृत्यू कोविडमुळेच झाल्याची कसलीच माहिती नाही. कागदोपत्री नोंद नाही. आश्चर्याची बाब म्हणजे या २६८ जणांचा कोविडमुळेच मृत्यू झाल्याची नोंद वा माहिती गोमेकॉत आणि इतर इस्पितळांमध्ये उपलब्ध आहे. मात्र, ती आरोग्य संचालनालयाकडे उपलब्ध नाही. ही माहिती आरोग्य संचालनालयाकडे कशी उपलब्ध नाही, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, कोविड काळात सर्वच आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण होता, त्यामुळे काही नोंदी चुकलेल्या असू शकतात. ते नजरेस आल्यास आम्ही त्यात तत्परतेने सुधारणा करू, असे राज्याचे महामारीशास्त्रज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी म्हटले आहे.

‘समाजकल्याण’ची अकारण दमछाक

- योजना समाजकल्याण खात्यातर्फे राबवायची आहे. म्हणजे संबंधित कुटुंबांपर्यंत निधी पोहोचवण्याची पूर्ण जबाबदारी त्यांचीच आहे. पण आरोग्य खात्याच्या भोंगळ कारभारामुळे योजना राबवताना त्यांची दमछाक होत आहे. लोक या खात्याला अकारण दोष आहे.
- समाजकल्याण खात्याने स्थगित ठेवलेल्या २६८ अर्जांपैकी साधारण १९९ अर्जांमधील नोंदीप्रमाणे संबंधित कुटुंबांतील व्यक्तीचा मृत्यू कोविडमुळे झाल्याची कागदपत्रे (प्रत) आरोग्य संचालनालयाला दिली आहेत. पण आरोग्य संचालनालयाने अजूनपर्यंत याबाबत पुढील प्रक्रिया केलेली नाही.

चूक असल्यास सुधारू : डॉ. बेतोडकर

- कोविड बळींची आरोग्य संचालनालयाकडे नोंद नसल्यास त्याला संबंधित इस्पितळ जबाबदार आहे. कोविड काळातही त्यांनी अहवाल नीट दिला नव्हता.
- याआधी एकदा समाजकल्याण खात्याकडून एक यादी आली होती. त्याबाबतची माहिती संबंधित इस्पितळांकडे आम्ही पडताळणीसाठी पाठवली होती.
- इस्पितळांकडून पडताळणी अहवाल आल्यानंतर आरोग्य संचालनालयाने ती प्रसारमाध्यमांना दिल्या जाणाऱ्या दैनंदिन अहवालातही नमूद केली होती.
- कोविड लाटांमध्ये डॉक्टर आणि इतर आरोग्य यंत्रणा यांच्यावर एवढा ताण होता की, अशा नोंदी चुकून राहू शकतात. ती चूक सुधारली जाऊ शकते.
- आकडेवारीत किंवा नोंदीत काही तफावत असेल तर त्याबाबतची माहिती समाजकल्याण खात्याकडून मागवून तत्परतेने त्यात सुधारणा करू.